भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासणारे, देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक असणारे थोर महापुरुष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे. आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन. म्हणून आज त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टींवर एक नजर टाकूयात...
1) डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले.
3) शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ’’शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,’’ असे ते समाज बांधवांना सांगत.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन swapnwel.blogspot.com |
4) ’’प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे.
5) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत.
6) डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.
7) डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, ’’आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा’’ यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा सामावलेली आहे.
8) स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. 1927 ते 1956 पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला.
9) 1942 साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला.
10) दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी लढा दिला. श्रमजिवीच्यासाठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितांसाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी त्यांनी जोरदार लढा दिला.
अशा या महामानवाला कोटी-कोटी प्रणाम...!
============================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment