शहिद उधम सिंह व मायकल ओडवायर
होमरूल आंदोलनाने निर्माण झालेला असंतोष दडपून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने १९१९ साली रौलट कायदा संमत केला. या अन्यायकारक कायद्याविरोधात पंजाब प्रांतात प्रखर स्वरुप धारण झाले. ब्रिटीश सरकारने हा लढा थांबवण्यासाठी दडपशाहीचे सत्र सुरु केले. ब्रिटीश अधिकारी जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. महात्मा गांधी यांना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. डॉ. सत्यपाल व डॉ. सैफुद्दिन किचलु यांसारख्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली होती. या घटनांच्या निषेधार्थ १३ एप्रिल १९१९ साली अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी जमलेल्या नि:शस्त्र लोकांवर जनरल डायरने बेछूट गोळीबार केला. या हत्याकांडात सुमारे ४०० लोक मारले गेले. असंख्य लोक जखमी झाले. या हत्याकांडास पंजाबचा शासक मायकल ओडवायर जबाबदार होता. १३ मार्च १९४० साली याच पाषाण हृदयी मायकल ओडवायरची क्रांतीकारक उधम सिंह यांनी भरसभेत गोळ्या घालून हत्या केली. आज या क्रांतीकारी घटनेला ७९ वर्षे पुर्ण होत आहेत.
जालियानवाला बाग हत्याकांड घडले तेव्हा उधम सिंह केवळ २० वर्षांचे होते. या हत्याकांडात त्यांनी आपल्या कुटुंबीयांना डोळ्यादेखत मरताना पाहिले होते. या घटनेचा त्यांच्या तरुण मनावर खोलवर परिणाम झाला. या घटनेने त्यांचे आयुष्य पार बदलुन गेले परिणामी त्यांनी जालियानवाला बाग हत्याकांडास जबाबदार असलेल्या मायकल ओडवायरला त्याच्या पापांची शिक्षा देण्याची शपथ घेतली. आता एकीकडे उधम सिंह मायकल ओडवायरची हत्या करण्यासाठी लागणारी सर्व तयारी करु लागले तर दुसरीकडे अमृतसरमध्ये नरसंहार घडवून आणल्यानंतर मायकल ओडवायर आपल्या मायदेशी परतला. या बातमीमुळे उधम सिंह काहीसे नाराज झाले. परंतु त्यांचा निश्चय पक्का होता त्यांनी ओडवायरला थेट ब्रिटनमध्येच घुसून मारण्याचा निर्णय घेतला.
(एलिफंइट बॉय चित्रपटातील दृष्य)
आयुष्यात सर्व प्रकारचे सोंग घेता येते; मात्र पैशांचे सोंग घेता येत नाही. असाच काहीसा अनुभव उधम सिंह यांना येत होता. त्यांचा निश्चय कितीही पक्का असला तरी तो पूर्ण करण्यासाठी लागणारी आर्थिक क्षमता त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी सर्वात प्रथम आर्थिकदृष्ट्या सुदृढ होण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी गाड्या दुरुस्त करण्याचे काम शिकले व स्वत:चे एक गॅरेज सुरु केले. २० वर्षांच्या कठोर संघर्षानंतर त्यांनी परदेशी जाण्यासाठी लागणारे पैसे गोळा केले व ते लंडनसाठी रवाना झाले.
लंडनमध्ये पोहोचल्यानंतर तेथे स्थिरस्थावर होण्यासाठी त्यांनी सुतारकाम, जाहिरातींचे फलक रंगवणे, गाड्या दुरुस्त करणे यांसारखी अनेक लहान मोठी कामे केली. दरम्यान त्यांना ‘द फोर फेदर्स’ व ‘एलिफंट बॉय’ या दोन हॉलीवुडपटात अभिनय करण्याची संधीदेखील मिळाली. एलिफंट बॉय चित्रपटाचे दिग्दर्शक झोलटन कोर्डा उधम सिंह यांचा अभिनय पाहून फार प्रभावीत झाले होते. त्यांनी ‘द थीफ ऑफ बगदाद’ या आपल्या अगामी चित्रपटासाठी उधम सिंह यांची निवड केली होती. परंतु मायकल ओडवायरची हत्या करण्याच्या उद्देशाने आलेल्या उधम सिंह यांनी या चित्रपटात काम करण्यास साफ नकार दिला.
( ब्रिटीश पोलिसांनी क्रांतीकारी उधम सिंह यांना अटक केली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. )
ब्रिटनमधील रॉयल सेंट्रल असोसिएशन नामक एका संस्थेने १३ मार्च १९४० साली कॉक्सटन सभागृहात एक सभा आयोजित केली होती. या सभेला अनेक ब्रिटीश अधिकारी व उद्योगपती उपस्थित राहणार होते. मायकल ओडवायरलाही या सभेचे आमंत्रण मिळाल्याची बातमी उधम सिंह यांना मिळाली. याच सभेत सर्वांच्या देखत त्या नराधमाला मारण्याचा निर्णय उधम सिंह यांनी घेतला. एका जाड पुस्तकात त्यांनी बंदुकीच्या आकाराचा खड्डा केला व त्यात बंदूक लपवून ठेवली. हे पुस्तक घेउन ते सभागृहात पोहोचले. मायकल ओडवायरला पाहताच उधम सिंह यांच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा ती घटना उभी राहिला आणि संताप झाला. २० वर्षांपूर्वी घडलेल्या जालियानवाला बाग हत्याकांडाची दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर तरंगू लागली. त्या निर्दोष भारतीयांच्या किंकाळ्या, रडण्याचे आवाज, मदतीची याचना त्यांच्या कानात घुमू लागली. सभा संपेपर्यंत त्यांनी कसेबसे स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवले. परंतु सभा संपताच त्यांच्या भावनांचा बांद फुटला. त्यांनी मायकल ओडवायरला जोरदार हाक मारली व सर्वांच्या समक्ष त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा आवाज ऐकून सभागृहात एकच गोंधळ माजला परंतु या गोंधळाचा फायदा घेउन क्रांतीकारी उधम सिंह तेथून पळाले नाहीत. ते तिथेच थांबले. परिणामी पोलिसांनी त्यांना अटक केली. आणि काही दिवसांतच त्यांना फाशी देण्यात आली
No comments:
Post a Comment