लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये काही क्षण अनपेक्षितपणे सुखावणारे असतात, तर अनेक क्षण आपल्याला मनसोक्त हसवून जातात. माझ्या मते आपल्यातील प्रत्येकजण अशा सुखद क्षणांची अनिवार ओढीने वाट बघत असतो. पण ह्या सुखानुभूतीसाठी इतर घटकांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच पुढाकार घेऊन काही केले तर? आयुष्याचा आस्वाद घेत असताना आपल्या भोवताली जर आपण हास्याचे, आनंदाचे व मोकळेपणाचे वातावरण निर्माण करू शकलो तर? असे म्हणतात, की जे जे तुम्ही इतरांसाठी कराल, ते ते तुमच्याही वाट्याला येईल! मग ते चांगले असो अगर वाईट. जर आपण इतरांच्या चेहर्यावर आपल्या कृतीने किंवा शब्दांनी काही काळासाठी का होईना, आनंदाचे भाव किंवा समाधान फुलवू शकलो तर त्यातून मिळणारे सुख हे वर्णनाच्या पलीकडचे असते. प्रत्येक घरात हे कार्य कोणी ना कोणी करत असतेच! पण आपल्या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन जगात वावरताना आपण ही आनंद पसरविण्याची वृत्ती अंगिकारू शकलो तर काय बहार येईल!
फार दूर जायचीही गरज नाही! रोज कार्यालयात जाता- येता, बस/ लोकल/ वाहनाने प्रवास करताना तुमची गाठ रस्त्यावरच्या पोलिस मामापासून, बस वाहक, सहप्रवासी, फेरीवाले अशा अनेक लोकांशी पडत असते. कधी पोलिस मामाला किंवा बस वाहकाला मनापासून धन्यवाद आणि एखादा प्रशंसोद्गार बहाल करून बघा! किंवा त्यांना कौतुक म्हणून चॉकलेट वा फूल देऊन पाहा.... तुम्हालाच कळेल मी काय म्हणत आहे ते! इथे मला माझ्या आजोबांचे उदाहरण द्यावेसे वाटते. अनेक वर्षे ते न चुकता, दर संक्रांतीला घरी खास तिळगूळ बनवून घ्यायचे आणि डेक्कन जिमखाना बस आगारातील सर्व बसचालक व वाहकांना अगत्याचे व कौतुकाचे चार शब्द बोलत तो आपल्या हाताने वाटायचे. आज विचार केला तर जाणवते की अशी काय गरज होती त्यांना वर्षानुवर्षे हा उपक्रम राबविण्याची? पण त्यांना ह्या सर्व लोकांचे, त्यांच्या कष्टांचे अतिशय कौतुक वाटायचे. भाजी-मंडईतील गाळेधारकांकडे काम करणार्या श्रमिकांचेही ते तसेच कौतुक करायचे. त्यांचे ते प्रशंसेचे दोन शब्द आणि प्रेमाने खाऊ घातलेला तिळगूळ त्या श्रमिकांच्या मनात तर आनंद फुलवायचाच, पण त्याहीपेक्षा अधिक आनंद माझ्या आजोबांना झालेला असायचा! त्यांचा खुललेला चेहरा व समाधानाचे हास्यच बरेच काही सांगून जायचे!
लोकप्रियता सर्वांनाच हवीहवीशी वाटते. माझ्या मित्रमैत्रिणींच्या टोळक्यात काहीजण विलक्षण लोकप्रिय आहेत. त्यांच्या ह्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण म्हणजे ते सतत इतरांना हसवत असतात. कधी स्वतःच्या कृतीतून, कधी फालतू विनोद सांगून किंवा कधी जाणून-बुजून वातावरण हलके करण्यासाठी मजेशीरपणे वागून! अशा लोकांच्या सान्निध्यात मनावरचे ताण दूर होण्यास आपोआप मदत होते. रोजच्या कटकटींना, तणावाला कंटाळलेल्या मनांना नवा उत्साह देण्यासाठी हास्याचे हे काही क्षण पुरेसे असतात. शिवाय कधी कोणी आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला किंवा तिला लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा देणे, त्या व्यक्तीच्या घरच्यांना काही मदत हवी असेल तर ती पुरविणे, ओळखीत कोणावर काही अवघड परिस्थिती ओढवली असेल तर प्रत्यक्ष भेटून, बोलून किंवा लिहून त्यांचे मनोबल वाढविणे अशा अनेक प्रकारे हे धडपडे वीर आपल्या आजूबाजूला आनंद पेरत असतात. आणि तेही कोणताही वेगळा आव न आणता! त्यांच्या ह्या सहज, साध्या वागण्यात एक प्रकारचे अनोखे सौंदर्य लपलेले आहे. आणि त्यातच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे.
