स्त्रीचे संरक्षण करण्याची ब्याद नको म्हणून तिला बुरखा घालायला लावणारे, नाहीतर तिचा बालवयातच विवाह उरकून टाकणाऱ्या लोकांना मर्द कसे म्हणायचे ? जाहिरातीतून, सिनेमा-टिव्हीतून स्त्रीदेह म्हणजे एक भोग वस्तू आहे याचाच प्रचार केला जातो. मग युवावर्गात स्त्रीला एकटीला गाठून तिच्यावर बलात्कार करणे हे समर्थनीय आहे, अशी भावना होण्यास पुरूषप्रधान समाजच जबाबदार नाही का ? स्त्रीने काय करायचे, कसे वागायचे, कुणाशी बोलायचे हे सगळे पुरूषच ठरवतात. आणि तीचे संरक्षण करण्याऐवजी जमतील तसे धिंडवडेही काढतात. या दुटप्पीपणाला काय म्हणायचे ? धर्म आणि रुढी यांच्या पायावर उभी असलेली खाप पंचायत बलात्कार करणाऱ्यावर बहिष्काराचे शस्त्र उगारीत नाही, तर बिचाऱ्या बलात्कारित स्त्रीलाच बहिष्कृत केले जाते. हा कोणता न्याय आहे ?
एकीकडे स्त्रीला देवी मानायचे.... दुर्गा म्हणून पुजायचे आणि दुसरीकडे मात्र स्त्रीचा गर्भ खुडून टाकायचा, स्त्रीचा हुंड्यासाठी छळ करायचा, तिला चूल आणि मुल यातच अडकवून ठेवायचे, तिच्यासाठी ज्ञानाची कवाडे बंद करून ठेवायची हा किती विरोधाभास? एवढे सारे करून आपण सर्व लोक देवीच्या देवळात जायचे धाडस करतो... नवरात्र, दुर्गाष्टमी साजरी करतो हे नवलच आहे.
सावित्रीबाई फुले यांच्यामुळे गेल्या काही वर्षात स्त्री शिकू लागली.शिक्षण, अर्थार्जन असे टप्पे घेत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारे कसे तिच्या मनासारखे झाले. पण तिचे जळणे, सोसणे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार थंबला का ? वर्तमानपत्रातील बलात्काराच्या बातम्या,हुंडाबळी आणि मारहाणीच्या बातम्या ओरडून,किंचाळून सांगताहेत की, स्त्रीचे जळणे अद्याप सुरू आहे.
उच्च विद्याविभूषित आणि भरमसाठ पगार घेणारी स्त्रीसुध्दा कधीकधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचे पाऊल उचलते. स्वत:ला आधुनिक समजणार्या प्रथितयश अभिनेत्रीनासुध्दा स्त्रीदेहाचे प्रदर्शन आणि कधीकधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही.हे सारे पाहिले की वाटते, आजही स्त्रीचे सती जाणे सुरूच आहे.फक्त त्याचे स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलली आहे. स्त्री खरेच मुक्त झाली आहे का ?
==============================================
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा.आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!
No comments:
Post a Comment