राहुल कुलकर्णी यांचा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील एक अनुभव Whatsapवर इंग्रजीत लिहिलेल्या भावपत्रात वाचनात अाला. त्यातले हेलावून टाकणारे वास्तव अधिक मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठीत केला आहे हा स्वैर अनुवाद :
- मंगेश जांबोटकर
-----------------------------------------------
"अहमदनगर ते नांदेड असा माझा रेल्वेने प्रवास चालू असतांनाचा हा प्रसंग ! अत्यंत कडक ऊन आणि उष्म्याने अत्युच्च पातळी गाठलेली !
धावत्या गाडीत वा-यासाठी दरवाज्याकडे उभा राहिलो मात्र, त्या उष्ण हवेच्या एका श्र्वासातच आगीचा लोळ छातीत घुसल्यागत झालं आणि मी झटकन मागे फिरलो. अजून चार तासांचा प्रवास करायचा बाकी होता नि या उष्म्याला तोंड देणं भाग होतं. वेळ मजेत घालवण्यासाठी उत्तम साधन म्हणजे माझा मोबाईल ! पण त्याची बॅटरीच निष्प्रभ झाली होती. जाम कंटाळा आला होता. पाण्याने अर्धी भरलेली बाटली हातात धरून त्या गरम पाण्याचे दोन दोन घोट घेऊन तहान काही भागत नव्हती. थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन डब्याडब्यातून फिरणारे विक्रेतेही फिरकत नव्हते.
अाता मनात होता एकच विचार .... जास्तीत जास्त वेगात ही गाडी चालावी अाणि लवकरात लवकर हा प्रवास एकदाचा संपावा!
अशा विमनस्क अवस्थेत बसल्यावर माझी नजर बाकाखाली पडलेल्या एका जुन्या वर्तमानपत्राच्या चुरगळलेल्या पानावर पडली. वेळ काढण्यासाठी मी ते उचलून वाचायला घेतलं. एक एक बातमी वाचतांना मी हादरूनच गेलो. भयानक दुष्काळी परिस्थिती अाणि परिणामी होणाऱ्या शेकडो शेतक-यांच्या आत्महत्या ! दिवसरात्र खपून धान्य पिकविणा-या, लोकांना अन्न देणा-या शेतक-यावरच उपासमारीत मरण्याची वेळ यावी हे अत्यंत क्लेशकारक होतं. धावत्या गाडीच्या खिडकीतून दोन्ही बाजूंना दूरवर, अगदी क्षितीजापर्यंत दिसणारी सर्वच शेतं उजाड अाणि रखरखीत दिसत होती ! मराठवाडा आणि विदर्भाने गेल्या पाच वर्षांत पाहिलेला हा सर्वात भीषण दुष्काळ !
अशा विचारांमध्ये मग्न असतांना अचानक गाडीचा वेग मंदावला अाणि गचका देऊन गाडी थांबली ! कडक उन्हाळ्यामुळे गाडीत प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती. गाडी थांबताच प्रचंड आरडाओरडा ऐकू आला तो गाडीबाहेर जमलेल्या गर्दीचा ! गाडी स्थानक सोडून मधेच कुठेतरी थांबली होती.
अनेक बायका, मुले नि काही वयस्क माणसे धावत पळत गाडीत चढली. बायकांच्या हातात बादल्या अाणि मुलांच्या हातात बाटल्या होत्या.
वयस्क माणसे आणि मुलांनी संपूर्ण डब्यात भिरभिरत्या नजरेने बाकाखाली प्रवाशांनी फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांत उरलेले काही पाणी मिळते का याचा शोध घेत काही बाटल्या गोळा केल्या आणि बायका झटपट संडासातल्या नळातून त्यांच्या बादल्यात पाणी भरायला लागल्या !
हेच पाणी पिण्यासाठी आणि अन्न शिजविण्यासाठी पुरवून पुरवून वापरणार होते ते ! अांघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी पाणी तर त्यांना स्वप्नातही दिसणार नाही. आमच्या डब्याच्या संडासाजवळ माझे आसन होते. त्यांची गडबड, गोंधळ मी पहात होतो. माझ्या हातातल्या बाटलीत जेमतेम एकदोन घोट पाणी होतं. तेवढ्यात एका वयस्क माणसाने हळूच माझ्या खांद्यावर थोपटून विचारलं की माझ्या हातातली बाटली मला ठेवायची आहे का टाकायची आहे. मी ती बाटली त्याच्या हातात देताच त्याने ती तोंडाला लावली. केवळ दोन घोट पाणी केवढा मोठा आनंद आणि समाधान देऊ शकतं हे मला त्याचा चेहरा पाहिला तेव्हा कळलं. माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, "देव तुझं भलं करो !" आणि उतरून गेलाही. माझ्या डोळ्यांतली आसवं मात्र ओघळतच राहिली.
एका बाईने कडेवर घेतलेली एक छोटी मुलगी आशाळभूत नजरेने एकटक माझ्याकडे पहात होती. तिच्या नजरेतच मला जाणवलं की ती तहानलेली आहे. मी लगेच माझ्या बॅगेतली दुसरी पाण्याने भरलेली बाटली काढून तिच्या हातात दिली. दोन्ही हातांनी उराशी घट्ट कवटाळून तिने ती बाटली अशी धरली होती की जणू तिला जगातील एक अमूल्य ठेवाच मिळाला आहे !
तिकीट तपासनीस रेल्वे पोलिसाबरोबर येतांना दिसताच सर्व मंडळी भराभर खाली उतरून पसार झाली.... जमेल तेव्हडे पाणी घेऊन आणि पाण्याचा एकही थेंब खाली न सांडता !
तिकीट तपासनीसाशी बोलतांना कळलं की काही माणसं मागच्या स्थानकात गाडीत चढतात आणि साखळी अोढून या ठिकाणी गाडी थांबवितात, जिथे पाण्यासाठी ही मंडळी गर्दी करून वाट पाहत असतात ..... असे गेले काही अाठवडे नित्याचे झाले होते . माझ्या सहप्रवाशाने विचातलं की त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाही म्हणून. त्यावर त्या तिकीट तपासनीसाने सांगितलं की निसर्गाने दुष्काळाचा सर्वात मोठा तडाखा या भागाला दिलेला आहेच आणि जगण्यासाठी धडपडणाऱ्या या माणसांविषयी माणसांमध्येच माणुसकी हवी ना ! तो पुढे म्हणाला, "थोडा वेळ देऊन, आम्ही धाक दाखवून त्यांना गाडीतून उतरावयास भाग पाडतो... नियम माणुसकीपेक्षा का कधी मोठे असतात !"
No comments:
Post a Comment