Tuesday, July 16, 2019

खूळ घर शहाणं घर

1
नीताताईनी घड्याळात पाहिलं .साडे सातला दहा मिनिटं कमी  होती .
"बापरे आजकाल खरंच आपला उरक खूपच कमी झालाय ! जागही लवकर येत नाही.मध्यरात्री जाग येते नंतर झोप लवकर लागत नाही! आणि नेमकं पहाटे जेव्हा उठायला हवं तेव्हा डोळा लागतो ."
  सकाळची घाईची वेळ. नीताताईंची धावपळ वाढली. निनादरावांचे ऑफिसला निघणं नऊचं, त्याआधी पावणे नऊला ऋचा तिच्या ऍक्टिवावरून  कंपनीत जायची .ही त्यांची लेक सीए झाली होती. मोठ्या पगारावर ऑडिट फर्म मध्ये काम करत होती. तिच्यासोबतच पल्सरवरनं धाकटा ऋषी जायचा. तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता ..आज उद्यात तोही  कँपसमधे सिलेक्ट होईल. उच्च मध्यमवर्गीय संस्कारक्षम घर होतं ते ..वर वर सारं काही आलबेल पण ...हल्ली वयाच्या पन्नाशीच्या जवळ येताना नीताताई थकत चालल्या होत्या . त्यांच्याकडे लक्ष देण्याइतका वेळ कुणाजवळही नव्हता .प्रत्येकजण आपल्याच व्यापात .अर्थात् त्या सर्वांची धावपळ नीताताईना दिसत नव्हती असे नाही. पण त्याना नेहमी वाटायचे कुणीतरी दिवसातून पाच दहा मिनिटं आपल्याला जवळ बसावं ,आपल्याला काय होतंय हे समजून घ्यावं .
  ऋचा वयात येत होती तेव्हा त्यानी आपली शिक्षिकेची कायमस्वरूपी हक्काची नोकरी सोडून पूर्णवेळ स्वतःला घरी वाहून घेतलं ....लाइटबिल ,फोनबिल, बाजारहाट, आले गेले पै-पाहुणे, कामवाल्या बायांच्या वेळा पाळता पाळता त्या थकून जात होत्या ..त्यात ऋचाच्या लग्नाचंही अतिरिक्त टेन्शन त्याना येत होते ...बाकी कुणीच हे गांभीर्यानं घेत नव्हतं.' सारं कसं वेळच्या वेळी व्हायला हवं !'असं त्याना वाटत होतं.
"ए आई चहा देतेस ना ...!ऋचा आत येत म्हणाली .त्यांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे ती निरखून पाहू लागली.
"का ग बरं वाटत नाही का ?"तिने जवळ येत त्यांच्या गळ्याला हात लावून पाहिलं...
" ताप नाही. पण थकल्यासारखी दिसतेस तू आज!"
तिच्या  शब्द आणि स्पर्शानं नीताताईना गहिवरल्यासारखं झालं
" काही नाही ग हल्ली झोपच लागत नाही नीटशी रात्री !
"दिवसा झोपत असशील ! मग कशी लागेल झोप ? निनादराव आत येता येता म्हणाले.  "बाबा ,कधी झोपणार ती ...?पूर्ण दिवस तिचा कामात जातो ! एक दिवस घरात राहून पहा म्हणजे कळेल !" लेकीनंच उत्तर दिल्यानं त्या सुखावल्या . खरंच  लेकीला जी माया असते ती इतर कुणालाच नसते !
"ए आई, माझी बायोडाटा फाईल पाहिलीस का? हुश्श सापडली ग! बेडरूममधूनच ऋषीनं समस्या आणि समाधान दोन्ही कळवलं .
   “ तसं मी सगळं जागच्या जागी नीटच ठेवतो “ किचनमधे येत डोळे मिचकावत ऋषी म्हणाला .आईला घट्ट मिठी मारत लाडात येत तो म्हणाला ,” आई ग ,आज कँपसला कंपन्या येणार आहेत...हो आणि मला आज यायला उशीर होईल..जेवायला मी नाहीय ." ऋषी ताईच्या आधी तिनं काढलेल्या पाण्याने अंघोळ करण्यासाठी  बाथरूम मधे पळाला ...पुन्हा दोघांची भांडणं, दाराची आदळ आपट , एकच गोंधळ .
"आई, आज मलाही उशीर होईल..आज बजेट मिटिंग आहे ...नंतर जेवणही आहे !ऋचा चहाचा घोट घेत म्हणाली.
"हो आज माझीही क्लाएंट मिटिंग आहे ...रात्री मी जेवायला नसेन कदाचित " ...निनादराव चहा घेता घेता म्हणाले ..
