*चळवळीची नाळ ओळखा तरच चळवळीला भविष्य देऊ शकाल.*
*जो आंबेडकरी माणूस आंबेडकरी पक्षाला मतदान करीत नाही तोच आंबेडकरी चळवळीचा खरा शत्रू*
आम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून खूप लिहीतो, वाचतो, चर्चा करतो. भाषणांमधून गळाफाळ *न कळलेली आंबेडकरी चळवळ* मांडतांना आपण चळवळीचे नुकसान करीत आहोत हे न कळणारी पिढी पैदा होऊन गेली. पण तुम्ही तरी ती चुकी करू नका. चळवळीची नाळ ओळखा.
आपण आंबेडकरी नावावर स्थापन झालेल्या किंवा स्वतःला आंबेडकरी म्हणणाऱ्या पक्षांना टिका करण्यात व आपसात भांडण्यात खूप मोठा वेळ वाया घालविला. आंबेडकरी विचार मानणाऱ्या लोकांनी (५-२ कार्यकर्ते सोबत घेऊन मिरविणाऱ्या जवळपास सर्वांनीच) साऱ्यानींच पक्ष स्थापन केले. या साऱ्या पक्ष संस्थापकांना न कळणाऱ्या वयातच पक्ष स्थापन करायला प्रोत्साहन देऊन रसद पुरविणारी माणसे आपल्या दृष्टीआडच राहीलीत. *अनेक तुकडे, अनेक पक्ष, म्हणून आपसात भांडणे लावून त्याचा राजकीय लाभ उचलणाऱ्या लोकांना आम्ही केव्हा ओळखणार ?*
आरपीआय (RPI) ला शिव्या देऊन, त्यांच्यातल्या फुटीवर तोंडसुख घेऊन समोर आणली गेलेली बिएसपी (BSP) आज स्वतःच अनेक तुकड्यात विभागली गेली. (जाणिवपुर्वक फोडली गेली.) आणि आजही आम्ही बघतो की BSP च्या मुशीत पैदा झालेल्या कार्यकर्त्यांचे व RPI च्या वैचारीक प्रवाहात सातत्याने राहीलेल्या कार्यकर्त्यांचे आपसात अस्सल शत्रुत्वाचे नाते आहे. *RSS, BJP, Congress, NCP, SHIV SENA, मनसे जितकी शत्रु वाटत नाही तितके RPI व BSP हे एकदुसऱ्यांचे शत्रू आहेत.* दोघांतही एक मोठी दरी निर्माण झाली आहे. ही चिंतादायकच नाही तर खेदजनक बाब आहे.
या सर्वांना नजरेआड करून अनेकांनी एकीकरणाचे तुणतुणे वाजविणे अद्यापही बंद केलेले नाही. *एकीकरण करा, एकत्र या, युती करा, आघाडी करा म्हणून अनौरस बाळंतपणातून पैदा झालेल्या अनाथ पक्षांनाही मान्यता (Recognition) देऊ पाहणारेही काही कमी नाहीत.* चळवळीचे बेसीकच ज्यांचे चुकले आहे ते समाजाचे बेसीकही बिघडवायच्या मागे लागले आहेत.
*याच उत्सुकतेपोटी मी आपल्यापुढे महाराष्ट्रातील निवडणुकांतील काही वास्तव बाबी मांडतो आहे.*
*महाराष्ट्रात स्वतःला आंबेडकरी म्हणणारा मतदार २ कोटीपेक्षा जास्त आहे.*
मग निदान १ कोटी मतदान या महाराष्ट्रात आंबेडकरी म्हणविणाऱ्या पक्षांना मिळायला हवे होते.
*वास्तव* :- सर्व आंबेडकरी पक्षांना मिळालेले मतदान (RPI व BSP च्या सर्व तुकड्यांना, गटांना)
१) २००९ ला मिळालेले मतदान जवळपास २० लाख.
२) २०१४ ला मिळालेले मतदान जवळपास १६ लाख.
२ करोड पेक्षा जास्त आंबेडकरी मतदान असलेल्या महाराष्ट्रात आंबेडकरी पक्षांना फक्त १६ लाख किंवा २० लाख मतदान मिळत असेल तर बाकीचे आंबेडकरी मतदान कुठे गेले ? कोणत्या पक्षाला गेले ? १६ लाख किंवा २० लाख मतदान घेण्यासाठी एकीकरण करायचे का ?
*कुणाशी भांडायचे* ?
१) आंबेडकरी पक्षाच्या गटांशी ?
२) आंबेडकरी पक्षाच्या मतदारांशी ?
३) आंबेडकरी चळवळीशी प्रामाणिक असणाऱ्या त्या १६ किंवा २० लाख मतदार लोकांशी ?
