Thursday, May 11, 2017

ओसामा बिन लादेन पर्वाची अखेर

अमेरिकी कमांडोजनी बिन लादेनला कसा लोळवला. यासंदर्भातली माहिती थोडीथोडी बाहेर येत असून या माहितीच्या आधारेच या थरारक ऑपरेशनचं केलेलं हे वर्णन आहे. या मध्ये काही ठिकाणी कादंबरीप्रमाणेच कल्पिताचा  उपयोग करावा लागला आहे.

               इस्लामाबादेच्या ईशान्येला अवघ्या साठ किलोमीटर अंतरावर एक बारकं गाव वसलं आहे. अ‍ॅबटाबाद. ओराशच्या खोऱ्यात सरबन डोंगररांगांमधल्या बारमाही हिरवाईत जीव धरून राहिलेलं  हे गाव उन्हाळयातही बऱ्यापैकी थंड असतं. पारा फार तर तीस-बत्तीस सेल्शियसपर्यंत जातो. हिवाळयात मात्र बर्फ भुरभुरतं. हिमकणांची सफेद चादर पसरते. वस्तीही फार नाही. जेमतेम नव्वद हजार.     इस्लामाबादेत रग्गड पैसा करावा नि अ‍ॅबटाबादला बंगला बांधून ऐय्याशीत शांतपणे राहावं, या इराद्यानं तर हे गाव वसलं.
                  पााकिस्तानची मिलिटरी अकादमी इथं पसारा मांडून बसली आहे. इथं उत्तम शाळा-कॉलेजेसही नावाजलेली आहेत. साधारणपणे आपल्याकडच्या डेहराडून किंवा पाचगणीछापाचं गाव आहे.
            मेजर जेम्स अ‍ॅबट म्हणून कोणी एक इंग्रज साहेब दीडशे वर्षांपूर्वी होऊन गेला. १८४९च्या सुमारास तो इथं आला, तेव्हा अर्थातच ब्रिटिश इंडिया होता. इथल्या निसर्गाच्या तो प्रेमातच पडला. त्यानं स्वत:च्या इच्छेप्रमाणे इथं गाव वसवून त्याचं नामकरण ‘अ‍ॅबटाबाद’ असं करून टाकलं. एक कविताही लिहिली या गावावर. 
                   एक मेच्या मध्यरात्री अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रेस अटॅचीनं धडाधड वेगवेगळय़ा वार्ताहर प्रतिनिधींना निरोप पाठवले. ‘‘अध्यक्षांना अत्यंत महत्वाची घोषणा करायची असून ताबडतोब व्हाइट हाऊसच्या इस्ट रूममध्ये जमा.. आय अ‍ॅशुअर यू ऑफ हेडलाइन!’’ पत्रकारांचे कान टवकारले गेले. ब्लॅकबेरीज टिवटिवले. आयफोन्स रिंगरिंगले. काय असेल? पत्रकारांना असले सुगावे लागायला सेकंदही लागत नाहीत. आपापल्या वाहनांनी व्हाइट हाऊसच्या इस्ट रूमपर्यंत पोहोचेपर्यंत बातमी ट्विटरवर फुटली होती. सगळे टेन्स झाले होते.
              पोडियमशी आल्या आल्या गंभीर चेहऱ्यानं ओबामांनी सांगून टाकलं,‘‘जस्टिस हॅज बीन डन..ओसामा बिन लादेन मेला आहे. अमेरिकी सैनिकांच्या गोळाबारीत पाकिस्तानात तो मारला गेला. त्याचा मृतदेह अमेरिकेच्या ताब्यात आहे.’’
