"मेरी इजाजत के सिवा यहॉं परींदा भी पर नही मार सकता!" हा संवाद अनेकदा आपण ऐकला असेल. पण पूर्वीपासून खरोखर ह्याचा प्रत्यय युद्धभूमीवर येत असे. पूर्वी एखाद्या किल्याला/गावाला वेढा दिला की शत्रू शरण येईपर्यंत तो वेढा राबवला जात असे. मग बाहेरुन मदत मागायची कशी? सोप्पे उत्तर, प्रशिक्षित केलेले "कबूतर" पाठवायचे. त्याच्या पायाला चिठ्ठी बांधायची व सोडायचे. मग अश्या कबुतरांना थांबवण्यासाठी प्रशिक्षित तीरंदाज नेमले जायचे. पण बाण असा जाऊन जाऊन किती उंच व किती दूर जाणार? मग उपाय म्हणून "ससाणे" पाळून त्यांना प्रशिक्षित करत व ते ससाणे कबुतरांवरती सोडले जात. पण समजा एकाचवेळी ढीगभर कबुतरं उडवली तर? .... ससाण्यांचीही मग फौज तयार केली जात असे. जोवर शत्रू टेकीला येत नाही तोवर आत - बाहेर कोणी जाणार नाही ..... "पाखरु" पण नाही.
ससाणे वगैरे पाळण्याचे उल्लेख ४ हजार वर्षाहुन जुने आढळतात. मेसेपोटेमिया मध्ये ह्याची सुरुवात झाली असे समजले जाते. तरी पण साधारण हे असे ससाणे, गरुड वगैरे पाळण्याची पद्धत मुख्यत: उझबेगीस्तान, मंगोलिया, किरगिझस्तान वगैरे भागात फार पुरातन आहे. पुढे हुणांनी ती पद्धत युरोपात नेली तर मंगोलांनी आपल्याकडे. म्हणूनच आपणही अनेक मुघल शासक मनगटांवरती ससाणे वगैरे घेऊन उभे असलेले अनेक चित्रात बघतो. सम्राट अकबराचे एक असेच चित्र प्रसिद्ध आहे. शहजहान सकट इतर अनेक मुघलांची , चांद-बीबी वगैरेंची देखिल अशी ससाणे हातावरती घेतलेली मुघल शैलीची चित्रे आहेत. अर्थात ही चित्रे समकालिनच होती असेही म्हणता येत नाही. रंगीत चित्रे तर सरळ सरळ गेल्या १५०-२०० वर्षात काढली गेली यात शंका नाही.
एकंदरच ससाणा हे सामर्थ्य, क्रुरता, वेग, बेदरकारपणा, शौर्य वगैरेंचे प्रतिक मानले गेले. त्यामुळे ससाणे पाळणं हा छंद मुघल शासकांत दिसून येतो. तसे तर पूर्वीचे अनेक शासक, अनेक प्राणी पक्षी पाळत. मोर, पांढरी कबुतरं व पोपट वगैरे तर फारच सहज आढळून येतात. वाघ, बिबट्यांचे बछडे लहानपणीपासून बाळगून ते देखिल पाळले जात. पण अशी चित्र म्हणून आढळतात ती बव्हंशी ससाण्याला मनगटावर बसवलेलीच.
एकंदरच ससाणा हा जगभरातील संस्कृतीत मानाचे स्थान पटकवलेला पक्षी दिसून येतो. इजिप्शियन संस्कृतीत तर तो रक्षकाच्या रुपात देखिल दिसतो. मानवी धडांवरती ससाण्याचे डोके असलेली अनेक चित्रे आढळुन येतात. इजिप्शियन राजांच्या मुकुटावरती पुढील बाजूस नाग व मागच्या बाजूला ससाण्याचे पंख पसरलेले चित्र अथवा मुर्ती मिळतात.चीन, जपान मध्ये तिसर्या - चौथ्या शतकात, अरबस्तानात ५ व्या शतकात, तर युरोपात आठव्या शतकात ससाणे पाळण्याचे स्पष्ट उल्लेख मिळायला सुरुवात होते. कुराणात ससाणा, शिकारी कुत्रे वगैरेंनी केलेली शिकार "हलाल" समजली जात असल्याने अरबस्तानात देखिल शिकारीसाठी ससाणे पाळले जात. १३ व्या शतकात तैमुर मिर्झा नामक अरबी इसमाने "बाझ नामा-यी नासिरी" हा ससाण्यांवरील ग्रंथच पर्शियन भाषेत लिहीला.