४) आंबेडकरी पक्षांच्या नेत्यांशी ?
५) आंबेडकरी पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी ?
*की,*
१) जो स्वतःला आंबेडकरी म्हणतो पण आंबेडकरी पक्षाला मतदान करीत नाही त्याच्याशी ?
२) जो स्वतःला आंबेडकरी म्हणतो पण आपला राजकीय पक्ष, राजकीय नेता, राजकीय भूमिका निवडत नाही त्याच्याशी ?
३) १ कोटी ८० लाख आंबेडकरी मतदार जो दुसऱ्या प्रस्थापित पक्षांचा मतदार झाला आहे त्यांच्याशी ?
४) जो गटबाजीचे कारण देऊन अन्य पक्षात काम करतो व अन्य पक्षांना मतदान करतो त्याच्याशी ?
*कुणाशी भांडायचे व कोण खरे शत्रू हे तुम्हीच ठरवा.*
*कारण*
या महाराष्ट्रात २००९ ला सत्तेवर आलेली कॉग्रेस व राष्ट्रवादी अनुक्रमे अंदाजे ९० लाख व ८६ लाख मतदान घेऊन सत्तेवर होती. या महाराष्ट्रात २०१४ ला सत्तेवर आलेली भाजप व शिवसेना अनुक्रमे अंदाजे १ कोटी ४० लाख व जवळपास १ कोटी मतदान घेऊन सत्तेवर बसली आहे.
*आम्ही मोठ्या गर्वाने आंबेडकरी म्हणविणारे यापेक्षा जास्त संख्येने असतांनाही इतर पक्षाचे मतदार का बनलोत ?* यावर खाली डोके वर पाय करून एकदा तरी विचार करा.
*नेमके आंबेडकरी चळवळीत तुमचे बेसीक गणीत कुठे चुकले.*
१) आम्ही सच्चा चळवळीचा नेताच निवडला नाही.
२) आम्ही चळवळीला वैचारीक पातळीवर सामाजिक न्यायासाठी आंदोलनात उतरलेल्या पक्षाला निवडले नाही.
३) आम्ही आंबेडकरी म्हणवून घेण्यातच धन्यता मानली परंतु आंबेडकरी मतदार कधी बनलोच नाही.
४) चळवळीचे बेसिक न अभ्यासता उपटसुंभ्यांना नेते बनवित गेलो व आपल्याच भोवती विविध पक्षांचे जाळे विणत गेलोत.
५) वास्तव लक्षात न घेता एकीकरणाचे तुणतुणे वाजवित गेलोत.
६) छोट्याश्या राजकीय लाभापोटी वा सत्तेच्या स्वार्थापोटी प्रस्थापित पक्षांच्या हातातले बाहूले बनलोत.
*बिघडलेले चळवळीचे बेसिक गणीत सुधारण्याची संधी तुमच्याजवळ आलेली आहे. भूतकाळाच्या चुका परत न करता हे करता येईल.*
१) वर्तमान नेत्यांपैकी राजकारणासोबतच चळवळीला (फक्त राजकारणाला नाही) ज्याचे योगदान मोठे आहे. त्या नेत्याची चळवळीचा नेता म्हणून निवड करा. न तोच तुमचा राजकीय नेता ठरवा.
२) स्वाभिमानाने व वैचारीकतेतून सामाजिक भान असलेल्या नेत्याची निवड करा. त्याच्या पक्षाची निवड करा. व त्याच पक्षाचे मतदार बना.
३) येणाऱ्या पुढील प्रत्येक निवडणुकांत तुमचे-आमचे मतदान पक्षाला किंवा उमेदवाराला नसून आंबेडकरी विचाराला ते मतदान जाणार आहे याची मनाशी पक्की खुणगाठ बांधा.
४) गल्लीबोळात तयार झालेल्या नेत्यांना व त्यांच्या पक्षांना स्पष्टपणे नाकारा व मुख्य चळवळीच्या राजकीय पक्ष प्रवाहासोबत जूळा. *(फक्त राजकारण करून चळवळीपासून दूर असणाऱ्या पक्षाशी नाही.)*
*बघा ! तुमचे आंबेडकरी चळवळीचे बेसीक कुठे आहे.*
*माझे मत :-*
*आंबेडकरी चळवळीसाठी, पक्षासाठी, राजकारणासाठी...*
*एक नेता - मा. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर*
*एक पक्ष - भारिप बहूजन महासंघ*
*एक समाज - आंबेडकरी समुह*
*एक चळवळ - आंबेडकरी चळवळ*
*माझे एक मत - आंबेडकरी विचारांनाच*
✍___रोहित शेळके
*बघा तुमचीच सत्ता, तुमच्याशिवाय सत्ताही हलणार नाही.*
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
No comments:
Post a Comment