Sunday, July 14, 2019

"कांदाभजी"

व्यक्ती कधी स्ट्रेसमधे जाऊन आत्महत्या किंवा काय भयानक निर्णय घेईल काहीच सांगता येत नाही. पण काहीवेळा अशावेळी एखादी अशी घटना घडते की त्या व्यक्तीचे जीवनच बदलून जाते. 

मुंबई - अलिबाग मुख्य रस्त्यावरील एका छोटेखानी पिकनिक स्पाॅटचे एक गांव. त्या गावातील एका व्यक्तीची ही गोष्ट.

बावीस वर्षांचा तरूण मुलगा. सुशिक्षित व रोज दोन घास मिळतील अशा शेतकरी कुटुंबातला. काही कारणाने दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शेतात भात झाला नाही. शेतातून येणार्‍या भात व वालावर वर्ष काढणार्‍या कुटुंबाला पीक न आल्याने अर्थातच वर्षभर खायचं काय हा प्रश्न पडला होता. वडील , मोठा भाऊ व हा मुलगा रोजंदारीवर काम मिळेल ते करू लागले. पण रोज काम मिळेल याची काहीच खात्री नाही. त्यामुळे उद्या जेवायचे काय? हा प्रश्न सतत ग्रासत असायचा.

याच विवंचनेतून या कुटुंबातील धाकट्या मुलाला स्ट्रेस ने गाठले. सतत विचित्र विचार करत हा मुलगा अनाकलनिय गोष्टी व निर्थक बडबड करू लागला. आईवडिलांना याला आता वेडबीड लागते की काय अशी भिती वाटू लागली. अचानक या मुलाने परवा आत्महत्या करायची असे निश्चित केले. पण  आत्महत्या करण्या आधी कुटुंबातील सर्वांना कांदाभजी खायला घालायची असा त्याने विचार केला.

दुसर्‍या दिवशी आईच्या कडून थोडे पैसे घेऊन त्याने कांदाभजी बनविण्यासाठीचे सर्व साहित्य स्वतः जाऊन आणले. दुपारी हा मुलगा साग्रसंगीतपणे कांदाभजी तयार करणास घरा बाहेरील चुलीजवळ बसला. भजी तेलात सोडून खमंग होण्याची वाट बघत बसलेला असतानाच एक व्यक्ती पत्ता विचारण्यासाठी अचानकपणे या मुलाजवळ पोहोचला. कांदाभज्यांच्या खमंग वासाने पत्ता विचारण्याऐवजी या मुलाजवळ दोन प्लेट भजी देशील का अशी विचारणा केली. मुलाला "धंदा" वगैरेची काहीच कल्पना नव्हती. तो मुलगा त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला दादा पैसे नको.. माझ्याकडून अशीच घ्या ही भजी..
त्या व्यक्तीने जास्त विचार न करता तिथेच बसून भजी खाण्यास सुरवात केली. कुरकुरीत चविष्ट कांदाभजी त्याला जबरदस्त आवडली. भजी खात असतानाच त्या व्यक्तीचे व मुलाला पत्ता विचारला. मग  काय करतोस , शिक्षण किती, घरी कोण कोण आदी साधारण गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता तो व्यक्ती या मुलाला म्हणाला उद्या संध्याकाळी सहा साडे सहा वाजता इथूनच परत जाईन.. मला पाच सहा प्लेट कांदाभजी बनवून ठेव.. पण त्याचे मात्र पैसे घ्यायचे..

हे ऐकल्यावर तो मुलगा रडायला लागला.. आणि त्या व्यक्तीला म्हणाला.. दादा.. उद्या भजी नाय मिळणार.. तुम्ही नका येऊ इकडे उद्या.. सदरचा प्रसंग जरा विचित्रच होता. ती व्यक्ती थोडी विचारात पडली की हा असं का बोलतोय.. थोडा वेळाने तो मुलगा जरा शांत झाला. मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली चल जरा गांव दाखव तुमचा.. थोड्या नाराजीनेच तो मुलगा त्या व्यक्ती बरोबर निघाला. चालताना बोलता बोलता त्या व्यक्तीने या मुलाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? याचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेरीस बोलण्याच्या ओघात तो मुलगा त्या व्यक्तीला म्हणाला. दादा मी उद्या या जगत नसेन.. म्हणूनच आज मी आईबाबांना आवडतात ती कांदाभजी करून खायला घातली.. आणि पुन्हा रडू लागला.

अखेरीस त्या व्यक्तीने त्या मुलाला थेट विचारलं.. का करतो आहेस आत्महत्या?? या अनपेक्षित प्रश्नाने तो मुलगा स्तब्ध झाला. त्या व्यक्तीने मुलाला धीर देत देत विचारलं तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा प्रश्न नक्की सुटणार आहे आत्महत्या करून?? यावर त्या मुलाकडे ठोस उत्तर नव्हतं. पण काही वेळाने तो मुलगा म्हणाला दादा.. जगायचं तरी कसं?? ना भात ना वाल.. ना काम मिळतंय रोज.. नाही बघवत आईवडिलांची ही परिस्थिती.. मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली की.. उद्या तुझी बाॅडी बघून आनंद होईल का तुझ्या आईवडीलांना??  त्यापेक्षा काहीतरी उद्योगधंदा कर.. आता तो मुलगा त्या व्यक्तीवर थोडा वैतागून म्हणाला.. पैसे नको धंदा करायला.. बोलायला काय जातंय.. धंदा कर..

यावर त्या व्यक्तीने मुलाला सुचवलं की तू कांदाभजी इतकी भन्नाट बनवतोस.. मग तीच का नाही विकत.. जे भांवल लागेल ते मी देतो.. धंदा कर पैसे जमव.. आणि जमलं तर हळूहळू परत कर पैसे.. हो ना करता करता तो मुलगा तयार झाला. त्या व्यक्तीने त्याला विचारलं किती लागतील तुला पैसे? मुलगा आता धंद्याचा विचार करू लागला होता. थोडा विचार आकडेमोड करून तो बोलला भजी बनवायला घरातलं बाकी सामान आहे.. झारा, कढई आणि तेल - कांदा - बेसन लागेल आणायला.. त्या व्यक्तीने त्याला विचारलं तरी अंदाजे किती लागतील.. तो मुलगा म्हणाला दोन तीन हजार तरी लागतील. त्या व्यक्तीने या मुलाला वडखळ एटीएम मधून पाच हजार काढून दिले. मुलाला आता आशेचा सूर्योदय दिसत होता. त्याने वडखळ येथून लगेच काही सामान घेतलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीत ठेवलं. धंदा कुठे लावणार याची जागा दाखवण्यसाठी तो मुलगा त्या व्यक्तीच्या पाया पडत आनंदाने रडत रडत म्हणाला.. दादा इथे या आडोशाला लावतो उद्या धंदा.. तुम्ही नक्की या.. भजी खायला.. त्या व्यक्तीने मुलाला सांगितले की भजी तर खाईनच पण त्या बरोबर छान गोड चहा ही हवा.. मुलगा जे समजायचं ते समजला.. आणि म्हणाला हो दादा.. चहा पण ठेवतो उद्यापासून..  पण तुम्ही नक्की या..

ती व्यक्ती त्या मुलाचा निरोप घेऊन तेथून निघाली. दुसर्‍या दिवशी धंदा लागलाय का हे दूरूनच  गाडीतून पाहून समाधानाने निघून गेली. हळूहळू त्या मुलाचा धंदा व्हायला लागला. मुलगा रोज त्या व्यक्तीची वाट पहात इमाने इतबारे त्या व्यक्तीकडून घेतलेले पैसे हळूहळू जमा करू लागला.

अखेरीस दोन वर्षांनी ती व्यक्ती चहा घेण्यासाठी एका स्टाॅलवर थांबली व एक चहा अशी ऑर्डर तेथील मुलाला दिली. त्या व्यक्तीचा आवाज ऐकून पाठच्या बाजूची ताडपत्री बाजूला सारत एका मुलाने त्या व्यक्तीला दादा.. तुम्ही आलात अशी आनंदाने हाक मारली.. 

 त्या मुलाला पाहिल्यावर त्या व्यक्तीला सदर घटना आठवली.. आणि त्याने त्या मुलाला विचारलं अरे इकडे कुठे?? कसा आहेस? धंदा कसा चाललाय?? पटापट खुर्ची ठेऊन ती साफ वगैरे करत त्या मुलाने त्या व्यक्तीला हाताने धरून बसा बसा करत खुर्चीत बसवले.. पाण्याची बाटली समोर ठेवली.. एक मिनिट दादा म्हणत पटकन नवी कांदाभजी बनवून ती प्लेट आणि घट्ट गोड चहा त्या व्यक्ती समोर ठेवला.. स्वतः पायाशी बसून दादा धंदा छान चाललाय, घराला पत्रे घातले, पाॅवर टिलर घेतला, सेकंड हॅन्ड बाईक घेतली आदी सर्व सर्व गोष्टी डोळेभरून सांगू लागला..

तोपर्यंत चहा कांदाभजी संपली होती. त्या व्यक्तीने हात धूवून त्या मुलाला  शंभरची नोट दिली. पैसे पाहून तो मुलगा म्हणाला काय दादा.. पैसे काय देता..  तुमचंच दुकान आहे.. आणि तुम्ही दिलेले पैसे पण मी जमा केलेत तुम्हाला परत द्यायला.. आणि पटकन एका डब्यात रुमालात बांधून ठेवलेले पैसे हातात घेऊन तो म्हणाला रोज वाट बघायचो तुमची.. तुम्ही आलातच नाही.. मला तुमचं नाव पण नाही माहिती.. कसं शोधणार तुम्हाला.. मग है पैसे जमा झाल्यावर यात बांधून ठेवले.. तुम्हाला परत द्यायला..

हे सर्व पाहून ती व्यक्ती पार हरखून गेली. दोन वर्षांपूर्वीचा तो निराश मुलगा आजचा उद्योजक झाला होता. त्या व्यक्तीने ते पैसे त्या मुलाच्याच हातात परत ठेवत म्हटले.. तू हे पैसे दुसर्‍या कुणाला तरी दे.. त्याला धंदा शिकव.. आणि त्यालाही असेच करायला सांग.. बाकी श्रमाचि  कृपा आहेच..  

आणि ती व्यक्ती कांदाभज्यांच्या खमंग वासाने सेटल झालेल्या उद्योजकाला निरोप देत आपल्या पुढील प्रवासाला लागली.


"एखादी साधी घटनाही आयुष्य बदलवू शकते.. गरज असते ती परिस्थितीसमोर हार न मानता परिस्थितीचा हात हात घेऊन पुढे चालण्याची.."

मैत्रीची पाठशाळा
जगू नका जगावायला शिकवा आज एकाला वाचवले तर तो इतरांना स्वतः सारखे होऊ नये म्हणून प्रयत्न करेल...

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...