आमचा एक दोस्त असाच सर्वांना हसविणारा! एकदा ह्या पठ्ठ्याला एका गाडीने ठोकले आणि रुग्णालयात पायाला व हाताला प्लॅस्टर घातलेल्या अवस्थेत मुक्काम ठोकायची वेळ आली. इतर मंडळींना कळल्यावर त्यांनी लगेच आमच्या दोस्ताला त्याची हालहवाल विचारण्यासाठी फोन करून अक्षरशः बेजार केले. खरं तर तो तेव्हा वेदनेने इतका कळवळत होता, पण तरीही आपल्या धारातीर्थी अवस्थेचे मनोरंजक वर्णन करून तिथेही त्याने इतरांना हसविले. त्याच्यातील ती सकारात्मक ऊर्जा पाहून त्याच्या बाजूच्या खाटेवरच्या रुग्णालाही नवा हुरूप आला. अप्रत्यक्षपणे आमच्या मित्रवर्यांनी त्या रुग्णाला मदतच केली होती!
मी लहान असताना आजी सांगायची, रोज एखादे तरी सत्कृत्य करावे. तेव्हा मनोमन प्रश्न पडायचा, हे ''सत्कृत्य'' नेमके असते तरी काय? मग पुढे कधीतरी उलगडा झाला, की जे कृत्य आपल्या हातून निरपेक्षपणे, चांगल्या भावनेने व दुसर्याच्या भल्यासाठी केले जाते ते असते सत्कृत्य! देवळाच्या दारात बसलेल्या भिकार्याच्या हातातील भिक्षापात्रात पैसे टाकताना एकीकडे मनात पाप-पुण्याची आकडेमोडही चालू असते. पण कोणा अडलेल्या व्यक्तीचे एखादे काम तुम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता जर केलेत तर ते नक्कीच ''सत्कृत्या''च्या व्याख्येत बसेल. अगदी घरातल्या एखाद्या जबाबदारीपासून, ते बाहेरचे असे कोणतेही काम, जे आपल्यावर सोपवलेले नाही व ते काम आपण करण्याची कोणाची अपेक्षाही नाही! खूप मजा येते अशी कामे हुडकून काढायला व ती बिनबोभाट पार पाडायला.... आपले डोळे उघडे ठेवायचे, बस्स! आणि असे काम पार पाडल्यावर मिळणारी अनुभूतीही काही औरच असते.
अनपेक्षित ठिकाणी सौंदर्य हुडकण्यातही अनेकजण निपुण असतात. कधी आपल्या लेखणीतून, तर कधी कॅमेर्यातून, तर कधी कुंचल्यातून, ते असे सौंदर्यक्षण बेमालूमपणे टिपतात आणि त्यांचा आनंद इतरांमध्ये वाटतात. ही सौंदर्यदृष्टी, प्रत्येक गोष्टीतील बलस्थाने हेरण्याची त्यांची ताकद नकळत आपल्यालाही सकारात्मक दृष्टिकोन देते. एखाद्या विशिष्ट कोनातून, विशेष प्रकाशात सर्वसामान्य वाटणार्या गोष्टी किती सुंदर भासू शकतात, नेहमीचेच चेहरे किती भावस्पर्शी दिसतात, ह्याची जाणीवही विलक्षण आनंद देणारी असते! रोजच्याच आयुष्याला कोणी जर निराळ्या, वेधक शब्दांमध्ये मांडले किंवा अनोख्या रंगच्छटांमध्ये रंगविले तर तो प्रत्ययही सुखावून जातो. कोणी कधी विपत्राद्वारे किंवा लघुसंदेशाने पाठवलेला एखादा सुविचार किंवा विनोद सार्या दिवसाचा नूरच पालटून टाकतो.
अचानक मिळालेली भेटवस्तू किंवा शुभेच्छा-पत्र जसे मनाला हर्ष देतात त्याचप्रमाणे निसर्गाचा अनपेक्षित सहवास, स्वतःशीच साधलेला संवाद, जुनी कवितांची वही, खूप दिवसांनी भेटणारे मित्रमैत्रिणी, इतर काही वस्तू शोधताना मिळालेले लहानपणीचे प्रगतिपुस्तक, अशा अनेक लहान-लहान गोष्टी आपल्या आयुष्यातील कितीतरी क्षण सुंदर बनवीत असतात. अतीव दुःखाच्या काळातही स्नेहाचा आश्वासक स्पर्श, मनाला उभारी देणारे दोन शब्द किंवा एखादी मूक कृतीही मनावर हळुवार फुंकर घालते. आपण कोणाच्या पोळलेल्या मनावर जर अशी फुंकर घालू शकलो तर त्यातही एक प्रकारचे समाधान दडलेले असते. आयुष्य सुंदर आहे. त्याला अजून सुंदर, चैतन्यमयी व आल्हादपूर्ण बनविण्यासाठीचे मर्मही आपल्याच जवळ आहे! फक्त 'मी, मी', 'माझे, माझे' करत संकुचितपणे आयुष्य जगण्यात अन्यथा काय हशील आहे? स्वतःबाहेर डोकावून इतरांच्या आयुष्यात आनंद पेरण्यात आपलाही व्यापक स्वार्थ आहेच!
चला तर मग, आयुष्याला अजून सुंदर करुया.
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
No comments:
Post a Comment