जनरल अरुणकुमार वैद
अत्यंत तडफदार स्वभाव, धोका पत्करण्याची सदैव तयारी आणि आपल्या कमांडमधील जवानांचा पूर्व विश्वास संपादन करण्याची हातोटी.. यामुळेच हा बहाद्दर म्हणजे ‘अरुणकुमार वैद्य’ यांनी लष्करप्रमुख पदापर्यंत पोहोचण्याचे कर्तृत्व गाजविले. मराठी मुलखाला अभिमान वाटावा अशीच जनरल वैद्य यांची कारकीर्द राहिली आहे.
२७ जानेवारी १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले.
१९६५ च्या पाकिस्तान युद्धात खेमकरण सेक्टरमध्ये घमासान लढाई चालू होती. पाकिस्तानी लष्कराला अमेरिकेने दिलेल्या पॅटर्न रणगाड्यांचा कोण अभिमान ! पाकिस्तानच कशाला.. हा रणगाडा अभेद्य असल्याचा अमेरिकेचाही दावा होता.
खेमकरण क्षेत्र हा तसा चिखलयुक्त दलदलीचा भाग. भारतीय सैन्याला त्यांच्या प्रमुखाने धोका पत्करून पुढे जाण्याचा आदेश दिला. अनेक पॅटर्न रणगाडेही जागेवर खिळवून ठेवून त्यांना नष्ट करण्याचा पराक्रमही त्या प्रमुखाच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने केला. त्यानंतर १९६९ मध्ये, पूर्व विभागाचा अधिभार घेऊन याच बहाद्दराने नागालँडमध्ये चाललेली घुसखोरी रोखली. अनेक घुसखोर आतंकवाद्यांनाही त्याने शिताफीने खिंडीत पकडले. १९७१ च्या युद्धातही त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने २० कि.मी. चा प्रदेश सहज काबीज करत पाकिस्तानचे रणगाडे बेचिराख केले होते.
१९४५ मध्ये, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर लगेचच ते लष्करात दाखल झाले. त्यानंतर जानेवारी १९८६ मध्ये, निवृत्त होईपर्यंत त्यांची कारकीर्द सतत बहरत गेली. १९७३ मध्ये, मेजर जनरल, दक्षिण आणि पूर्वोत्तर कमांडचे प्रमुखपद, १९८० मध्ये लेफ्टनंट जनरल अशी अनेक मानाची पदे भूषवित ते अखेरीस लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले. १९८४ च्या जूनमध्ये सुवर्णमंदिरात ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ ही कारवाई झाली तेव्हा लष्करप्रमुखपदी वैद्य होते. त्यांनी खंबीरपणे ही मोहीम यशस्वी केली. पण याच घटनेने दोन वर्षांनंतर त्यांना आपला प्राण गमवावा लागला, कारण शीख दहशतवाद्यांनी पुणे येथे १० ऑगस्टला त्यांची हत्या केली.
निवृत्त होताना जगातील अत्यंत शिस्तबद्ध लष्करासाठी आपण काहीतरी भरीव कामगिरी करू शकलो याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले होते.
No comments:
Post a Comment