जरी संकटाची काळरात होती
तरी भीमराया तुझी साथ होती.
तुझी तेवण्याची सुरूवात होती,
प्रकाशात माझी पिढी न्हात होती.
पालवीत होते प्रकाशाचे गोळे,
चालवीत होते तुझे दोन डोळे,
प्रकाशाचे गाणे मनी गात होती....
अशी फौज माझी पुढे जात होती.
काळ्या काळजाची काळी काळदाती,
दात खात होती, पुढे येत होती,
तिचे काळे काळे, सुळे पाडण्याची
तुझी रग माझ्या मनगटात होती....
गणतीच माझी गुलामात होती
जिँदगीच माझी सलामात होती
तोडलीस माझी गुलामीची बेडी
अशी झुंजणारी तुझी जात होती.
मला दावलेली तुझी पायवाट
झाली अता ती विकासाची वाट
वदे आज "वामन" कालची तुझी ती
पेरणी उद्याच्या विकासात होती.
-लोकशाहीर वामनदादा कर्डक...
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
No comments:
Post a Comment