"कुणीतरी यावेळी इलेक्ट्रिक बिल भराल का? गेल्यावेळी तारीख उलटून गेल्यावर भरल्यामुळे  यावेळी मेन ब्रँचला जाऊन पावती दाखवून करेक्शन करावी लागेल !" नीताताई क्षीण आवाजात पुटपुटल्या .
"मला एक कळत नाही? घरातच तर असतेस तू! या गोष्टी वेळच्या वेळी का होत नाहीत ?" निनादराव कुरकुरले .नीताताईना वाटलं मघाचा गहिवर आता हुंदका होतोय की काय  
"ए ऋषी, तू  का नाही भरत सगळी बिलं? तुला काय काम असतं? बाहेरचीही सगळी कामं काय आईनंच केली पाहिजेत काय...?” कप ओट्यावर ठेवत ऋचा बुडबुड अंघोळ करून आलेल्या ऋषीला म्हणाली ...
".मी तर अजून कमवत पण नाही .तू कमवतेस ना . तुला नाही भरता येत का ग सगळी बिलं नेटवर ..?"तिचं बोलणं संपायच्या आत ऋषीनं बाणेदारपणे परतफेड केली . नंतर बराचवेळ दोघांची वादावादी चालली...हे नीताताईना नवीन नव्हतं ...
"ऋचा, मला मंडळात तुझं नाव नोंदवायचं आहे ...दिवाळीच्या पाडव्याला सव्वीस पूर्ण होतील तुला ..पोस्टकार्ड साईज फोटो दे ग बाई मला एक ! "आवंढा गिळत, विसरायच्या आधीच आवरून निघणाऱ्या ऋचाला आठवणीनं नीताताई म्हणाल्या. 
"इतक्या लवकर मुळीच नाही हं आई !" म्हणत गाडीला किक मारून ऋचा गेली .पाठोपाठ ऋषी आणि निनादराव दोघेही गेले .आणि घर एकदम शांत झालं .तेवढ्यात फोन वाजला
"ताई ,मी कमल बोलते .माझ्या पोराला रिक्षानं ठोकलंय. हा मुडदा ढोसून पडलाय ह्यालाच शुद्ध नाही. मी आणि सारिका  त्याला ससूनला नेतोय . मी दोन दिवस येत नाही ताई. जमलं तर उद्या  सारिका येईल !"कमलचा रडवेला आवाज.
"पैसे लागले तर सारिकाला पाठव! काळजी करू नकोस! नीट दाखव डॅाक्टरना !" नीताताईनी तिला उभारी  देण्याचा प्रयत्न केला. कमलचा प्रॅाब्लेम जास्त गंभीर आहे म्हणत त्यानी होतील तितकी भांडी घासून काढली ..कपडे भिजवून मशीनला लावले आणि लादी पुसायचं उद्याच बघू म्हणत हॅाल आणि किचन कसंबसं झाडून घेतले .बेडरूम्सवर नजर फिरवली .ऋषीच्या रुमचा पसारा बघून त्या तिथल्या बेडवर मटकन बसल्या .’अरे देवा ,हे कधी आवरू? ’ पंख्याकडं बघत, हात वर करत हातातला झाडू फिरवत , म्हटलं तर पंख्यावरच्या जळमटाला म्हटलं तर वरच्याला हात जोडत त्या म्हणाल्या . तिथल्या चिकट्यातनं लोंबणारी दोन चार जळमटं कशीबशी  बेडवर पडली ...मरू दे .नंतर बघू म्हणत त्या खोलीतून बाहेर पडल्या .
मुलं लहान असताना ही सर्व कामं त्या स्वतः करत होत्या. मुलाना शाळेत पोहोचवून आठवी नववीचं गणित विज्ञानही शिकवत होत्या .पोरांच्या लाडक्या आदर्श शिक्षिका होत्या त्या. .हेडबाईनी नोकरी सोडताना दहा वेळा ‘विचार कर’ असा सल्ला दिला होता. पूर्णवेळची चांगल्या पगाराची नोकरी सोडून काय मिळवलं आणि काय गमावलं याचा ताळेबंद आज नव्यानं त्या करत होत्या. मुलं शाळेला गेल्यावर तशा त्या दोन तास शाळेत जावून गणित विज्ञान शिकवत होत्या. पण हल्ली सगळं बंद केलं होतं.
‘घरातच तर असतीस. एवढंही जमत नाही का ..हे शब्द आज का इतका त्रास देत होते?’ हल्ली उभारी, उरक कमी झालाय. सारखा थकवा येतोय. त्यातच हल्ली हे सारखं रडायला का होतय तेच त्याना कळत नव्हतं .हा प्री मेनोपॅाजचा त्रास असेल तर अजून चार एक वर्ष तरी सोसावं लागेल ...हे त्यानी मनाला बजावलं ...
आवरता आवरता पावणे बारा  वाजले होते .त्या बिल घेऊन घराबाहेर पडल्या .