          ओबामांच्या त्या लाइव्ह फीडमुळे अमेरिकेत ऐन मध्यरात्री उत्साहाची लहर पसरत गेली. ‘‘यूएसए, यूएसए’’ च्या घोषणांनी रस्ते दुमदुमले. दहा वर्षांपूर्वी त्या नराधमानं वल्र्ड ट्रेड सेंटरचे जुळे मनोरे जमीनदोस्त करून एका महासत्तेचं पोतेरं करून टाकलं होतं. निरपराधांचे बळी घेणाऱ्या त्या बिन लादेनला जिंदा या मुर्दा पकडण्याचा विडा उचलण्यात आला. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश (ज्यु.) यांनी दहशतवादाविरुद्ध ग्लोबल रणशिंग फुंकलं. बिन लादेन हा क्रमांक एकचा शत्रू मुक्रर झाला. फर्मानं सुटली आणि विमानंही.
             शतकातला सर्वात मोठा मॅन हण्ट सुरू झाला. त्यापुढे इराकच्या सद्दाम हुसेनचा ठावठिकाणा शोधण्याचा उपक्रम म्हणजे पोरखेळ ठरावा. उपग्रहांचे कोन बदलले. सडकेवरच्या धावत्या मोटारीची नंबर प्लेटही टिपणारे अत्याधुनिक उपग्रह कॅमेरे काराकोरम पर्वतराजी आणि पाकिस्तानचा सरहद्दीचा भाग धुंडाळू लागले. थर्मल कॅमेऱ्यांनी (उष्णताशोधक) आपलं जाळं विणलं. मानवरहित छोटी दूरचलित विमानं ऊर्फ ड्रोन्सचे हल्ले सुरू झाले. मिसाइल्सचा मारा हा तिथल्या रहिवाशांच्या सरावाचा झाला. 
            अफगाणिस्तानातल्या बग्राम या अमेरिकी लष्करी तळावरची वर्दळ वाढली. ओसामा बिन लादेन आज पेशावर जवळ दिसला. अयमान अल जवाहिरी त्याच्या बरोबरच होता. आज इथं दिसला, उद्या तिथं. स्थानिक टोळीतील लोक डॉलर उपटण्यासाठी अमेरिकनांना फेकाफेक करत होते. दु:खानं हळवे झालेले अमेरिकन वाट्टेल त्याच्यावर विश्वास टाकत राहिले, आणि तितकेच संशयानं बघत राहिले. बिन लादेन ड्रोन हल्लय़ात मारला गेला, अशी आवई उठल्यावर काही दिवसातच ‘अल जझीरा’ टीव्ही वाहिनीच्या कार्यालयात ओसामा बिन लादेनच्या नव्या प्रवचनाची व्हीडिओ टेप पोहोचायची. त्यात अमेरिकेची खिल्ली, हेटाळणी, रागराग, इस्लामची शिकवण वगैरे मसाला भरलेला असायचा. तब्बल ४७ अब्ज डॉलर्सचा चुराडा होऊनही एक माणूस अमेरिकेच्या अफाट लष्करी यंत्रणेला आणि अत्याधुनिक हेरगिरीच्या जाळय़ाला पुरून उरत होता.
            एका अशाच अफवेनंतर ओसामा म्हणाला, ‘‘अमेरिकन मूर्ख आहेत. मी त्यांच्या हाताला जिवंत लागणं शक्यच नाही. त्यांच्या त्या भंपक मिरांडा हक्काच्या बाता त्यांना माझ्या मृतदेहाला ऐकवाव्या लागतील!’’ पाच र्वष होऊन गेली, पण ओसामा बिन लादेनचं नखदेखील दृष्टीस पडलं नव्हतं. त्याच्या धमक्या आणि व्हिडीओटेप्स मात्र अगदी न चुकता मिळत होत्या.
              दोन हजार सात साली मात्र नशीब अमेरिकेकडे पाहून किंचित हसलं. ग्वाटेनामो बे ऊर्फ गिटमो नावाचा एक कुप्रसिद्ध तुरुंग आहे. इथं अमेरिकेच्या खुंक्खार दहशतवाद्यांना आणि युद्धकैद्यांना ठेवलं जातं. ही एक छळछावणीच असल्याची बोंब झाली होती. असला विकृत खेळांचा तुरुंग बंद करण्याची मानवी हक्कवाली भाषाही झाली. सीआयएच्या एका हस्तकाला चौकशी दरम्यान एका मुस्लीम कैद्यानं सांगितलं, ‘‘उस्माह त्या डोंगरात कशाला राहील? तो तर जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. तो बंगल्यात नव्हे, राजवाडय़ात राहातो! ’’ ओसामाचं खरं नाव उस्माह इब्न लदीन असं आहे. अरबी जगात त्याला त्याच नावानं ओळखतात. हा गिटमोचा कैदी म्हणजे अबू फराज अल लिब्बी. 
