'भारतीय स्त्री'ला शिक्षणाचे द्वार उघडे करुन देणाऱ्या सावित्रीबाई फुले ह्या एक उत्तम कवियत्री होत्या.महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवतानाच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक कवितेचीही परंपरा रुजवली. त्यांच्या काव्यप्रतिभेची करून दिलेली ओळख...
सावित्रीबाईंचे 'काव्यफुले' आणि 'बावन्नकशी सुबोध रत्नाकर' असे दोन कवितासंग्रह अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. पहिला काव्यसंग्रह 'काव्यफुले' हा १८५४ साली, तर दुसरा काव्यसंग्रह हा १८८२ साली प्रसिद्ध झाला.
सावित्रीबाईंनी आपल्या काव्यात अनेक विषय हाताळले आहेत. त्यांच्या काव्यात प्रेम, करुणा, सामाजिक जाणीव आणि बंधुतेचे सूत्र आपल्याला आढळून येते. त्यांचे काव्य सत्याचा शोध घेऊन सत्याची कायमच पाठराखण करताना आपणास दिसते.
'काव्यफुले' हा काव्यसंग्रह शिलाप्रेसवर छापलेला असून मुखपृष्ठावर शंकर-पार्वतीचे चित्र आहे. या काव्यसंग्रहाची छपाई मिशनरी छापखान्यात झाल्याचे नमूद आहे. या काव्यसंग्रहातील बारा कवितांचे सावित्रीबाईंनी मोडी लिपीत केलेले कच्चे टाचण उपलब्ध झालेले आहे, ही अभ्यासकांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. या काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत.
राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचे कार्य आज अनेक प्रतिभांच्या उड्डाणाचे आकाश झाले आहे. ज्योतिबांचे कार्य अनेकांना ऊर्जा पुरवित आहे आणि हा ऊर्जेचा प्रवाह आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. सावित्रीबाईंनीदेखील आपल्या काव्यप्रतिभेने ज्योतिबांना पुढील शब्दांत वंदन केले आहे-
'ज्योतिबांना नमस्कार। मनोभावे करतसे
ज्ञानामृत आम्हा देई। आशा जीवन देतसे
थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी
ज्ञान ही ईर्षा देई। ती आम्हाला उद्धरी... (ज्योतिबांना नमस्कार)'
'माझ्या जीवनात। जोतिबा स्वानंद।।
जैसा मकरंद। कळीतला... (संसाराची वाट)'
पती म्हणून ज्योतिबांचे स्थान सावित्रीबाईंच्या जीवनात आहेच, पण त्याही पलीकडे एका कार्यरत आणि द्रष्ट्या ज्योतिबांचे चित्रण सावित्रीबाईंनी केले आहे. ज्योतिबा हे त्यांचे आदर्शस्थान आहेत, मार्गदर्शक आहेत. ज्योतिबांचा त्याग, त्यांची धडाडी आणि प्रज्ञा, त्यांची अमला करुणा, सामाजिक दायित्वाची त्यांची उत्कटता या साऱ्यांची तप्त खोल जाणीव सावित्रीबाईंना आहे. शूद्र-अतिशूद्रांच्या उत्थानासाठी आपले अवघे आयुष्य ज्योतिप्रमाणे जाळणाऱ्या या महामानवाचे महत्त्व समाजबांधवांना सांगताना सावित्रीमाई लिहितात-
'ज्योतिबांचे बोल। मनात परसा
जीवाचा आरसा। पाहते मी
सेवेच्या भावाने। सेवा जे करती
धन्यता पावती। मानवात' (ज्योतिबाचा बोध)
खरा प्रतिभवान कधीच रंजनवादी नसतो. आपल्या प्रतिभेचा उपयोग तो नेहमीच समाजहितासाठी करतो. सावित्रीबाईंनीही आपल्या काव्यप्रतिभेचा उपयोग बहुजन समाजाच्या कल्याणासाठी केला आहे. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाच्या, शूद्रांच्या जीवनात बदल घडून येणार नाही, हे त्यांनाही उमगले होते. म्हणूनच पुढील शब्दांत त्यांनी अक्षरांचा श्रम केला आहे-
'शूद्रांना सांगण्याजोगा। आहे शिक्षणमार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व। पशुत्व हाटते पहा' (शूद्रांचे दुखणे)
'विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन' (श्रेष्ठ धन)
'उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा
परंपरेचि गुलामगिरी ही तोडणेसाठी उठा
बंधूंनो, शिकण्यासाठी उठा ' (शिकण्यासाठी जागे व्हा)
