Saturday, January 7, 2017

नात्यांचा अर्थ समजला पाहिजे


           आजच्या धावपळीच्या जीवनातही माणूस सगळी संकटं, सगळी आव्हानं अगदी सहजगत्या झेलतोय. नात्यांच्या पाशांनी बद्ध असणारा माणूस स्वतःसाठी, स्वतःच्या जीवावर, इतरांच्या सहाय्याने आणि इतरांसाठीही जगतोय. खरंच, काय आहे  ही “नात्यांची कल्पना” ???
         नातं म्हणजे काय ? (‘ना’ते नाते) जे नसतं ते? की, नसानसांतून जोडले जाणारे बंध ?
      प्रत्येकाच्या दृष्टीने ‘नातं’शब्दाची व्याख्या वेगळी असते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ‘नात्यांची कल्पना’ही बदलत  जाते .
     मूल जन्माला आल्यावर निर्माण होणारं आई- मुलाचं नातं हे सगळ्यात  पहिलं आणि पवित्र नातं. त्या इवल्याशा जीवाचं अस्तित्व प्रत्येक नात्याला नवा अर्थ प्राप्त करून देतं. हळूहळू त्याला वाढवण्यातून, जपण्यातून त्या मुलाचे घरच्यांशी संबंध आधिक दृढ होतात. आणि खरंच “माझी माणसं “,”आपली  माणसं “अशा संकल्पना निर्माण करणारी रक्ताची नाती निर्माण होतात. पण, नातं हे फक्त रक्ताचच असतं असं नाही .
         रक्ताचं नसूनही विश्वासानं ओतःप्रोत भरलेलं, भरभरून आनंद देणारं, निरपेक्ष नातं म्हणजे ‘मैत्री’. माझ्या दृष्टीने तर सगळ्यात मौल्यवान !! गैरहजर असताना न सांगता आपली हजेरी लावणारी, वाढदिवसादिवशी रात्री 12 ला येऊन ‘सरप्राईज’ देणारी, परीक्षेत मुद्दाम पेन्सिल खाली पाडून “ पेपर दाखव ना !” असं नकळत खुणावणारी ती मित्रमंडळी आपलं आयुष्यच आनंदमय करतात. या काळापासूनच कदाचित नात्यांमध्ये एक प्रकारची “मँच्युरिटी ” यायला लागते. ” तू रडू नकोस गं, आम्ही आहोत तुझ्या सोबत !”, होस्टेलचं खाऊ नकोस, आम्ही आणू तुझ्यासाठी डबा!!असा विश्वास समोरच्याला देताना आपणच कधी मोठे आणि आत्मविश्वासू होऊन जातो कळत नाही. खरंच, माझ्या दृष्टीने तर जीवनात आनंदाचे रंग भरणारी ही मित्रमंडळीच  आपल्या आयुष्याचे “मितवा” (मित्र -तत्वज्ञ-वाटाड्या) असतात .
     तिसऱ्या टप्प्यावर निर्माण होणारं नातं म्हणजेच “प्रेमाचं नातं”. मग ते प्रियकर–प्रेयसीचं असो किंवा नवरा-बायकोचं! कुठल्याही नात्यात ” प्रेम ” हा घटक अंतर्भूत असतोच. पण, या टप्प्यावर प्रेमाला आणखी जास्त प्रौढत्व येतं. एखाद्या  नव्या व्यक्तीसोबत आपण आयुष्य व्यतीत करु शकू, असा वाटणारा  विश्वास आणि त्यातून फुलत जाणारं हे “ प्रेमाचं नातं  ” अवघं जीवनच व्यापून टाकणारं!!!… ”तू तुलाच विसरून यावे, मी तुझ्यात मज विसरावे! तू  हसत मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे!! ”असंच जणू होऊन  बसतं. एकमेकांना समजून घेण्याची वृत्तीही हेच नातं आपल्याला देतं. पुढे नवरा-बायकोमध्येही एकमेकांच्या पडत्या काळात एकमेकांना दिलेली साथ,सासू-सासर्यांची  “आई-वडिलां”प्रमाणे  घेतलेली  काळजी ,जीवनाला प्रत्यक्षात  प्रौढत्व बहाल  करतात .कारण तोपर्यंत मुले  स्वतःच  आई- वडिलांच्या भूमिकेत शिरलेली असतात .खरंच ,किती  अजब आहे या  नात्यांची किमया !! जीवनाच्या  शेवटापर्यंत एकमेकांची साथ सोडवत नाही ,इतके  दृढ संबंध ही  नाती निर्माण  करतात .70 वर्षांच्या  बायकोच्या  वाढदिवसादिवशीही आठवणीने गजरा आणणारे 75 वर्षांचे आजोबा पाहिले की,असंच  वाटतं .

  शेवटी तर  सगळ्यांना  एकट्यानेच जायचंय .मग  खरंच ,”जे नसतं  ते नातं “असं  म्हटलं  तर या नात्यांत आपण  इतके  गुंततो ,इतके  रमतो की,धकाधकीचं आयुष्य ,दुःखाचे डोंगर ही  सुकर  वाटायला  लागतात .खरंच ,जे नसूनही आपलं  अस्तित्व निर्माण करतं ते” नातं !” फक्त  त्याचा खरा  अर्थ  उमगायला हवा

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...