आता मी पाहुणी आहे*....
मंगळसुत्र आणि जोडवे
या सगळ्यांमुळे नाही..
तर भरलेल्या बॅगमुळे
परके वाटते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
आई म्हणते अगं
हे बॅगमध्ये लगेच भर
नाहीतर जाताना विसरशील,
प्रत्येकवेळी काहीना काही विसरते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
माहेरी येण्याआधीच
परत जाण्याच्या बसचे
तिकीट बुक असते,
किती जरी सुट्टी असली
तरी ती कमीच पडते..
वाळुसारखी माहेरपणाची
वेळ निसटून जाते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
आता परत कधी येणार ?
हा सगळ्यांचा प्रश्न ऐकून
वाईट वाटते,
मन आतल्या आंत रडू लागते..
मग जबाबदारीची जाणीव होऊन
पुन्हा शहण्यासारखे वागते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
माझ्या माहेरच्या खोलीचा
कोपरा अनं कोपरा
फक्त माझा आणि
मी म्हणेल तसा असायचा
पण आता पंखा आणि
दिवा लावताना सुद्धा
बटणाचा गोंधळ उडतो..
प्रत्येक क्षण आता
मी पाहुणी आहे
हे जाणवुन देतो..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
शेवटच्या दिवशी घरातुन निघतांना
आईच्या डोळ्यात मी बघूच शकत नाही
कारण तसं केलं तर कधीच
मी जाऊ शकणार नाही..
मग तसंच पाणवलेले डोळे
आणि गच्च भरलेली बॅग घेवून
बसमध्ये बसावे लागते,
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
४ दिवसांची माहेरपणाची सुट्टी
संपलेली असते..
पाहुणचार घेऊन पाहुण्यासारखे
आपापल्या घरी जावे लागते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
========================================
आईपण सरता सरत नाही.....
बाळाच्या पहिल्या श्वासाबरोबर,
जन्म घेते एक आई.
बाळ काही कायम बाळ रहात नाही,
पण,
आई मात्र आयुष्यभर असते फक्त आई.
मायेची नाळ काही
आयुष्यभर तुटत नाही.
आईपण सरता सरत नाही.....
आता बाळचं असतं तिचे विश्व,
त्याचे हसणे, त्याचे रडणे,
त्याची भूक, त्याची झोप,
त्याची शिशी आणि त्याची शूशू,
याशिवाय तिला काहीच सुचत नाही.
आईपण सरता सरत नाही....
सोनुलं आता बसू लागतं,
रांगू लागतं, दुडूदुडू चालू लागतं.
आणि एक दिवस,
घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडतं.
बाहेरच्या जगाच्या भितीने
आईचे हृदय धडघडतं.
सोनुलं परत येईपर्यंत
तिच्या जिवाला काही शांतता नाही.
आईपण सरता सरत नाही.....
सुरवंटाचं आता फुलपाखरू होतं,
फुलपाखरासारखचं त्याला जपायला लागतं.
आईची असते आता तारेवरची कसरत.
लेकराशी नक्की कसं वागायचं,
तिला काही कळत नाही.
आईपण सरता सरत नाही......
कानात वारा शिरलेल्या वासरापरी
ते हुंदडत असतं,
रोज नविन उचापती करून
आईच्या हृदयाचा ठोका चुकवित असतं.
आईची परिक्षा काही संपत नाही.
आईपण सरता सरत नाही.....
आईच्या अंगाईशिवाय
झोप न लागणाऱ्या बाळाला,
आईचं बोलणं आता टोचू लागतं.
आईला काय कसंही वागवलं
तरी चालतं,
कारण तिला तर गृहितच धरायच असतं
पण तिच्या प्रेमाचा झरा काही केल्या आटत नाही.
आईपण सरता सरत नाही....
आपल्या पिल्लातच विश्व बघणाऱ्या आईसाठी,
पिल्लाच्या विश्वात आता जागाच नसते.
पिल्लाच्या पंखात आता बळ आलेले असते,
आईची गरज आता संपलेली असते.
आईला मात्र हे कधी उमगतच नाही.
आईपण सरता सरत नाही......
पिल्लू आता घरट्यातून उडून जाईल,
आकाशात उंच उंच भरारी घेईल.
दोनाचे चार होतील आणि चाराचे सहा,
तेव्हा कदाचित आईचं मन कळतय का ते पहा.
आईची वेडी आशा काही संपत नाही.
आईपण सरता सरत नाही.....
ती कायम जपत रहाते आपल्या लेकराचे इष्ट,
माहीत आहे ना आपल्याला, काळीज काढून देणाऱ्या आईची गोष्ट.
जित्याची खोड काही मेल्यावाचून जात नाही.
आणि आईपण काही मेल्यावाचून संपत नाही.....!
====================================
एका वडिलांचं मुलाला पत्र ||
(बघ, वाच, ठरव !)
माझ्या लाडक्या मुला.
मी हे असं तुला पत्र लिहितोय.
01) जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब-या.
02) मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.
03) मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव, आयुष्यभर!
04) माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे.
तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.
05) जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.
06) आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.
07) प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.
08) अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!
09) माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचास.
10) आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
No comments:
Post a Comment