इसवीसन ९०३ मधली किएव्ह मधली एक कथा सांगितली जाते - की ड्रेव्हलियन्सने किएव्हच्या राजाला मारल्याने "ओल्गा" ही त्याची बायको किएव्हची राज्यकर्ती बनली. किएव्ह व ड्रेव्हलियन्समध्ये दिर्घकाळ युद्ध सुरु होतं. नवर्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तीने अनेकदा ड्रेव्हलियन्सना खोटे बोलून फसवून ठार केले. नंतर ड्रेव्हलियन्सचा एक मोठा गट तीने पकडला त्यांनी गयावया केल्यावरती त्यांना प्रत्येकी ३ चिमण्या व ३ कबुतरे द्यायला सांगितली. मागणी विचित्र होती. पण जीव वाचवायला त्यांनी ती मिळवून दिली. तीने ड्रेव्हलियन्सना सोडून दिले. जशी संध्याकाळ झाली तशी तीने त्या कबुतरांच्या व चिमण्यांच्या पायाला दोर्याने व ओल्या कापडातुन "सल्फरचे" तुकडे बांधुन त्यांना सोडून दिलं म्हणे. त्या चिमण्या व कबुतरे आपल्या नेहमीच्या घरातील वळचणीत शिरले थोड्याचवेळात त्या सल्फरचा हवेशी संयोग होऊन ते पेटले व ड्रेव्हलियन्सचे अख्खे गाव आगीच्या वेढ्यात पडले. अशी एक कथा "ओल्गा ऑफ किएव्ह" म्हणून मिळते.
आधी सर्व सामान्य शिकारी जमातींचा म्हणून ओळखला जाणारा हा वारसा पुढे पुढे प्रतिष्ठेची बाब समजली जाऊन फक्त आर्थिक वा शासकिय उतरंडित उच्चवर्गियांचा हा "छंद" झाला.
FALCONRY मध्ये केवळ ससाणा न रहाता इतर अनेक ताकदवान पक्षी समाविष्ट झाले. इतकेच कशाला पुढे पुढे युरोपात तर कोणी कुठला ससाणा अथवा तत्सम पक्षी पाळायचा ह्याचे काटेकोर नियमच बनले. सम्राट, राजा, राणी, राजपुत्र, राजकन्या, प्रधान, दरबारी लोक, धर्मगुरु, शासकिय अधिकारी अशी ती उतरंड लागत गेली. सम्राट असे तो सुवर्ण गरुड, गिधाड, व ससाण्यातील "मर्लिन" नामक प्रजात पाळू शकत असे, बाकी कोणाला हे पक्षी पाळायचे अधिकार नव्हते. राजा "ग्रे-फाल्कन" प्रजात बाळगत असे, राणी अथवा राजकुमार "पेरीग्रीन" प्रजातीचे ससाणे पाळत असत. अर्थात युरोपातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रजाती पाळायचे नियम होते. मात्र ढोबळ मानाने वरीलप्रमाणेच नोंदि मिळतात.
मात्र पुढे पुढे हा केवळ छंद न रहाता "युद्धात" वापरायचे साधन बनला. वरती सांगितले तसे शत्रुकडून संदेश घेऊन उडलेली कबुतरं; हे ससाणे मधल्यामध्ये पकडून ठार करत.
अगदि दुसर्या महायुद्धापर्यंत ह्याचा वापर केला जात असे. पहिल्या महायुद्धात तर फ्रेंच व जर्मन्स संदेश वहनाचा खात्रीशीर मार्ग म्हणून कबुतरे वापरत. अगदि ही पोस्टल सर्विस "पाठीवरती" मिरवली जात असे. व गरज पडेल तिथुन ह्या कबुतरांना सीमेवरुन मुख्य तळाकडे अथवा शत्रुच्या सीमेपलीकडे सोडले जात असे. पहिल्या महायुद्धातला हा सरसकट वापरला गेलेला प्रकार होता. स्वीस सैन्याने देखिल ह्याचा वापर केला. अमेरीकन सिग्नलिंग सर्विसच्या कबुतरांनी फ्रेंचांची फार मोठी मदत केली. इतकेच काय तर "चेर अॅमी" नामक कबुतरीने त्या काळतले अत्यंत महत्वाचे असे १२ संदेश अत्यंत योग्यवेळी पोहोचवल्याने तीला फ्रेंचांकडून चक्क "Croix de Guerre with Palm" म्हणून "मरणोत्तर" अवॉर्ड दिला. आपल्या शेवटच्या खेपेत बिचारीला पंखात, छातीत व पायात छर्रे लागुन ती गंभीर जखमी झाली तरीही तीने तो अत्यंत महत्वाचा संदेश पोहोचवून ७७च्या डिव्हिजन मधील २०० अमेरीकन सैनिकांचे प्राण वाचवले. अमेरीकन्सनी फ्रेंच सरहद्दिवरती अशी १२ कबुतर केंद्रे उघडली जिथे कबुतरे येऊन संदेश पोचवत. तब्बल १५०० कबुतरे त्यांनी यासाठी वापरली. अश्या कबुतरांना war/homing pigeons म्हणत. त्यांना ठार मारणं अथवा जखमी करणं देखिल 21A कायद्याखाली गुन्हा ठरवण्यात आलं होतं. "homing pigeons देशाचे महत्वाचे काम करत आहेत. त्यांना मारु नका, सरकारला मदत करा. त्यांना ठार करणं, जखमी करणं हा गुन्हा असून असे करताना कुणी आढळल्यास त्याची माहीती पोलिस, लष्कर वगैरेंना द्या. गुन्हेगाराला ६ महिन्यांची कैद, १०० पाउंड दंड अथवा दोन्हीची शिक्षा आहे." असे संदेश देणारी पत्रके जागोजागी लावली होती.
