रिचर्ड ब्रान्सन शाळेत गेला तोच मुळी " ठोम्ब्या " म्हणवून घ्यायला. त्यामुळे वर्गातील सारीच मुलं त्याला " ठोम्ब्या " म्हणून गिऱ्हाईक बनवत. गणितातील आकडे आणि भाषेतील शब्द म्हणजे त्याचे हाडवैरीच होते. त्याला काही म्हणजे काहीच येत नसे. त्यामुळे शिक्षकही त्याला " ठोम्ब्याच " म्हणत. त्यालाही त्याचे काही वाटत नसे. पण त्याची आई मात्र आपला मुलगा ठोम्ब्या आहे म्हणून कासावीस होई. त्याच पुढे कसं होणार ह्या चिंतेने तिला धड झोपही लागत नसे.
रिचर्ड ब्रान्सन
अभ्यास त्याला जमणारच नाही हे लक्षात आल्यावर तिने त्याला स्वावलंबी बनवायचा निर्धार केला, ज्यामुळे निदान तो आपल्या पायावर उभा तरी राहील. एक दिवस ती त्याला गाडीतून लंडनच्या बाहेर एका मैदानात एकट्यालाच सोडून घरी आली. तेव्हा तो अवघा ८ वर्षाचा होता. त्याच्या वाटेकडे ती घरी डोळे लावून बसली होती. बराच वेळ तो घरी परतलाच नाही तेव्हा मात्र तिचा धीर सुटत चालला होता. तब्बल दोन तासांनी रिचर्ड घरी परतला तेव्हा तिने त्याला आनंदाने मिठी मारली. तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. त्या एका कृतीने आपला मुलगा भविष्यात आपल्या पायावर उभा राहील हा तिला विश्वास मिळाला. पुढे काही दिवसातच त्याला शाळेतून काढण्यात आल.
बरं झालं त्याला शाळेने काढून टाकलं, नाहीतर शिकून तो कुठल्या तरी ऑफिसमद्धे कारकुनी करत बसला असता. आज रिचर्ड ब्रान्सनच्या " व्हर्जिन ग्रुप" च्या ४०० कंपन्या आहेत. त्याची " व्हर्जिन अटलांटिक " नावाची विमान कंपनी जगातील कुठल्याही विमान कंपनीपेक्षा अधिक नफा कमावतेय. प्रवाशाना अंतराळ प्रवास घडवून आणण्यासाठी त्याने कंपनी स्थापन केलीय. त्याच्याकडे २५ हजार लोक काम करताहेत. त्याची एकट्याची माल मत्ता आहे तब्बल ३१ हजार कोटींची.
वयाच्या सोळाव्या वर्षीच रिचर्डने " स्टुडन्ट" नावाचं मासिक काढलं. सेलिब्रिटीजच्या मुलाखती तो घ्यायचा त्यामुळे त्याच्या ओळखी वाढल्या. त्यामुळेच तो रेकॉर्ड विक्रीच्या व्यवसायात उतरला. हळूहळू त्याने आपल्या व्यवसायात चांगलच बस्तान बसवलं. पुढल्या काही वर्षातच त्याने स्वतःची रेकॉर्ड कंपनी काढली. नाव होतं- व्हर्जिन रेकॉर्ड्स. त्याची हि कंपनी तुफान चालली. एक दिवस एका व्यक्तीने त्याला लंडन-न्युयोर्क विमान वाहतूक कंपनी काढण्यात त्याला रस आहे का असं विचारलं. त्या क्षेत्रातील त्याला काहीच माहिती नव्हती. शिवाय ब्रिटीश एअरवेजची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात एका नवख्याने जाण म्हणजे वाघाच्या तोंडात मान देण्या सारख होतं. पण रिचर्डने तो निर्णय घेतलाच. तेव्हा त्याच्या मित्रांनी, नातेवाइकानी त्याला हा जुगार आहे सांगितलं. तरीही रिचर्ड बधला नाही.
त्याने आपली रेकॉर्ड कंपनी १९९२ मध्ये ९० कोटी डॉलर्सना विकली. आपल्या वाटेला आलेल्या रकमेतून त्याने बोईंग कंपनीकडून हफ्त्याने बोईंग ७४७ जातीची विमाने खरेदी केली. बघता बघता त्याने ब्रिटीश एअरवेजच्या नाकात दम आणला. नंतर त्याने शीत पेय उद्योगातही प्रवेश केला. आठवड्याला दहा लाख पौंड नफा कमावु लागला. त्यानंतर त्याने नवनवीन कंपन्या काढण्याचा सपाटाच लावला. प्रत्येक ठिकाणी रिचर्ड यशस्वी होतच राहिला. इतक्या कंपन्या काढल्या म्हणून लोक त्याला विक्षिप्त माणूस म्हणतात. पण त्याला त्यांची पर्वा नसते. जीवन भरभरून कसं जगायचं हे जाणून घ्यायचं असेल त्यांनी त्याच चरित्र वाचायलाच हवं. उद्योग व्यवसाय व्यतिरिक्त त्याने अनेक जागतिक विक्रम केलेले आहेत. ते पाहून एका माणसाला इतकं काही कसं जमू शकतं याचं आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही.
मित्रानो, बंद पडलेलं घड्याळही दिवसातुन दोन वेळा अचूक वेळ दाखवते. एखाद्या विषयात आपली बाजू लंगडी असेल तर तिचा बाऊ करण्यात काय अर्थ आहे ? त्याऐवजी आपल्याला जे जमत ते करत राहावं. एडिसन, आइनस्टाइन, पिकासो, हेन्री फोर्ड, राईट बंधू आणि रिचर्ड ब्रान्सन या ठोम्ब्यानी पुढे इतिहास घडवला. कुठल्या न कुठल्या विषयात ते शाळेत असताना कमजोर होतेच. पण त्यामुळे त्याचं कुठे काय अडलं ? म्हणूनच तुम्हा सर्वाना एकच सांगणं आहे- माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही म्हणून रडत बसू नका. प्रयत्न करा. अथक परिश्रम करा. यशस्वी होण्याचा हाच एक मंत्र आहे.
No comments:
Post a Comment