Thursday, December 7, 2017

शर्यत जगण्याची

         शर्यत जगण्याची
     रविवारची सुट्टी  होती म्हणून एका मित्राच्या घरी गेलो होतो.आम्ही गप्पा मारत बसलो होतो इतक्यातच त्याचा मुलगा आला.
" काय रे कुठं गेला होतास ? " मी विचारलं.
" क्लासला." एवढा एकच  शब्द बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला. त्याच्या वडिलांनी नंतर त्याला हाक मारली
" अरे ये ना , काका आलेत बघ." "ते काय म्हणतात ते तर बघ ." वगैरे म्हणून बऱ्याच हाका मारल्या तरी तो बाहेर आला नाही.
" काय बिघडलंय ? " मी विचारलं.
" आज सहामाहीचे मार्क कळले ना ! दोन विषयांत नंबर हुकलाय ! " त्याची आई हसत हसत म्हणाली.
" मग काय झालं ? " मी म्हटलं , " एखाद्या विषयात चार दोन मार्क कमी पडले तर बिघडलं कुठं ? "
" ते आपल्याला झालं! त्याचं तसं नाही.एखाद्या विषयात एखादा गुण कमी मिळाला किंवा एखाद्या विषयातला नंबर चुकला तरी त्याला तो पराजय वाटतो."
" चुकीचं आहे हे !" मी म्हटलं," तो कुठले खेळ वगैरे खेळत नाही काय ?"
" मुळीच नाही." त्याची आई बोलली ," तो अभ्यास सोडून दुसरं काहीही करत नाही आणि आम्हीही त्याला कधी बाहेर सोडत नाही. उगाचच वेळ वाया जातो. खेळून काय होणार आहे ?  गल्लीतली पोरंही  टवाळ आहेत.त्यांच्यात मिसळून आमचंही पोर  बिघडायचं !....त्यापेक्षा घरच्या घरी अभ्यास केला  तर काय वाईट ?"
" चुकीचं बोलत आहात वहिनी ! " मी म्हटलं , " माझं मत जरा उलटं आहे. मुलांनी  अभ्यास थोड़ा कमी केला तरी चालेल पण खेळ भरपूर खेळले पाहीजेत असं माझं मत आहे."
" खेळ खेळून सगळीच मुलं तेंडुलकर किंवा सानिया मिर्झासारखी चँपियन होत नसतात म्हटलं ! " माझा मित्र म्हणाला.
मी हसलो.
"का हसलास ?" माझ्या मित्रानं विचारलं.
" प्रत्येकानं चँपियन होण्यासाठीच खेळ खेळायचा असतो  हे तुम्हांला कुणी सांगितलं ? " मी विचारलं.
" मग कशासाठी ? हरण्यासाठी ? " माझा मित्र उपहासाने बोलला.
" बरोबर बोललास ! " मी म्हटलं ,"  खेळ म्हटला की हरणे आणि जिंकणे या दोन्ही गोष्टी आल्याच. एक खेळाडू जिंकला तर दुसरा हा हरणारच. आपण मोठ्या माणसांनी मुलांना जिंकायला शिकवण्याबरोबरच त्यांना हरायलाही शिकवलं पाहिजे.आपण विजय जसा जल्लोषात साजरा करतो तसाच पराभवही खिलाडूवृत्तीनं स्वीकारला पाहिजे. आपल्या मुलांना जिंकण्याची सवय नसली तरी चालेल पण हरण्याची सवय पाहिजे. .......प्रत्येक वेळी मीच जिंकणार असं  म्हटलं तर कसं चालेल ?  फक्त जिंकण्याची सवय लागलेली मुलं पुढच्या आयुष्यात  एवढ्या तेवढ्या अपयशानं खचून जातात. आत्महत्या करायला उठतात , कधी कधी करतातही ! आज तुमचा मुलगा सहामाहीमध्ये मागे पडला म्हणून नाराज आहे. उद्या जीवनाच्या मोठ्या परीक्षेत तो मागे पडला  तर ? .....त्याचा प्रेमभंग झाला तर ?.... त्याला कुणी फसवलं तर ? जगू शकेल तो ? " मी विचारलं.
"तुझं तर काहीतरीच !"
" हो ना ! माझ्या मुलाला मार्क कमी पडले तर तो रडत किंवा कुढत बसत नाही. प्रतिस्पर्ध्याचं तो अभिनंदन करतो ,हसत हसत ......माझं आणखी एक निरीक्षण आहे, गल्लीत जी पोरं आज तुम्हांला टवाळ वाटतात ना तीच जगण्याच्या शर्यतीत उद्या जिंकणार आहेत.....
       कारण त्यांना पराजय पचवणं खूप सोपं जातं ! .....जो खिलाडूवृत्तीनं पराभव स्वीकारतो तोच या जगात यशस्वी होतो."

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...