शिकार करणार्यांची माहीती देणार्याला ५ पाउंडाचे बक्षिस सुद्धा होते.
दुसर्या महायुद्धात तर कहर तेव्हा झाला जेव्हा जर्मन सेनाधिकारी व नाझींच्या क्रूर अश्या SS संघटनेचा सर्वेसर्वा "हिमलर" हा स्वत: कबुतरांचा प्रेमी होता. व तो "German National Pigeon Society" चा अध्यक्ष देखिल होता. त्याने जर्मनीतील शक्य तितकी कबुतरे पकडायचा त्यांना पाळायचा व प्रशिक्षित करायचा घाट घालता. या कबुतरांचा वापर निरोप पोचवणारी यंत्रणा म्हणून करायचे ठरवले. ब्रिटिश गुप्तहेर संस्था MI5 हिने अश्या कबुतरांचा छडा लावायचे व ती थांबवायचे ठरवले. ब्रिटिश कागदपत्रांनुसार अशी कबुतरे १९४० पासूनच बेल्जियन, बाल्कन प्रदेश व पश्चिम हॉलंडमधील छुप्या "गेस्टापोंना" निरोप पोहचवायला ये जा करत. मग ब्रिटिशांनी ह्याला आळा घालण्यासाठी "ससाण्यांची गस्त" सुरु करायचे ठरवले. शेकडो ससाणे प्रशिक्षित केले गेले व त्यांनी अश्या कबुतरांना पकडायला अथवा ठार करायला सुरुवात केली. ब्रिटिश कागदपत्रांत दोन पकडल्या गेलेल्या कबुतरांबाबत एक गंमतीशीर नोंद आढळते. त्यांना "युद्धकैदि" ठरवले गेले -
" Both birds are now prisoners of war working hard at breeding English pigeons. " एकिकडे माणसे तर जीव खाऊन लढतच होती मात्र त्या बरोबर जर्मन कबुतरे विरुद्ध ब्रिटिश ससाणे असं आकाशातलं विचित्र युद्ध देखिल सुरु झालं होतं.
दुसर्या महायुद्धात शह - काटशह देणे सुरु होते. निरोप अथवा खुणांसाठी चिन्हे काढलेले वीजेचे खांब, विशिष्ट पद्धतीने कापणी केलेली शेते, घराबाहेर लटकवलेल्या संस्थयास्पद वस्तू ह्या MI5 चे लक्ष बनल्या होत्याच पण कुणी कबुतर पाळणारा आढळलाच तर MI5 त्याला कधीही चौकशीसाठी उचलेल याचा भरवसा उरला नव्हता. याच दरम्यान ब्रिटनने देखिल कबुतरांचा "उडते बॉम्ब" म्हणून जर्मन विमानांविरुद्ध अयशस्वी वापर केला होता. MI5 खेरीज MI14 व MI16 देखिल ह्यावर विचार करु लागली होती. ह्या कबुतरांच्या अंगावरती अगदि जीवाणूंच्या डब्या लावून शत्रू प्रदेशात सोडायच्या कल्पना त्यांच्या डोक्यात आल्या होत्या. ४०० कबुतरांना यासाठी प्रशिक्षण द्यायचे ठरले होते मात्र हा प्रोजेक्ट गरजेपेक्षा खूप जास्त खर्चिक आहे असा शेरा मारुन हे प्रकार थांबवले गेले.