                          2

ऋषीच्या कॅालेजच्या बाहेर एकच हुर्यो चालला होता ...दिवसभर ऍप्टी टेस्ट ,ग्रूप डिस्कशन ,आणि शेवटी इंटरव्ह्यू एवढ्या चाचण्या पार करून कट्ट्यावर  सर्वजण कंपनीच्या सिलेक्शन  लिस्टची  वाट बघत होते ..
“आयला व्हायला पाहिजे रे सिलेक्शन जित्या आपलं ...!”ऋषी जितेंद्रला म्हणाला
“पण मला एक कळत नाही ओंकार का नाही आला कँपसला ?”जितेंद्र ऋषीला म्हणाला .
“कुणास ठावून ..?दोन दिवस दिसलाच नाही मला ....!”
तेवढ्यात दोघाना शिल्पा दिसली ..
“हे काय ग रंभे! तू आणि ओंकार दोघांची  कँपसला दांडी! गेट देताय की काय? नोकरी पदरात आधी पाडून घ्या मग द्या ना गेट वगैरे! नाहीतर ना घरचे ना घाटचे व्हाल!”जितु म्हणाला .
शिल्पा  न बोलता बसली होती .
“तू होतीस कुठे ?”तिच्या जवळ जात अनूजानं विचारलं.
“ओंकारची मम्मी !”तिनं हातानंच गेली अशी खूण केली.
“म्हणजे?” सगळे एकदम किंचाळले
“ सुसाईड! पोलीस केस ...”शिल्पा थकलेल्या आवाजात म्हणाली .
“अरे पण का?” ऋषी हाललेल्या आवाजात बोलला. त्याला आपल्या गळ्यातून आवाजच निघत नाही असं क्षणभर वाटलं .
“अलिकडं तिला थोडा तब्येतीचा त्रास होत होत होता .घरातली कामं करून थकायची .सारखी चिडचिड करायची . कुणाला माझी गरजच नाही .माझ्यापेक्षा कामवाली बरी. ती तरी सुट्टी घेते. वर मोजून पैसेही.वगैरे वगैरे बडबडायची म्हणे. मधेच रडत राहायची”शिल्पा थांबून थांबून सांगत राहिली
“डॅाक्टरला दाखवलं नाही ?”अनुजाचा प्रश्न
“दाखवलं ना .वयाच्या या टप्यावर शरीरात बदल होत असतात. तसा मानसिक तणावही वाढतो. त्याच्या घरी कुणाला इतकं होईल असं वाटलं नाही रे ! “शिल्पा बोलता बोलता थांबली .
“हो ग ! प्री मेनोपॅाज सिम्टम असतात हे. दोन चार वर्ष जपावं लागतं. अशा वेळी मुलं मोठी होत असतात . नवरे रिटायरमेंटकडे येत असतात . मुलांची शिक्षणं. लग्नं या सर्वांचे ताण सगळ्यानाच पेलता येत नाहीत. इन एफिशिएन्सीची भावना बळावते. बऱ्याच आया या काळात असं टोकाला जातात .आईकडे असे बरेच पेशंट काउन्सेलिंगला येतात...”राधिका म्हणाली 
“याच्यावर उपाय काय असतो ग मग ?”आता कँपसच्या रिझल्टचा  ऋषीला विसर पडला..त्याला सकाळचे घरातील डायलॅाग आठवले. अगदी असेच होते ते .
“होम काउन्सेलिंग इज द बेस्ट सोल्युशन ! घरच्यानीच अशा पेशंटला आधार देऊन सावरायचं असतं रे! औषधं वगैरे तात्पुरते पर्याय  असतात ! राधिका म्हणाली. 
“अरे ऋषी, कुठं निघालास? लिस्ट बघायला थांबत नाहीस का? जितु ऋषीच्या बाइक मागे धावत म्हणाला.
“जित्या, प्लीज तूच बघ आणि कळव मला मी घरी जातोय रे!”म्हणत ऋषी वेगात घराकडे निघाला