‘‘अच्छा? कुठं..कुठं आहे तो राजवाडा?,’’ हस्तकानं सहज म्हणून विचारलं. 
‘‘पाकिस्तानात. इस्लामाबाद!’’ तो म्हणाला. 
पण याहून अधिक त्यालाही काही माहिती नव्हतं, पण कुवेतच्या कुण्या अबू अहमद याचं नाव त्यानं घेतलं. हा अबू अहमद म्हणजे ओसामाचा बाह्य जगाचा डोळा आहे, असं त्याचं म्हणणं होतं. त्याला मोकळा सोडला तर काही काळानं तो त्याचा ठावठिकाणा सांगेल असा त्याचा प्रस्ताव होता. पकडला गेल्याच्या आधी तो ओसामाचा शिपाई होता. हस्तकानं ही माहिती वरिष्ठांकडे पोहोचवली. बराच काळ काहीही घडलं नाही.
           पण अबू अहमद आणि त्याचा भाऊ यांचा मात्र ठावठिकाणा सीआयएला एव्हाना अचूक लागला होता. अबू मधूनच गायब व्हायचा. तेव्हा त्याचा भाऊ चारचौघात हिंडताना दिसे. अबू परत आला की भाऊ गायब व्हायचा. अखेर या दोघांच्या पाकिस्तानातल्या अ‍ॅबटाबाद इथं फेऱ्या होत आहेत हे लक्षात आलं होतं. त्याला त्यानंतर प्रत्येक सेकंद ट्रॅक करण्यात आलं. आपल्या दैवताच्या, ओसामा बिन लादेनच्या तो जवळ जवळ सरकू लागला. तसतसा सीआयएचा फासही आवळला जाऊ लागला. अखेर गेल्या ऑगस्टमध्ये सीआयएचे प्रमुख लिआँ पॅनेटा यांनी आपला गोल चष्मा पुसत एका ब्रेकफास्ट बैठकीत ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानातला पत्ता शांतपणे राष्ट्राध्यक्षांना सांगितला, ‘‘यू कॅन ड्रॉप हिम अ लेटर, मि. प्रेसिडेण्ट..इफ यु वॉण्ट टु!’’
           राष्ट्राध्यक्षांनी हातातला पाव खाली टाकला, आणि ‘सीरियसली’ काही प्रश्न विचारले. सीआयएला ओसामाचा पत्ता आणि अवस्था याची अगदी डायरी ठेवण्याइतकी अचूक माहिती मिळत होती. काही वर्षांपूर्वीच अ‍ॅबटाबाद या शांत, झोपाळू गावात बिन लादेनच्या तिसऱ्या बायकोनं दोन मजली घर घेतलं होतं. (हे घर अबू अहमदनंच भाडय़ानं घेऊन दिलं होतं असंही समजतं.)पण बहुधा ते आयएसआयनंच घेऊन दिलं असावं. बिन लादेन त्याच्या बायका-मुलांसमवेत इथंच राहातो. त्याच्या किडन्या फेल झाल्या आहेत. त्याला डायलेसिसची गरज भासते. एक दिवसाआड तिथं एक डॉक्टर येतो. अशी पानेटा यांनी माहिती पुरवली. पण याची मात्र पुष्टी होऊ शकली नाही.
‘‘पाकिस्तानी अध्यक्षांना कितपत माहिती आहे?’’, ओबामांनी विचारलं.
‘‘मी राष्ट्राध्यक्ष असतो, तर हा एक फोन कॉल मी नक्कीच टाळला असता.’’, पानेटा म्हणाले, ‘‘तो राहातो, तिथून काही मीटर अंतरावर मिलिटरी अ‍ॅकॅडमीची भिंत सुरू होते. आत एखादा भुयारी मार्ग असण्याची शक्यता आम्ही तपासून पाहणार आहोत. पाकी लोकांना आत्ताच काही सांगणं टाळलेलं बरं. ते तेवढे विश्वासार्ह नाहीत. उलट मी सल्ला देईन की पर्वतराजीत आपले ड्रोन हल्ले सुरूच ठेवावेत. अफवा चालू ठेवाव्यात. काउण्टरइंटेलिजन्स यंत्रणा मी आधीच कार्यान्वित केली आहे.’’ मला ऑलमोस्ट रोज अपडेट करत रहा, अशी सूचना देऊन ओबामांनी ती बैठक संपवली.
             अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलचे पाचही प्रमुख आणि ओबामा यांच्या चौदा एप्रिल ते सव्वीस एप्रिल या दरम्यान जवळजवळ रोज बैठका झाल्या असं सांगितलं जातं. पण वस्तुस्थिती अशी होती की यासंदर्भात ओबामा आणि पॅनेटा यांनी पाक सरकारलाच नव्हे तर अमेरिकी सुरक्षा यंत्रणांनाही अंधारात ठेवलं होतं. इस्त्रायलच्या ‘मोसाद’च्या अ‍ॅम्बुश धर्तीच्या ऑपरेशनप्रमाणेच विजेच्या वेगाने हे ऑपरेशन पार पाडायचं, असा त्यांचा बेत होता. त्यासाठी नेव्हीसील्सच्या चाळीस तगडय़ा, अत्यंत चपळ आणि हुशार कमांडोजना तयार करण्यात येत होतं. बिन लादेन याच्या अ‍ॅबटाबादच्या घराची प्रतिकृती तयार करून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं. 
             एकीकडे पाकिस्तानी सरकारशी गंमतीदार खेळ अमेरिकी सरकारनं सुरू केला. हिलरी क्लिंटन यांनी इस्लामाबादेत जाऊन दबाव आणला. अफगाणिस्तानातल्या बग्राम बेसवरची आमची माणसं सुट्टीवरसुद्धा जाऊ शकत नाहीत. पेशावर जवळ एखादं चांगलंसं ठिकाण नाही का? अशी अमेरिकनांनी साळसूद विचारणा केली. या भेटीनंतर अमेरिकन एजण्टस् आणि लष्करी अधिकाऱ्यांचा वावर पाकिस्तानात प्रचंड वाढला. अ‍ॅक्शन घ्यायचा दिवस लौकरच येतोय, हे काही मोजक्या लोकांच्या लक्षात येत होतं, त्यात लिआँ पानेटा आणि हिलरी क्लिंटन हे दोघेही होते.
            अखेर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात, नेमकं सांगायचं तर २६ एप्रिलला पानेटा यांनी ओबामांना रात्री गाठलं, आणि ‘किल ऑर्डर’वर सही करण्याची विनंती केली. पण ओबामांनी तेव्हा ती केली नाही. पाकिस्तानी अध्यक्षांना न सांगता त्यांच्या भूमीवर लष्करी कारवाई करायची, म्हणजे त्या देशाच्या सार्वभौमत्वालाच नख लावण्यासारखं आहे, हे त्यांना डाचत होतं. पण ‘दहशतवादविरोधी लढाईत तुम्ही आम्हाला गृहित धरू शकता, तुमचा आणि आमचा शत्रू एकच आहे,’ असं पाकी अध्यक्ष आसिफ अली झरदारी स्वत:हून म्हणाले होते, याची आठवण ओबामांना करून देण्यात आली. अखेर मनाचा कौल घेत ओबामांनी २९ एप्रिल रोजी तो आदेश काढला.
