Wednesday, April 3, 2019

HARMONAL IMBALANCE (परिवर्तन)

नेहमीप्रमाणे तो गजर आजही झाला...
आज जरा जास्तच कर्कश...
हात लांब करून तिने त्याचा आवाज बंद करून टाकला...
डोळे किलकिले करून बघितले ... बाजूला नवरा मस्त घोरत होता....
निष्पाप लहान मुलासारखा...हो! 
पण फक्त झोपलाय तोपर्यंतच हा... 
आज उठायचा अगदी कंटाळा आला होता...
वाटत होतं असेच त्याच्या कुशीत शिरावे आणि गुरफटून पुन्हा झोपून जावे....
पण...
डोळ्यापूढे दिसत होता कामाचा ढीग...
शेवटी आळस झटकून उठलीच ती... एकीकडे चहाचे आधण ठेवून व्हाट्सअप्प वर मेसेज बघू लागली...
सगळ्या पोस्ट आज भयंकर...
डिप्रेसिंग....
अरे हे जीवन सर का इतके निराशावादी आहेत....
कायम रडक्या कविता.... 
आशावाद कसा तो नाहीच कधी... कॉलेज चा ग्रुप कायम चर्चेने भरलेला... काय उपयोग त्या चर्चेचा....
ह्या उलट शाळेच्या ग्रुपवर फक्त उपदेशाचे डोस वाले मेसेज ....
आणि त्या पालविने ही आज कविता का बरे पाठवली नाही...
सकाळी सकाळी तिची कविता वाचून छान फ्रेश वाटते ...
पण आज तिचाही मूड नाही की काय माझ्यासारखा?... 
चला जाऊदे!!
चहा घ्यावा आणि कामाला लागावे.... शी!!
हा चहाही आज बंडल झालाय....
साखर अंमळ जास्तच पडली.... 
भराभर सवयीने कामे हाता वेगळी करून टाकली....
पण आज उत्साहच वाटत नव्हता....
वाटतं होत आज सुट्टी घ्यावी मस्त, आराम करावा ...
पण बॉस चा काळ्या गुलाबजाम सारखा चेहरा आणि त्या वरचा तो नाकावरचा चष्मा...
त्यातून वटारलेले डोळे नजरेसमोर आले.... 
आज Presentation द्यायचे होते...
कुठल्याही परिस्थितीत जाणे गरजेचे... कपाटातला एकही ड्रेस आज घालावा वाटेना....
तेच तेच रोज रोज...
शेवटी हाताला लागेल ती कुरती काढली....
जाताना टिकली टेकताना क्षणभर आरशात पाहीले....
आज चेहराही का असा उदास वाटतोय...
प्रसन्न नाही दिसत....
थकलेला,ओढल्या सारखा....
जाऊदे....
वेळ कुठे आहे इथे स्वतःची कौतुक करायला....
नेहमीची ट्रेन चुकली तर पुन्हा late mark.... 
धावत पळत का होईना ट्रेन तर मिळाली....
पण तिची window seat मात्र हुकली...
चालतय ...
जाऊदे!! 
बसल्या बसल्या मनात विचार सुरू झाले...
रोज आपण साधारण किती वेळा जाऊदे म्हणतो? ... 
हल्ली जरा जास्तच का?....
काय होतंय हे असे?....
एखाद्या situation पासून पळतोय का आपण?....
वाद घालावा ही वाटतो आणि वाद घालायचा कंटाळा ही येतो.... 
आपल्या पेक्षा दुसऱ्यांची मने जपताना स्वतःकडे दुर्लक्ष करतोय का?...
अपमान गिळतोय का? ....
आणि मग त्याचा त्रास होऊन जास्तच चिडचिडतोय का????....
जाऊदे! 
स्टेशन वर उतरल्यावर नेहमीची गजरेवाली दिसली...
"घे गो बाय,आज तुझ्यासाठी मोगरा आणलाय"....
रोज टेबलावर एका काचेच्या बाउल मध्ये तिची घमघमता गजरा ठेवायची सवय...
दिवसभर मग त्या फुलांचा मस्त गंध साथ द्यायचा....
पण आज तोही न घेता ...
गजरेवालीला नाराज करत भराभर ऑफिसला पोचली. 
कामाला स्वतःला जुंपून घेऊन...
मधे मध्ये फोन अटेंड करत presentation ही बनले...
सवयीने ते उत्तम झाले पण तरीही समाधान देईना...
काहीतरी अजून हवय हे फीलिंग....
जाऊदे!! 
झाले एकदाचे.... 
समोर काचे आडून नाकावरच्या चष्म्यातून बघणाऱ्या बॉस ला तिने ते पाठवून दिले...
मनात एक विचार ...
ह्याच्या नाकावर एक ठोसा लगावून द्यावा काय....
जेव्हा तेव्हा मेला बघत असतो....
हावरट हिरवा म्हातारा ...
आणि मग सवयीने ओढणी नीट केली गेली... 
तोंड मग नेहमीप्रमाणे file मध्ये खुपसून इतर कामांचा आढावा घेत होते...
पण आज मनच लागत नव्हते... 
तिची बाजूवाली मैत्रीण ही आज गायब होती...
लंच time झाला पण आज जेवायची ईच्छाही मरून गेलेली....
उघडलेला डबा चक्क बंद करून टाकून तिने एक कडक कॉफ़ी ऑर्डर करून टाकली आणि शून्य नजरेने आजूबाजूला न्याहाळत बसली...
माहीत नाही का आज उत्साहच वाटत नव्हता...
आजूबाजूच्यांची तोंडेही तिला आज तशीच दिसत होती...
उदास उदास....
काय करू बरे?....
हे असे का होतंय हल्ली?...
कारण नसताना उगाच डोळे भरून येतात....
जीव कासावीस होऊ लागतो....
काही समजेना झालंय...
उगाचच बिचारे बिचारे अगतिक वाटू लागले.... 
शी!! 
आज उगाच आले कामावर...
हाफ डे मारावा आणि सरळ घरी जावे...
आणि मस्त ताणून द्यावि काय ह्या विचारात असतानाच फोन वाजला...
unknown number....
आता कोण बोअरिंग म्हणून तिने उचलला... 
आणि समोरून अति उत्साही आवाज... "Hi, शम्या"... अति उत्साहाने फोन पडायचा बाकी होता....
समोर ती ...
"साले आहेस कुठे? लग्न काय केलंस, मेहेरबानी केलीस काय?एक दिवस तरी आठवण आली का माझी?'...
समोरच्या बंदुकीतुन सटासट गोळ्या सुटत होत्या आणि ही फक्त हसत होती... 
"ते काही नाही ,आपण आज भेटतोय... मी येते 4 ला तुझ्या ऑफिस ला....
,adress दे...
मस्त कुठेतरी बसू....
गप्पा मारू....
खूप pending stock आहे.
" शप्पत!! विश्वासच बसत नव्हता...
तब्बल पंचवीस वर्षांनी त्या दोघी पुन्हा भेटणार होत्या....
कॉलेज मध्ये दोघींनी मिळून अक्षरशः धुमाकूळ घातला होता....
साहित्य आणि कला म्हणजे त्यांचे आवडते क्षेत्र...
आणि ह्या दोघी तिथल्या कायम ऍक्टिव्ह मेंबर्स....
पूढे शिक्षणा साठी ती अमरिकेला गेली...
आणि ही लग्न करून आवडत्या फर्म मध्ये नोकरीला लागली...
मध्ये संपर्क तुटला....
नवरा घर संसार मुले ह्यात महिने वर्षे भराभर उलटत गेली......
आणि आज पुन्हा दोघी भेटणार होत्या.....
अक्षरशः झंझावात होती श्रुती... समोरच्या ला बाटलीत कसे उतरवायचे ते अगदी बरोबर जमायचे तिला....
उरला दिवस मस्त गेला...
बरोबर 3.45 ला बॉस ची permission वगैरे घेऊन ती निघाली....