मनूने या देशात एक मानवद्रोही समाजव्यवस्था निर्माण केली. मनुवाद्यांनी ती प्रस्थापित आणि प्रतिष्ठित केली. शेकडो पिढ्यांची आयुष्ये या मनुवादी संस्कृतीने बरबाद केलेली आहेत. अमानुषतेचा, क्रौर्याचा एवढा कळस दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीत आढळत नाही. मनुचे हे अपरंपरा क्रौर्य पाहून कवयित्री सावित्रीमाईंचे हृदय हेलावले आहे. मनुचा हा कपटी कावा लोकांना कळावा म्हणून त्या लिहितात-
'शूद्र जन्म घेती। पूर्वीची पापे ती।
जन्मी या फेडती शूद्र सारे
विषम रचती समाजाची रीती
धूर्ताची ही नीती। अमानव...' (मनू म्हणे)
'दोन हजार वर्षांचे। शूद्रा दुखणे लागले
ब्रह्मविहित सेवेचे। भू - देवांनी पछाडले
(शूद्राचे दुखणे)'
सामाजिक कवितेबरोबरच या कवितासंग्रहात काही हळुवार अशा कविताही आहेत. अवतीभवतीच्या निसर्गनोंदी सावित्रीमाईंच्या कवीमनाने नजाकततेने चित्रीत केल्या आहेत. त्यांची निसर्गाविषयी असलेली स्वाभाविक ओढ, सूक्ष्म निरीक्षणदृष्टी यातून प्रतीत होते. त्यांच्या 'पिवळा चाफा', 'जाईचे फूल', 'फुलपाखरू' या कविता उल्लेखनीय आहेत. अत्यंत तरल अशा शब्दकळेतून या कविता रसिकांपुढे येतात.
'पिवळा चाफा
रंग हळदीचा
फुलला होता
हृदयी बसतो
(पिवळा चाफा)'
'फुल जाई
पहात असता
ते मज पाही
मुरका घेऊन
(जाईचे फूल)'
१८८२ साली जोतिराव फुल्यांच्या मृत्यूनंतर 'बावन्नकशी सुबोध रत्नाकर' हा सावित्रीमाईंचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. हा काव्यसंग्रह म्हणजे जोतिराव फुले यांचे अधिकृत असे पहिलेच काव्यमय चरित्र होय. या काव्यसंग्रहामध्ये ५२ कडवी आहेत. कदाचित म्हणूनच बावन्नकशी असे नाव दिलेले असावे. या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी प्राचीन मध्यमयुगीन कालखंडाचा इतिहास सांगितला आहे. तसेच पेशवाईने केलेले अत्याचार चित्रीत केले आहेत.
'पुढे पेशवाई तिचे राज्य आले
अनाचार देखी अती शूद्र भ्याले
स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते
खुणा नाश या ढुंगणी झाप होते' (पेशवाई)
उपेक्षितांच्या जागरणाचा वसा घेऊन सावित्रीमाईंनी केलेली काव्यरचना पाहून आपले मन भरून येते. त्यांचे काव्य म्हणजे मराठी भाषेतील क्रांतिकाव्यच होय. कारण असे काव्य त्या काळात अन्य कोणत्याही स्त्रीने लिहिलेले नाही.
लोकशिक्षणासाठी कवितांचा एक माध्यम म्हणून त्यांनी उपयोग केला आणि मराठी साहित्यात एक अक्षरवाङ्मयाची भर पडली. त्यांच्या या कविता अनेक पिढ्यांच्या प्रतिभेला प्रबोधनाची प्रेरणा देत राहील, यात शंका नाही.
तयास मानव म्हणावे का?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?
दे रे हरी पलंगी काही
पशुही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार काही
तयास मानव म्हणावे का?
पोरे घरात कमी नाही
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?
सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का?
दुसऱ्यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सद्गुन नाही
तयास मानव म्हणावे का?
ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?
बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का?
पशुपक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वांनाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?
***
'महार मांगांच्या दुःखाविषयी' हा निबंध सावित्रीबाई व जोतिबा फुले यांच्या शाळेत शिकणाऱ्या मुक्ताबाई या चौदा वर्षांच्या मुलीने लिहिला. १८५५मधे. त्याची प्रत आत्ता माझ्या हाताशी नाहीये, खरं म्हणजे तो निबंध आजच्या निमित्ताने इथे नोंदवायचा होता.
No comments:
Post a Comment