                                                           3

घरात दाखल होतोय तर घराला मोठं कुलूप. त्यानं आईला फोन लावला . फोन नुसता वाजत होता .नंतर लक्षात आलं फोन तर बाहेरच्या ग्रीलच्या आत खिडकीच्या कडाप्यावर वाजत होता. त्यानं आत हात घालून फोन घेतला . दाराला भलं मोठं कुलूप . आई गेली कुठं ? कुठं शोधायचं तिला ? त्याचे हातपाय लटा लटा कापायला लागले .तो बाईक सिंगल स्टँडला लावून मटकन तिथंच  पायरीवर बसला.
शेजारच्या बंगल्यातले राव काका त्याला बाहेर बसलेला बघून त्याच्याकडे आले .
“कँपस झाली का सुरू ? सो यंग बॉय हाऊ आर यू डुइंग? ”त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पायरीवरून ताडकन उठून ऋषीनंच प्रश्न केला ,
“काका आईला पाहिलंत का ?”
“दुपारी भर  बारा वाजता उन्हात निघाल्या होत्या लाईट बिल भरायचंय म्हणाल्या ... ससूनला जायचंय असंही म्हणत होत्या ..रिक्षाची वाट बघत होत्या .स्कूटी बंद आहे वाटतं त्यांची. आल्या नाहीत का अजून? फोन कर ना! तुझ्याकडे चावी नाही का ? आमच्या घरी चल वाटल्यास. येतील त्या. अरे  सरकारी काम म्हणजे हल्ली व्याप झालाय. इकडून तिकडं नुसतं पळवतात.“ कधी नव्हे ते कुणी ऐकणारा मिळाला असावा त्याला बोलू द्यायचंय नाही अशा थाटात काका एकटेच बडबडत घराकडं वळाले .
         कुठं असेल बरं आई! आईला काही होतंय काय ? फॅमिली डॉक्टर सोडून ससूनला का बरं ? आपण नोकरी करत नाही ही गिल्ट तर नसेल ..खर्च नको म्हणून ...अरे देवा ...ऋषीचं विचारचक्र जेट स्पीडनं धावत होतं ..चावी जवळ ठेवायची कधी वेळच आली नाही. घर कायम उघडं असायचं . आई किती दिवस म्हणत होती कुणीतरी जरा गाडी सर्व्हिसिंगला टाका. आता ऋषीला राहवेना.
कमलकडं घराची एक चावी असते.तिला फोन करून बघावा म्हणत त्यानं आईच्या फोनवरून तिचा नंबर लावला ..आणि नंतर पाच मिनिटं कमलचं दुःख ऐकावं लागलं ...पोराला रिक्षानं ठोकलं... डॉक्टरलोक लक्षच देत नव्हते ...आई तिथं गेली ..योगायोगानं तिचा विद्यार्धी तिथं डॉक्टर  होता ..म्हणून पोरगा वाचला ...अजून शुद्धीवर यायचाय ..पण धोक्याच्या बाहेर आहे ....आई येऊन पैसे देवून गेली म्हणून एवढं तरी झालं ..एवढं सांगून शेवटी तिनं त्याला बागेत मागच्या बाजूला  तुळशीच्या कुंडीत दगडाखाली चावी असल्याचं सागितलं .
           ऋषीनं दार उघडलं ..बॅग ठेवायला त्याच्या खोलीत गेला.बेडवरची जळमटं बघितली ...बापरे आपण आईला किती कामं लावतो ..म्हणून तर आई कंटाळली नसेल! ताई तिची रूम छान ठेवते ..आज ऋषीला अपराधीपण जास्तच जाणवत होतं ...ओंकारच्या आईसारखा त्रास आपल्याही आईला तर होत नसेल ना! आई ये ना ग लवकर  रडवेल्या आवाजात म्हणत तो रूम आवरू लागला ..लहानपणी आईला शाळेतून यायला उशीर व्हायचा तेव्हा तो याच रडवेल्या आवाजात आईला सांगायचा. त्यानं ताईला फोन लावला ..रडवेल्या आवाजात आई घरी नाही आहे आणि फोनही घरीच आहे हे सांगताना त्याला हुंदकाच फुटला. 
     .त्यानं बाबानाही फोन लावला . त्याचा थरथरता आवाज ऐकून दोघेही तासाभरात हजर झाले  नीताताईंचा पत्ता नाही. घरात आल्यावर नीताताईंच्या फोनवरून  कुणाला फोन करावा बरं आणि काय विचारावं याची चर्चा सुरू झाली. संकोच बाजूला ठेवून जवळच्या मैत्रिणीना नातेवाईकाना विचारलं ...उत्तर नाही असंच होतं. नीताताई काही येत नव्हत्या पण पाच पाच मिनिटानी ज्याना  फोन केला त्याच मंडळीचे फोन येत राहिले. ऋषीला हुंदकाच फुटायचा बाकी राहिला ..ऋचा त्याच्या जवळ जाऊन याला पाठीवर थोपटत म्हणाली ,” अरे येईल आई ऋषी रडतो काय वेड्या ....डोंट वरी!”
“ ताई मला आई पाहिजे ग ” ओंकारची मम्मी अजूनही ऋषीच्या डोक्यातून जात नव्हती .
“ आणि आम्हाला नकोय होय रे तुझी आई ! ” केविलवाणं हसत बाबा म्हणाले .
“ तू एवढा का पॅनिक होतोयस ऋषी ?” ऋचा त्याला थोपटत म्हणाली ...आणि एका मोठ्या हुंदक्यासह ओंकारच्या आईचा किस्सा त्यानं दोघाना रडतच सांगितला ...वातावरण सून्न झालं
“ वेड्या, तुझी आई काही एवढी लेचीपेची नाही ...आपल्या घरात असला त्रास कुठंय तिला ? आणि ती असलं कधीच करणार नाही ...तुम्हा दोघावर किती जीव आहे तिचा !” निनादराव जरी त्याला समजावत म्हणाले तरी आतून हलले होते . सात साडेसात पर्यंत वाट बघू असं ठरलं ..तिन्हीसांजेची किर्र वेळ अजूनच भिती वाटू लागली ..त्यात ओंकारच्या मम्मीच्या काळोखानं  घर व्यापून टाकलं होतं. ऋचानं आत जावून देवापाशी दिवा लावला ..अगरबत्ती घरभर फिरवली ..एरवी हे असलं ती कधीच करत नसे ..
“ताई ,आई काहीतरी सांगायची ना ग ...वक्रतुंड महाकाय म्हटलं की हरवलेली वस्तू सापडते म्हणून! ” ऋषीनं वक्रतुंड नॉनस्टॉप सुरूच केलं ..
“ अरे राजा, आई वस्तू आहे का रे ! येईल आई .नको घाबरू.” ऋचा त्याच्या जवळ जात उदास हसत म्हणाली
“ए ताई, आईला कशाला माझी काळजी ग .आलीच तर येईल ती तुझ्यासाठी .माझ्यापेक्षा आईचं प्रेम तुला जास्त मिळालंय आणि असंही तिचा जीव तुझ्यावरच जास्त आहे ..मला माहिताय ..परवाच्या रविवारी आई कमलला सांगत होती ताईच्या खोलीचा केर काढू नको.झोप पूरी होऊ दे तिची . झोपू दे तिला .नंतर बघू.ऋषीला उठव . ऋषीची खोली मात्र नीट झाड.” ऋषी आठवून हिशोबचुकता करत  होता .
“अरे किती घाण करतोस तू खोली ..माझी रूम मी छान ठेवते .” ऋचा समजावत म्हणाली
“ नको सांगू तू काही ..आई कमलला सांगत होती .इथंच काय ती आराम करेल माझी ताई. बिचारी दोन वर्षाची असल्यापासून ताईपणात  अडकलीय .फार समजुतदार आहे ग ..तिला छान नवरा मिळू दे ..कसं होणार माझं ती सासरी गेल्यावर ..ती तुझाच विचार करते.तूच लाडकी आहेस तिची .”
“कळालं ना ऋषी, ताई सासरी जाणार आहे .तू कायम तिच्याजवळच असणार आहेस ” बाबा म्हणाले
ऋचाला एकदम भरून आलं .खरंच होतं. तिच्याच साठी आईनं करिअरवर पाणी सोडलं. आयुष्याच्या एका टप्प्यावर शरीरात बदल होत असताना घाबरलेल्या ऋचाला किती छान समजावत आईनं तयार केलं होतं

