साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्यावर टोपी...
नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन...
अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची.
"कसे आहात गुरुजी?' वगैरे वास्तपुस्त व्हायची.
पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची.
विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी गाडी करत फिरवले जात असलेले सायकलीचे जुने टायर अशा खेळांच्या साऱ्या जिनसा जागीच सोडून!
त्या वेळी सातवी पास असलं की गुरुजी म्हणून नोकरी लागायची.
काही शिक्षक तर कुग्राम म्हणावं अशा खेड्यात जाऊन शाळा सुरू करायचे.
गुरुजींची उपजीविका गावावर अवलंबून असायची.
नंतर जेमतेम पगार सुरू झाला. खर्च असा नव्हताच.
अगदी गावात असलेला एखादा मोकळा वाडाही गुरुजींना मोकळ्या मनानं उघडून दिला जायचा.
सांज-सकाळी कुणाच्याही मळ्यातून हिरव्या पालेभाज्या यायच्या.
गुरुजींच्या घराचा कोपरा कडधान्यांनी भरून जायचा.
निरशा दुधाचा मोफत रतीब असायचा.
गुरुजी ग्रामव्यवस्थेचे अविभाज्य घटक असायचे.
कुणाच्या घरी पत्र आलं की त्या घराला गुरुजींची आठवण व्हायची.
पोरगं विजार सावरत पळायचं आणि गुरुजींना घेऊन यायचं.
तोपर्यंत घरातला बाप्या अंगणात गोधडी टाकायचा.
कारभारीण चुलीत तुराट्या घालून चहाचं आधण ठेवायची.
गुरुजी येऊन पत्र वाचायचे.
थाळाभर चहा समोर यायचा.
मग अंधार पडेपर्यंत शिवारगप्पा सुरू व्हायच्या.
त्यातच जेवणाची वेळ व्हायची. गुरुजी उठू लागल्यावर बाप्याचा आग्रह सुरू व्हायचा.
कारभारीण दाराच्या आतून पदर सावरत आदरानं म्हणायची : "आता दोन घास खाऊनच जावा की गुरुजी!' ते 'नको नको' म्हणत असतानाच काठवटीत भाकरीची थपथप सुरू व्हायची कंदिलाच्या गढूळ प्रकाशात...
खरपूस पापुद्रा आलेली बाजरीची गरमागरम भाकरी, खापराच्या तवलीतलं झणझणीत कोरड्यास, लसूण, मीठ, लाल मिरची घालून पाट्यावर रगडलेला भेळा, गाडग्यात मुरलेलं खारट लोणचं...या अन्नाला मायेची चव असायची.
तृप्त पोटानं गुरुजी उठायचे.
झोपेनं पेंगुळलेल्या पोराच्या डोक्यावर हात फिरवायचे.
बाप्या कंदील घेऊन उठत म्हणायचा: "अंधार हाय...गरमासाचे किरकुडे निघत्यात...चला घरला सोडून येतो.'
कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडासारखं ते स्निग्ध प्रेम पाहून गुरुजी भारावून जायचे.
***
गावात मुलीला पाहायला पाहुणे येण्यापासून तिचं लग्न लागेपर्यंत गुरुजींची महत्त्वाची भूमिका असायची.
दुखणं-पाखणं, अंत्यविधी, सणवार, प्रवचनं-कीर्तनं अशा प्रत्येक ठिकाणी सूत्रं गुरुजींकडंच असायची.
त्या काळी शाळा ही देवळात, एखाद्या मोकळ्या घरात, नाहीतर झाडाखाली भरायची.
खोडाला खिळा ठोकून त्याला लाकडी फळा लटकवला जायचा.
फळ्यावर पुसट उमटलेली अक्षरं विद्यार्थ्यांच्या मनावर मात्र गडदपणे उमटायची.
गावभर पाढ्यांचा, बाराखडीचा आवाज घुमायचा.
नंतर पत्र्याच्या, कौलाच्या इमारती झाल्या.
गुरुजींना शाळेच्या खर्चासाठी दोन रुपये "सादिल' म्हणून मिळायचा.
डुगूडुगू हलणारं लाकडी टेबल, लांब बाकडं, रेकॉर्ड ठेवायला लाकडाची मोठी पेटी...
गुरुजी तीच पेटी खुर्ची म्हणून वापरायचे.
पालक तर ठार अडाणी.
पोरगं पहिलीत घालायचं तर जन्मतारीख माहीत नाही.
मग मुलगा सहा वर्षांचा झाला आहे किंवा कसं हे तपासण्यासाठी गुरुजी त्याचा एक हात डोक्यावरून विरुद्ध बाजूच्या कानाला लावायला सांगायचे.
हात कानाला लागला तरच पहिलीत प्रवेश!
नावाची-आडनावाची अशीच बोंब असायची.
शिंपी, लोहार, सुतार, कुंभार असे व्यवसाय असतील तर तेच आडनाव हजेरीवर लावलं जायचं.
आईनं पोराचं नाव दगड्या सांगितलं तर ते तसंच लिहावं लागायचं.
लिहिताना गुरुजींनी "दगड्या'चा उच्चार "दगडू' असा केला तर त्याची आई म्हणायची : "दगड्याच लिवा. दगडू म्हणल्यावर त्यो भोकाड वाशितो'!
शाळेची घंटा म्हणजे रुळाचा तुटलेला तुकडा असायचा.
घणघण असा ओळखीचा आवाज गावभर घुमायचा.
वर्गात फरशी नसायची.
साधी जमीन.
आठवड्यातून एक दिवस वर्ग शेणानं सारवावा लागायचा.
गुरुजींचा आदेश आल्यावर आम्ही विद्यार्थी शेण गोळा करायला निघायचो.
नदीवरून बादल्या भरून आणण्याचं काम थोराड शरीराच्या मुलांकडं असायचं.
तोपर्यंत मुली परकरांचे ओचे-कोचे खोवून सारवण्याच्या तयारीत वर्गाच्या चारही कोपऱ्यांत बसलेल्या असायच्या.
एकंदर वर्ग सारवून घेणं हा आमच्यासाठी सोहळाच असायचा.
शाळा सुरू असताना काही पोरं गायब झाल्यावर ती पोरं कुठं गेली असतील ते गुरुजी अचूक ओळखायचे.
शर्ट-विजार ओली असेल तर मासे धरायला ओढ्याला...
करदोरा ओला असेल तर मुलगा नदीवर पोहून आलेला...
हाता-पायांवर ओरखडे असतील तर बोरीच्या झाडावर चढून बोरं खाऊन आलेला...
तोतरं बोलला तर बिबीची फुलं खाऊन आलेला...
हाता-पायांवर मोठाल्या लाल रेषा असतील तर कुणाच्या तरी शेतात शिरून ऊस तोडून खाऊन आलेला...
जीभ लालसर जांभळी असेल तर जांभळं खाऊन आलेला...
बोटात बारीक काटे असतील तर सबरीची बोंडं खाऊन आलेला...
तोंडाभोवती चिकटपणा असेल तर गुऱ्हाळात जाऊन गूळ खाऊन आलेला,
हाता-पायांवर पांढुरका चिकटा असेल तर कुणाच्या तरी शेतात जाऊन हरभरा खाऊन आलेला...
अशा निरनिराळ्या खुणांवरून गुरुजी विद्यार्थ्यांची चोरी नेमकी पकडायचे.
गुरुजींनी बरोबर कसं ओळखलं म्हणून त्या वयात आम्हा विद्यार्थ्यांना अतोनात आश्चर्य वाटे.
शाळा अशा मजेत चालायच्या!
आम्हाला खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा.
अनेकांच्या चड्डीच्या मागच्या बाजूला कमी-जास्त मोठी असलेली आयताकृती ठिगळं असायची.
सदऱ्याचा पुढचा भाग फाटलेला म्हणून ते फाटलेलं झाकण्यासाठी पुढून शर्टिंग आणि मागचं चड्डीचं ठिगळ झाकण्यासाठी सदऱ्याचा मागचा भाग शर्टिंग न करता तसाच राहू दिला जायचा.
खतांच्या गोण्यांपासून दप्तराच्या पिशव्या शिवलेल्या असायच्या.
त्या खतांच्या कंपनीचे आम्ही विद्यार्थी चालते-बोलते प्रचारक होतो म्हणा ना!
अडचणी होत्या...
संकटं होती...
पण शिक्षण मात्र सकस होतं.
गुणवत्तापूर्ण होतं.
मात्र, गुणवत्तेच्या मूल्यमापनासाठी तेव्हा खंडीभर साधनं नव्हती.
डोक्यावर व्यवस्थेची जीवघेणी उतरंड नव्हती.
गुरुजींवर विश्वास होता.
***
काळ बदलला. समाज बदलला.
विद्यार्थी बदलले. गुरुजी बदलले.
सारवणाच्या जमिनी जाऊन फरश्या आल्या.
भिंती रंगल्या.
शाळा मेकअप केल्यासारख्या सजल्या...
देखण्या झाल्या!
संगणक आले.
शाळा डिजिटल झाल्या.
तंत्रज्ञानानं शिक्षण व्यापलं.
गुरुजींच्या खिशात डायरीऐवजी मोबाईल आले.
प्रोजेक्टरवर अभ्यासक्रम आला.
साऱ्याच कवितांना एकच सरकारी चाल पाहून मुलं बावरली.
हेडमास्तरांना बसायला देखणी खुर्ची आली; पण तिला असलेल्या अदृश्य काट्यांनी ते अस्वस्थ झाले.
मोठं टेबल आलं; पण ते अहवालाच्या कागदांनी गुदमरून गेलं.
पोरांच्या अंगावर इंग्लिश धाटणीचे ड्रेस आले.
शाळेला कंपाउंड आलं आणि गाव शाळेपासून दुरावत चाललं.
***
आता गावाचं गुरुजींवाचून काही अडत नाही.
वरून अफाट अनुदान येतं.
शाळेत पैसा आला: त्यामागं राजकारण आलं.
राजकारणामागं गाव आलं.
गावपुढारी शाळेत लक्ष घालू लागले.
आठवीपर्यंत कुणाला नापास करायचं नाही...
मुलांना मारलं तर गुरुजींना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या सुरू झाल्या.
धाक, दरारा, भीती नष्ट झाली.
"आनंददायी'च्या नावाखाली जणू स्वैराचारच सुरू झाला.
कृतीपेक्षा प्रशिक्षणं जास्त झाली.
गुणवत्तेपेक्षा मूल्यमापनाची साधनं जास्त झाली,
शिक्षकांपेक्षा शिक्षणतज्ज्ञ जास्त झाले.
सारं काही जास्त झालं; पण नेमकं काहीतरी कमी असल्याचं जाणवू लागलं...
साऱ्या सुविधा असूनही शिक्षणव्यवस्थेत रितेपणा असल्याची भावना दाटून आली आहे...
भरल्या घरात एकटेपणा वाटावा तशी.
काय ते समजत नाही; पण काहीतरी हरवलंय...!
संग्रहित पोस्ट
No comments:
Post a Comment