निघताना तोंडावरून compact चा हात आणि ओठावर हलकेच लिप्सटिक लावायला मात्र ती विसरली नाही..... किती वर्षांनी बघत होते....
समोर श्रुती उभी ...
रेड टॉप त्यावर feded जीन्स...
गळ्यात स्कार्फ...
केसाना मस्त र्बगंडी colour.....
त्याचा पोनिटेल आणि तोंडावर तेच खट्याळ आणि दिलखुलास हसू....
भर रस्त्यातच हात पसरून दोघीनी घट्ट मिठी मारली आणि टचकन डोळ्यात पाणीच आले....
श्रुतीचा आवाज ही थोडा कातर झालेला ....
पण लगेच स्वतःला सावरून,....
चल शम्या...
मस्त हादडूया....
कडक तुला आवडते तशी कॉफी घेवूया आणि समुद्रावर जाऊन बसूया...
हे ही तिचे नेहमीसारखे अगदी माझ्या मनातले विचार बोलून दाखवल्या सारखे.... 
दोघींची स्थिती सारखीच...
किती बोलू, किती विचारू,काय करू काय नको अशी...
काय खातोय, काय पितोय समजत नव्हते.....
दोघी नुसत्या सुटल्या होत्या....
आनंदाची लागण झाल्या सारख्या अविरत खिदळत.... 
घरी फोन करून सांगून टाकले ...
आज उशीर होईल....
नवरा समजूतदार होता....
म्हणाला काळजी नको....
आम्ही बघून घेऊ...
मजा कर....
फ्रेश हो.....
तो तसे बोलल्या वर अजून रिलॅक्स वाटले...... 
आणि मग मस्त दोघी समुद्रावर...
कितीतरी दिवसांनी असे निवांत क्षण मिळत होते...
हवेहवेसे.... 
दोघी निःशब्द होऊन लाटांची आवर्तने बघत होत्या.....
आणि अचानक दोघींची नजरानजर झाली....
इशारा पुरे होता.... 
हसत खिदळत एकमेकींवर पाणी उडवत....
लाटांनी लाजावे इतक्या उत्साहाने ओसंडत...
कितीतरी वेळ पाण्यात मस्ती करत....
आजूबाजूला लक्ष नाही....
बस स्वतः मध्ये असलेल्या त्या.... 
आज खूप वर्षानी मुक्त होत होत्या...
पुन्हा जगत होत्या. एक postive energy ची देवाण घेवाण झाली होती आणि दोघी मस्त charge झाल्या होत्या.... 
सकाळचे ते उदास क्षण,ओढलेला चेहरा....
सगळे गायब होऊन तिथे आता नवीन चेहरा दिसत होता.... 
खूप दिवसांपासून हे असे काहीतरी हवे होते....
पण काय समजत नव्हते.....
आणि आज अचानक ते सूर गवसले होते....
गुरुकिल्ली मिळाली होती. परत घरी जाताना ती सकाळची शमिका गायब झाली होती....
आताची ही शमी वेगळीच होती....
गजरेवाली अजूनही तिथेच होती....
तिच्या कडून चांगले सात आठ गजरे घेऊन.....
त्यातले चार तिच्या डोक्यात माळ सांगून उरलेले पर्स मध्ये टाकून ती निघालिही....
गजरेवाली तोंडाचा आ वासून बघत बसलेली आणि हिच्या ओठी मात्र एकच गीत, "आज मै उपर आसमा नीचे,आज मै आगे जमाना है पिछे" ?

तळटीप--मित्र,मैत्रिणींनो आयुष्य ह्या वळणावर थोडे त्रास देत असते...
haramons थोडे परिवर्तन घडवत असतात...
तुमच्या सहचारिणीला....
आजूबाजूच्या सहकारी स्त्री वर्गाला मैत्रिणींना...
फार नाही,थोडेसे समजून घ्या. आणि मग बघा कसे positive परिवर्तन होतंय ते.



-संग्रहित पोस्ट

आंतरजालावरून साभार

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...