                                                      4

ऋषीचा फोन वाजला .जितूचा फोन होता.त्याचं सिलेक्शन झालं होतं .उद्या पेपर्स जमा  करायचे होते ...कंपनीनं एकच उमेदवार सिलेक्ट केलाय .तो तू आहेस .हे ऐकलं .जितूच्या पार्टी पाहिजेचं स्वागतही त्यानं थंडपणे केलं ... 
ऋचा आणि बाबानी त्याचं अभिनंदन केलं ...ऋषी धावतच बेडरूम मधे गेला ..बेडवर पालथा पडून हमसून रडू लागला ..ताई आणि बाबा आत गेले ...हुंदके देत त्यानं सांगितलं  खरतर ही बातमी सगळ्यात आधी त्याला आईला द्यायची होती.अलगद उचलून, घरभर फिरवत, हळूच कानात सांगून सरप्राईज द्यायचं होतं .. ऋषी नेहमी नीताताईना उचलून घरभर फिरवायचा ...मग ऋचा चिडवत म्हणायची अरे नुसतं काय उचलतोस तिला?  सोबत गाणं पण म्हण, म्हटलं की हिमेश रेशमियाची गाणी म्हणत आईला घरभर फिरवायचा .  
सगळे हॉलमधे आले .यापुढं प्रत्येकानं आईची कशी काळजी घ्यायची हे ठरवलं.सगळ्यानी तिला पुरेसा वेळ द्यायचा. त्यात बाबानी तिला उठसूठ डिवचायचं नाही .टोमणे मारायचे नाहीत ..ऋषीनं आपली कामं आपण करायची ,आणि ताईनं ताबडतोब पोस्टकार्ड साईज फोटो द्यायचा यावर कधी नव्हे ते एकमत झालं .
दारात कारचा आवाज आला .आई कारमधून उतरली ..आईचा एक विद्यार्थी तिला सोडायला आला होता ..आईच्या हातात शाल, नारळ ,बुके पाहून सगळेच चकित झाले ..
“अग ऋचा, तुला आठवतो का ? दोन हजारच्या दहावी बॅचचा चंदन देशमुख .आय ए एस झालाय ..त्याचा शाळेत सत्कार होता म्हणून गेले होते..वेड्यानं सगळे शिक्षक सोडून माझाच सत्कार केला ...थँक्स राजा ...असाच यशस्वी हो . ”
   “ मॅडम ,ऋचा किती मोठी झाली ..मला आपली दोन वेण्या घालून युनिफॉर्मच्या खिशात हात घालून, टॉक टॉक बुटांचा आवाज करत शाळेत फिरणारी ऋचा आठवते .”
“अरे बाबा आता सीए झालीय ती..अरे असाच काय जातोस ? आत ये ना ,चहा घेऊन जा. “ नीताताई म्हणाल्या
नीताताई किती ग्रेट टीचर आहेत हे सांगत,  ट्रेनिंग संपल्यावर निवांत जेवायलाच येईन असं भरघोस आश्वासन देत चंदन देशमुख निघून गेला.
नीताताई जरा टेकतात तोपर्यंत ऋषी आईच्या मांडीवर पडून मुसमुसू  लागला ..नीताताईनी हातानंच काय झालं  असं ऋचा आणि निनादरावांना विचारलं ..आणि स्वतःच काहीतरी आठवून म्हणाल्या ,” अरे एक कंपनी गेली म्हणून काही बिघडत नाही ...आणि कशाला हवीय रे एवढ्या लवकर नोकरी ..असं काय वय आहे तुझं ? गेट दे एमई ,एमटेक कर ..नाहीतर एमबीए कर ! अरे बाबा ,तुझ्यापेक्षा माझा दिवस वाईट गेला ..बिलाची ही एवढी रांग..ससूनची रपेट. तिथली ती तुफान गर्दी, बिचारी कमल ,गरीबाच्या मागं नसते भोग रे बाबा .त्यात भरीला भर  आज माझा मोबाईल ससूनमधे कुठंतरी पडला.”
घरात एकदम हशा पिकला. ऋचा  आईचा मोबाईल नाचवत ऋषी का रडतोय ते सांगू पहात असतानाच ऋषी “ तायडे थांब !” असं ओरडला .त्यानं अलगद नीताताईना उचललं “आज मैं उपर आसमाँ नीचे ...आज मैं आगे जमाना है पीछे ” गात घरभर फिरवलं आणि हळूच कानात आपलं सिलेक्शन झाल्याचं सांगितलं. सहा बोटं दाखवत लाखात  पॅकेज सांगितलं .
“ऑ..काय करायचेत रे तुला एवढे पैसे? ” ऋचा ओरडली.
“गर्ल फ्रेंडसवर उडवीन..हाताला गजरा बांधून मुजऱ्याला जाईन ..सोन्याची कावड करून आईबाबाना काशीयात्रा घडवीन ..आणि उरले तर देईन तुलाही तुझ्या नवऱ्याला हुंडा म्हणून ..मी काहीही करीन .तुला काय करायचंय ? ” पुन्हा दोघांचं बॅडमिंटन सुरू झालं .
“आई, तू अशी न सांगता कुठं जात जावू नको बाई ..आम्हाला घाबरायला होतं.आणि या खुळ्याला आवरणं तर फार कठीण होतं  ”एवढा वेळ ताईची भूमिका पार पाडणारी ऋचा आईच्या शेजारी बसत भरल्या गळ्यानं म्हणाली ..
“अग असं काय करतेस? तुम्ही सगळे उशीरा येणार होता. जेवायला घरी येणार नव्हता .म्हणून गेले ..हां मोबाईलचं मात्र लक्षातच आलं नाही ..हल्ली होतं असं विसरायला  कधी कधी. मी आपली माझ्यापुरती खिचडी टाकणार होते ..आता तुम्हीही खिचडी खा माझ्या सोबत . ”

