Friday, November 25, 2016

पुस्तके

मी गेल्यावर
तुला वाटेल की आपल्या बाबांनी
वाचलीयेत ही सारी पुस्तकं,
पण नाही
अर्धंही वाचता आलेलं नाहीय,
येणारही नाही हे ठाउक होतं मला तरी
मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं.

माझ्यासाठी माझ्या बापाने
काहीच सोडलं नव्हतं मागे,
ही अक्षर अोळख सोडून फक्तं
जिच्या मागे धावत मी
पोहोचलो आहे इथवर....

तुला सांगण्या समजावण्यासाठी की
मलाही सोडता येणार नाहीय मागे
काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी....

ही काही पुस्तकं  आहेत फक्त!
जी तुला दाखवतील वाट

चालवतील तुला,थांबवतील
कधी पळवतील कधी
निस्तब्ध करतील
बोलतं करतील कधी
टाकतील संभ्रमात
सोडवतील गुंते....

वाढवतील पायाखालचा चिखल
कधी बुडवतील तरवतील कधी,
वाहावतील कधी थोपवतील प्रवाह,
अडवतील तुडवतील सडवतील...
बडवतील हरवतील सापडतील...
तुझ्याशी काहीही करतील
ही पुस्तंकं...

तू समोर आल्यावर नेहेमीच कवेत घेउन मी माझ्यातली धडधड
तुला देण्याचा प्रयत्नं करतो
तशीच ही पुस्तकं,
उघडतील मधोमध पसरतील हात
मिठीत घेतील तुला...
आपोआप होतील हृदयाचे ठोके.

यांच्यात रहस्यं आहेत दडलेली
अनेक उत्तरंही असतील
प्रश्नांमधे कदाचित कुठेच
प्रश्नही नसतील..

एक लक्षात ठेव,
आपलं आयुष्यच पल्प फिक्शन कधी क्लासिक
सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल कधी कवतिक,
कधी किचकट कधी सोपं असतं.

लक्षात असु दे या सगळ्यात
वाईट काहीच नसतं
त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक
त्याच वेळची गरज असतं समज नसतं....

मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील
जी नेतील तुला जायचं आहे तिथं...

फक्त, मी असेनतिथं मात्र...
तुला पोहोचता येणार नाही.
कारण,मी आधीच
होउन गेलेलो असेन तुझ्यासाठी-
एखादी कथा एखादी कादंबरी....
एखादी कविता एखाद्या पुस्तकातली.

माझी आठवण आली की
या प्रचंड ढिगाऱ्यातलं
ते एखादं पु्स्तक शोध
तुझा प्रवास बघ कसा
सोपा होउन जाईल.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...