Friday, November 25, 2016

मोदीजी, भावनाप्रधान कशासाठी? देश तर बेहद्द खूश आहे

नोटबंदीच्या निर्णयावर देशातली ९३
टक्के जनता बेहद्द खूश आहे, हा आहे
मोदींच्या नमो अॅप चा दावा. कारण असे सांगण्यात आले की देशातल्या ५ लाख लोकांनी आपल्या खुशीची मोहोर पंतप्रधानांच्या अॅपवर एका दिवसात नोंदवली.
       भाजपा हा तर जगात सर्वाधिक सदस्य असलेला एकमेव राजकीय पक्ष. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी ९ कोटींहून अधिक मिस्ड कॉल सदस्य वर्षभरात भाजपाला मिळवून दिले. यापैकी अवघ्या ५ लाख सदस्यांनाच नोटबंदीबद्दल मोदींची तारीफ करावीशी वाटली, नोटबंदीच्या निर्णयावर स्वयंस्फुर्तीने आणखी काही सर्वेक्षणे उत्तर प्रदेशच्या दोन हिंदी वृत्तपत्रांनीही केली. एका वृत्तपत्राने ८0 टक्के लोक खूश असल्याचा दावा केला, तर दुसऱ्या वृत्तपत्राने खुशाल मंडळीची टक्केवारी ४५ पर्यंत खाली आल्याचा सावध निष्कर्ष काढला.
     अशी आणखीही काही सर्वेक्षणे येत आहेत, ज्यांचे निष्कर्ष अद्याप जाहीर व्हायचे आहेत. प्रत्येक निर्णयानंतर पंतप्रधानांच्या लोकप्रियतेच्या आलेखाला अशाप्रकारे निवडक जनमताच्या फुटपट्टीने मोजणे, हे प्रसारमाध्यमांचे काम नाही.
         तथापि, सत्ताधाऱ्यांच्या उदात्त चमचेगिरीसाठी काळानुसार माध्यमेही बदलत आहेत, त्याचे हे जिवंत लक्षण!
            देशात आर्थिक क्रांती घडवणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयाचे खरे सूत्रधार, पंतप्रधान मोदी मात्र जितके दिसायला हवेत तितके खूश दिसत नाहीत. अन्यथा गोव्यात अन् गाझिपूरच्या सभेत, डोळ्यात पाणी आणून आपल्या जिवाला किती धोका आहे, याचे भावनाप्रधान दर्शन, समोर बसलेल्या जनतेला त्यांनी घडवले नसते.
           असो, पंतप्रधानांनी पाचशे, हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज तब्बल
१७ दिवस उलटून गेलेत. सरकार आणि रिझर्व बँकेला आपल्या निर्णयातल्या ठळक त्रुटी जसजशा दिसू लागल्या,
सरकारचे धाबे दणाणले. अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम बँकांमध्ये जमा झाली तर निर्णयाच्या समर्थनासाठी केलेले सारे दावेच कोसळतील, या भीतीपोटी दररोज नवनव्या अधिसूचनांचे खलिते प्रसृत होत आहेत.
      आपलेच पैसे काढण्यासाठी ईमानदारीत रांगेत उभ्या असलेल्या प्रामाणिक नागरीकांवर दमबाजीचे सरकारी प्रयोगही सुरू आहेत. जुन्या नोटा
बदलण्याची रक्कम ४ हजारांवरून २ हजारांपर्यंत खाली आली. एका गूढ आदेशाद्वारे अनेक दिवस ग्रामीण भागातल्या सहकारी बँकांचे व्यवहार ठप्प करण्यात आले. नोटा बदलणाऱ्यांच्या बोटावर शाईचे निशाण आले. तरीही बँकांसमोरच्या रांगा ओसरत नव्हत्या. सामान्यजनांनी सारे अत्याचार मुकाटपणे सहन केले. तरीही जुन्या नोटांची सुमारे ६ लाख कोटी रुपयांची रक्कम या काळात बँकांमध्ये जमा झाली.
       राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी ज्या नोटांची तुलना रद्दी कागदाशी केली, त्या १४.५0 लाख कोटी रकमेच्या ५00 आणि हजाराच्या एकूण २२00 कोटी नोटा प्रत्यक्ष चलनात होत्या.
            जुन्या नोटांच्या जागी नव्या नोटा
आणण्यासाठी देशातल्या ४ करन्सी नोट
प्रेसमध्ये तब्बल २ वर्षे नव्या नोटांची छपाई करावी लागेल आणि जवळपास २0 हजार कोटींची रक्कम त्यासाठी
खर्च होईल. याखेरीज देशात २ लाख १५ हजार एटीएम यंत्रे आहेत. या यंत्रांमध्ये २ हजारांच्या नव्या नोटांसाठी नवे ट्रे बसवणे, यंत्राच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक सुधारणा करणे यासाठी १५९३ कोटी रुपये खर्च होतील, आणि दुरुस्तीसाठी आणखी बराच काळ लागेल असा जाणकारांचा अंदाज आहे.
    एटीएम यंत्रातल्या नव्या पार्टसची
बरीचशी खरेदी चीनकडून झाली असून, लवकरच हे पार्ट्स भारतात येतील, या बातमीला बँकेच्या एका प्रमुख अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. नोटांच्या