म्हणत त्या उठल्या त्याना तिथंच थांबवत निनादराव म्हणाले ,”आज मी करतो खिचडी ..कशी करायची ते फक्त सांग ..”

“ओह.. नो .” शांत बसलेले ऋषी आणि ऋचा दोघंही ओरडले .
“ आज ऋषीची नोकरी आणि आईचा सत्कार याची पार्टी माझ्याकडून ..बाहेर जेवायला जावू.” ऋचा म्हणाली .

“ ए आई आम्ही सगळ्यानी ठरवलंय यापुढं तुझ्यासाठी वेळ  देणार आहोत आम्ही. बाबा तुला टोमणे मारणार नाहीत .ताई पोस्ट कार्ड साईज फोटो देईल आणि मी माझी आणि तुझीही सगळी कामं करणार ” ऋषीनं सगळं एका दमात सांगितलं फक्त ओंकारच्या मम्मीचं जीव देणं सांगणं  शिताफीनं टाळलं.ऋचा आणि निनादराव ‘कर्म’ म्हणत कपाळावर हात मारून हसू लागले
नीताताई एकाच वेळी तिघातील बदल टिपत म्हणाल्या ,

“ आज काही खरं नाही रे बाबा ...हे खुळं घर एकदम कस काय शहाणं झालं बुवा? ”

लेखकःअनामीक

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...