                  तोपर्यंत पंचवीस तगडय़ा अमेरिकी कमाण्डोजना गाझी बेसवर तय्यार ठेवण्यात आलं होतं. भरपूर दारूगोळा आणि ते कमाण्डोज यांना घेऊन तीन हेलिकॉप्टर्स अ‍ॅबटाबादकडे झेपावली. पहिल्या चॉपरमध्ये पायलटसह फक्त चार जण होते. एरिया मार्क करून त्या हेलिकॉप्टरनं परतायचं होतं. या कमाण्डोजपैकी सगळय़ांना हेल्मेट कॅमेरा अनिवार्य करण्यात आले होते. त्याची जोडणी एका कम्प्युटरला होती आणि तिथून या ऑपरेशनचं थेट प्रक्षेपण अमेरिकेत लँगली येथील सीआयएच्या मुख्यालयात बसून लिआँ पानेटा पाहात होते. सूचनाही करत होते. मिलिटरी अ‍ॅकॅडमी जवळच असल्यानं हेलिकॉप्टरची ये-जा कायम होती. अ‍ॅबटाबादला त्याचा सराव होता. पण अ‍ॅकॅडमीतल्या रडारचे कान टवकारले गेले नसते, तरच नवल होतं. पहिलं हेलिकॉप्टर गिरकी मारून परत फिरण्याच्या आत त्यावर मिसाइल आदळलं. या धुमश्चक्रीत दुसरं आणि तिसरं लॅण्ड झालं, पण तोवर बिन लादेनची हवेली सावध झाली होती. खरंतर ही हेलिकॉप्टर लॅण्ड अशी झालीच नाहीत. हवेलीपासून पन्नास फुटांवर ती तरंगत होती. रोपच्या साहाय्याने खाली उतरलेल्या कमाण्डोजनी पोझिशन्स घेतल्या आणि मिसाइलच्या पहिल्याच दणक्यात हवेलीचा एक भाग उडाला. आग लागली. त्याही विकल अवस्थेत ओसामा बिन लादेननं मशीनगन उचलली आणि तो बाहेर धावला. 
                मिसाइलच्या कपच्यांनी घायाळ झालेल्या बिन लादेनला एकही गोळी झाडता मात्र आली नाही. ‘शूट’ असा पानेटा यांचा आवाज कानात घुमताक्षणी त्या ऑफिसरनं झाडलेल्या गोळीनं ओसामा बिन लादेनचा सैतानी अवतार संपवला. या ऑपरेशनमध्ये बिन लादेनचा एक मोठा मुलगा आणि अन्य सहा जण जागीच होरपळून मेले. त्यात अबू अहमद आणि त्याचा भाऊ यांचाही खात्मा झाला. अयमान अल जवाहिरीचा मात्र पत्ता लागला नाही. बिन लादेनच्या तीन बायका आणि काही मुलं अमेरिकनांनी हेलिकॉप्टरमध्ये बसवून नेली. एक बायको तर जखमी अवस्थेत घरात फरशीवर पडली होती. तिलाही नेण्यात आलं. सगळी मोहीम फक्त चाळीस मिनिटात संपली.
सगळं ऑपरेशन लाइव्ह बघणाऱ्या पानेटा यांनी तात्काळ ओबामा यांना कळवून टाकलं, ‘‘एलिमिनेशन कम्प्लीट!’’
बग्राम बेसवर ओसामाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम झालं. डीएनए चाचणी झाली. (जी जिवंतपणीही एकदा झाली होती!) तिथून लगोलग तो मृतदेह उत्तर अरबी समुद्रावर नेण्यात आला. त्याला आंघोळ घालून सी बरियल देण्यात आलं. खलाशाला असं दफन करतात. जड दगड बांधून मृतदेह समुद्रात सोडायचा असतो. ओसामा बिन लादेन याचं कुठलंही स्मरणचिन्ह राहता कामा नये, त्याचं स्मारकात रुपांतर होऊ नये, म्हणून हे असं समुद्रार्पण करायचं.
एक सैतान संपला. त्याचं स्मारक होणार नाही अशी आशा करू या.
पण त्या अ‍ॅबटाबादचं ओसामाबाद झालं तर?
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com    
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...