छपाईसाठी खास प्रकारचा कागद, सिक्युरिटी फिचर्स इंकसाठी भारताला
डेन्मार्कपासून कुवेतपर्यंत सर्व देशांची मदत घ्यावी लागणार आहे. अशाप्रकारे मेक इन इंडियाचे घोषवाक्य देशोदेशी ऐकवणाऱ्या पंतप्रधानांना भारताचे
चलन बदलण्यासाठी अनेक देशांच्या
मेहेरबानीवर अवलंबून रहावे लागणार आहे.
        प्रत्येक मंत्र्याच्या तोंडून अलीकडे कॅशलेस इकॉनॉमी, प्लॅस्टिक करन्सी हे शब्द वारंवार ऐकायला मिळतात. मध्यंतरी स्टेट बँकेसह अन्य काही बँकांचे लक्षावधी डेबिट कार्ड्स एका झटक्यात हॅक झाले. मोदींच्या डिजिटल इंडिया मिशनमध्ये प्लॅस्टिक करन्सीत आपले पैसे सुरक्षित आहेत, या सायबर सुरक्षेची हमी नक्की कोण देणार? केंद्र सरकारने कॅशलेस इकॉनॉमीसाठी विकसित केलेली युनिफाईड पेमेंट इंटरफेस यंत्रणा आहे. तिला बाजूला ठेवून पेटीएम सारख्या कंपन्यांना भरपूर नफा मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
     काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी जे दहशतवादी मारले गेले त्यांच्याजवळ २ हजारांच्या नव्या नोटा मिळाल्या. नव्या चलनामुळे दहशतवाद संपुष्टात येईल, हा दावाही किती पोकळ आहे, हे या निमित्ताने सर्वांच्याच लक्षात आले. नोटांचा आकार, रंग आणि किंमत बदलली म्हणजे भ्रष्टाचाराला आळा बसेल, हे सरकारचे
आणखी एक दिवास्वप्न.
       लोकांना अडवण्याचे अधिकार ज्यांच्या हाती आहेत, तिथे भ्रष्टाचार राहणारच आहे. काळया पैशांच्या समस्येतून जगातले प्रमुख देशही अद्याप मुक्त झालेले नाही. भारतात केवळ नोटबंदीच्या निर्णयामुळे २२५0 अब्ज रुपयांची पर्यायी अर्थव्यवस्था कशी बाद होणार? याचे तर्कशुद्ध विवेचन सरकारपाशी नाही.
      भारतात १४.५0 लाख कोटी रुपयाच्या जुन्या नोटांपैकी जवळपास निम्मे म्हणजे ६ ते ७ लाख कोटींचे चलन, देशातल्या बँका, वित्तिय संस्था, इत्यादींमधे स्टॅटिक स्वरूपात पडून असते. रोखीच्या व्यवहारात उरलेल्या साडे सात लाख कोटींचे चलन बाजारपेठेत फिरत असते. सरकारला अभिप्रेत चलनातल्या ६ टक्के काळ्या पैशांचाही त्यात अर्थातच समावेश असतो. नोटबंदीच्या निर्णयानंतर पहिल्या दहा दिवसात ६ लाख कोटींच्या जुन्या नोटा
बँकांमध्ये जमा झाल्या. ३१ डिसेंबरपर्यंत अद्याप ३५ दिवसांचा काळ बाकी आहे.
      या काळात जुन्या नोटांपैकी ज्या आणखी नोटा बँकांमध्ये जमा होतील त्याची रक्कम मूळ चलनाच्या जवळपास
बरोबरीला आली तरी चलनात काळे पैसे अगदीच नाममात्र होते असे सिद्ध होईल.
मग इतका द्राविडी प्राणायम सरकारने
कशासाठी केला? नोटांची केवळ किंमत
आणि रंग बदलून सरकारने नेमके काय साधले, असा प्रश्न आपोआपच उपस्थित होईल.
      थेट महंमद तुघलघाच्या निर्णयाशीच ज्याची तुलना होऊ शकेल. अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी रोज नवनव्या अधिसुचनांच्या दमबाजीचे फतवे सरकार जारी करीत सुटले आहे, असे जाणकार सांगतात.
       देशभर सध्या रब्बी पिकांच्या पेरण्याचे दिवस आहेत. नोटांअभावी रोख पैशांची चणचण आहे. शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात खरीपाचा शेतमाल विकावा लागला आता रब्बीसाठी बियाणे आणि खतांच्या खरेदीची वणवण आहे. खिशात रोख पैसे नाहीत. ज्यांच्या घरी विवाह सोहळे आहेत, त्यांची तर अक्षरश: तारांबळ उडाली आहे. मालवाहतुकीचे लाखो ट्रक्स रस्त्यांवर अडकले आहेत.नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न २ टक्क्यांनी घसरेल, असे भाकीत मनमोहनसिंगांनी ऐकवले.
     लाखो लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. मोदीजी, तरीही घाबरू नका, जाहीर सभांमध्ये विनाकारण अश्रूही ढाळू नका. ९३ टक्के लोक तुमच्या निर्णयावर खूश आहेत, हे तुमचा अॅपच सांगतो आहे.

=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...