पहिल्या महायुद्धात तर कबुतरांच्या गळ्यात कॅमेरा अडकवून शत्रुंच्या प्रदेशांचे वरुन फोटो काढण्याचे प्रयत्न जर्मन्सने केले होते. अर्थात हाती फार काही लागले नाही. पण ती कल्पना भन्नाट होती यात वाद नाही. नंतर तसा प्रयत्न कुणी केल्याचे उदाहरण नाही. मात्र दुसर्या महायुद्धात ब्रिटिशांनी तब्बल अडिच लाख कबुतरांना ह्या युद्धात खेचले. व या पैकी ३२ कबुतरांना 21st डिकन्स मेडलने गौरविल्याची नोंद आहे. हा पुरस्कार म्हणजे प्राणी - पक्षी यांचा "व्हिक्टोरीया क्रॉस" समजला जातो. वरती उल्लेख केलेल्या अमेरीकन "चेर अॅमी" कबुतरीप्रमाणेच ब्रिटनचे "विल्यम ऑफ ऑरेंज" नामक कबुतर "21st डिकन्स मेडल" या शौर्य पुरस्काराचे मानकरी ठरले. त्याच्या मुळे अर्नहेमच्या युद्धात तब्बल २००० ब्रिटिश सैनिकांचे प्राण वाचले. जर्मन्सच्या सुसज्ज वेढ्यामुळे संदेश पोहोचवायला रेडियो सेटचा वापर करता येत नव्हता तेव्हा विल्यम ऑफ ऑरेंजने ती कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. यासाठी साडेचार तासात त्याने तब्बल ४०० किमीचा प्रवास केल्याची नोंद आहे. पण ब्रिटिशांना रानटी ससाण्यांचा वेगळाच प्रश्न उभा राहीला अनेकदा हे ससाणे ब्रिटिशांचे निरोप आणणारी कबुतरेच ठार मारत. विशेषत: दक्षिणेकडे इंग्लिश चॅनल पार करुन येणारी कबुतरे ह्या ससाण्यांच्या भक्ष्यस्थानी पडत. अश्या ६०० रानटी ससाण्यांना त्यावेळी गोळ्या घालून ठार केले. अनेक घरटी नष्ट केली. अनेक अंडी नष्ट केली. अखेर रोनाल्ड स्टिव्हन्सने कबुतरांप्रमाणेच ससाणे पकडून त्यांना लष्करी उपयोगासाठी वापरता येईल हे सुचवले.
अमेरीका व जपानच्या मधील उत्तर पॅसिफिक महासागरात "मिड वे" बेटांवरती अमेरीकेने १९४०च्या आसपास आपला नाविक व हवाई तळ बनवला. इथून जी विमाने ये-जा करत त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका होता तो इथे असलेल्या "सीगल" पक्षांच्या. ते एखाद्या क्षेपणास्त्रासारखे विमानांवरती येऊन धडकत अथवा विमानांच्या इंजिनमध्ये ओढले जात त्याने विमानचे नुकसान होई अथवा संपूर्ण विमानच कोसळण्याचा धोका होता. त्यांना सुरुवातीला शॉटगन्सने ठार केले जाई पण सीगल्सची संख्याच इतकी प्रचंड होती की ह्या प्रकारांना आळा बसत नव्हता. एक उपाय म्हणून तिथे अमेरीकन नेव्हीने काही ससाणे पाळले आणि त्यांच्या भीतीने धावपट्टिच्या बाजूने सीगल फिरकणे जवळपास बंद झाले. आज जगभर अनेक ठिकाणी ही पद्धत वापरली जाते.
आज FALCONRY हा जगभरात लोकप्रिय खेळ/छंद म्हणून ओळखला जातो. जगभरात फाल्कनर्सचे क्लब्स आहेत. त्यांच्यात स्पर्धा देखिल घेतल्या जातात. शर्यतीच्या घोड्यांची जसी खास पैदास केली जाते तशीच ससाण्यांची, घुबडांची, गरुडांची खास पैदास केली जाते. दोन वेगवेगळ्या प्रजातींचे असे शिकारी पक्षी वापरुन मिश्र प्रजातींच्या ससाण्यांची, गरुडांची वगैरे पैदास करतात. अर्थात युरोपियन देशात व अमेरीकेत ह्यावरती कडक नियम घातले आहेत. कतार, युनायटेड अरब अमिरात वगैरे देशात देखिल हा प्रचंड लोकप्रिय खेळ आहे. मंगोलियामध्ये तर घोडेस्वारी व FALCONRY हे जवळपास त्यांच्या संस्कृतीचे भाग आहेत. मंगोलियात ह्याचा उत्सव करतात व त्या निमित्ताने स्पर्धा भरवल्या जातात.
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो
Thanks !
Saturday, February 18, 2017
Birds in war
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment