Saturday, December 31, 2016

लोकराजा : छत्रपती शाहू महाराज

       शाहू, छत्रपती (कोल्हापूर) : (२६ जून १८७४– ६ मे १९२२). महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.
         त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.
          कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.
वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रात हा एक अभिनव प्रयोग होता.
शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.
           बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
         खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.
             मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले (१९१८-१९). त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०).
          याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.
अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली (१९१८). स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला (१९१९). मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.
सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्-सुफलाम् करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (१९१३).
        शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.
शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने (१९१८) ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.

Friday, December 30, 2016

बाबासाहेब आंबेडकर :विचारधन

१. "ग्रंथ आणि भाकरी यापैकी मी प्रथम ग्रंथ पसंद करेन आणि नंतर भाकरी."
      
२. "कोणत्याही समाजाची उन्नती, त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबुन आहे."
       
३. "समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही. समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."

४. "जोपर्यंत तुमच्यात आत्मचिंतन,आत्मविश्वास,आत्मसंन्यासाची आणिआत्मसंयमाची भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत तुमचा उध्दार होणार नाही."

५. "जेथे एकता तेथेच सुरक्षितता"

६. " मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते."

७."माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.."

Thursday, December 29, 2016

सर्वोच्च बलिदान

या दोन कथा आहेत, दोन्ही कथा वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की आपण आज जे काही करतो त्याचा पुढील पिढीवर परिणाम किती आणि कसा होतो !!!
===================================================
पहिली कथा
===================================================
           आपल्याला अल कॅपिनो माहीत असेलच, एके काळचा शिकागोचा सर्वात मोठा डॉन. त्याने अक्षरशः शिकागो वर राज्य केले आहे. दरोडे असो कि खून किंवा जुगार किंवा वेश्यागृहे, तुम्ही ज्या कुठल्या गुन्ह्याची कल्पना करू शकाल ते सगळे गुन्हे अल कॅपिनोनी केले होते. "इझी ऐडी" असे टोपण नाव असणाऱ्या आणि कायद्याला वाट्टेल तसं वाकवू शकणाऱ्या वकिलाच्या मदतीने कायद्याच्या कचाट्यातून हा माणूस मात्र नेहमीच सुटत आला.
           या बदल्यात इझी ऐडीला अल कॅपिनोनी जबर पैसा, मोठे घर वगरे सगळ दिलं. इझी ऐडीच घर एखाद्या नगराएवढे मोठे होते. संपूर्ण सुरक्षा होती. नोकरचाकर देखील होते दिमतीला. या ऐडीचा जीव मात्र एकुलत्या एका पोरात होता. गुन्हेगारी विश्वाचा एवढा मोठा वकील पण त्याने  आपल्या पोराला मात्र या सगळ्यापासून दूर ठेवले. सत्य असत्याची जाण करुन दिली. ऐडीला नेहमी वाटायचं की आपला मुलगा मोठा झाला की त्याला समाजात आदरयुक्त स्थान असावे. इतकी प्रचंड संपत्ती असून ऐडी मात्र आपल्या मुलाला न चांगले नाव देवू शकत होता न चांगली उदाहरणे.
        एका दिवशी ऐडीला ही घुसमट पेलवेना आणि त्याने अल कॅपिनोची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला याची किंमत माहीत होती. अक्ख्या शिकागोवर राज्य करणार्‍या डॉनच्या विरुद्ध तो उभा होता. पोलिसांना आणि कर अधिकार्‍यांना त्याने अल कॅपिनो विरुद्ध सगळी माहिती आणि पुरावे दिले.
       परिणाम भीषण झाला. एका दिवशी भर रस्त्यात त्याची हत्या झाली. पण त्याने त्याच्या मुलासाठी मात्र एक उदाहरण निर्माण केले होते. सत्यासाठी जीवही जाऊ शकतो. राह कठीन है मगर अंतिम जीत सत्य कीही होती है !!!
      पोराला हे शिकवण्यासाठी त्याने सर्वोच्च बलिदान दिले होते !!
पोलिसाना ऐडीच्या खिश्यात रोझरी आणि एक कविता सापडली
The poem read:
The clock of life is wound but once,
and no man has power to tell just when the hands will stop
At, later or early hour
Now is the only time you own.
Live, love, toil with a will
Place no faith in time
For the clock may soon be still
===================================================
दुसरी कथा
===================================================
         दुसऱ्या महायुद्धाने जगाला अनेक हिरो दिले. असाच एक साहसी योद्धा होता Butch O'Hare. फायटर पायलट असलेला बुच विमानवाहक युद्धनौका Lexington वर होता या महायुद्धात. साऊथ पैसीफिक या महासागरात ही युद्धनौका तैनात होती.
         एका दिवशी अख्ख्या स्क्वाड्रनला एका मिशन वर पाठवण्यात आले, आकाशात उडाल्यावर बुचच्या लक्षात आले कि त्याच्या विमानात पुरेसे इंधन नाही आहे. बेसकॅम्पनी त्याला परतण्याचा आदेश दिला. खट्टू मनानी बुचनी फॉरमेशन सोडले आणि परत यायला निघाला. परत निघालेल्या बुचला रक्त गोठवणारे दृश्य दिसले. मोठं जपानी स्क्वाड्रन बुचच्या युद्धनौकेवर चाल करून येत होते. अमेरिकन स्क्वाड्रन सोर्टीवर निघाले होते आणि त्यांनी युद्धनौका अक्षरशः हतबल होणार होती. बचाव करायला नौकेवर एकही विमान नव्हते आणि बुचच्या विमानात पुरेसे इंधन पण नसल्यामुळे तो अमेरिकन स्वाड्रनला परत आणू शकणार नव्हता. जपानी स्क्वाड्रनशी लढणे हा एकाच पर्याय बुचला दिसला आणि तो बेभानपणे जपानी फॉरमेशन मध्ये घुसला. असेल नसेल तो सगळा दारुगोळा त्याने वापरून काही जपानी विमानांना घायाळ केले. दारुगोळा संपल्यावर विमानाचे पंख त्याने शस्त्र म्हणून वापरायला सुरवात केली. जपानी स्वाड्रनची पाच विमाने त्याने पाडली होती आणि उरलेल्या जपानी स्क्वाड्रननी माघार घेतली.
          आपल्या अतिशय नुकसान झालेल्या विमानाला बुचने कसे बसे युद्धनौकेवर उतरवले. विमानात असलेल्या कॅमेराने बुचचा भीम पराक्रम रेकॉर्ड केला होता. बुचच्या या पराक्रमाची सगळ्यांनी दाद दिली. आसमंतात ऐकू जातील इतक्या जोऱ्यात टाळ्या वाजवण्यात आल्या. २० फेब्रुवारी १९४२ ला केलेल्या या पराक्रमासाठी बुच नौसेनेचा FIRST ACE OF WWII झाला आणि शौर्यपदकांनी त्याचा सन्मान करण्यात आला.
         मात्र या अवघा २९ वर्षाचा महान योद्धा पुढील वर्षी एका हवाई कारवाईत मारल्या गेला. त्याच मूळ शहर त्याला विसरू शकणार नव्हते. त्याच्या शहराने त्या शहरातील विमानतळाला त्याचे नाव दिले.
          आपण कधी शिकागोला गेलात तर O'Hare आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचा पुतळा बघा. टरमिनल १ आणि २ च्या मध्ये हा या वीराचा पुतळा !!!!
===================================================
आता तुम्ही म्हणाल कि या दोन कथांचा एकमेकांशी काय संबंध.......................
Butch O'Hare हा ईझी ऐडीचा मुलगा होता !!

Tuesday, December 27, 2016

पॅराशूट

पराशूटच्या शोधाचे श्रेय लुई-सेबॅस्टियन लेनॉरमॅड या फ्रेंच संशोधक आणि डॉक्टरकडे जाते.२६ डिसेंबर १७८३ रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील माँटपेलिए आँब्झर्वे दरीच्या तळभागात गोळा झालेल्या लोकांच्या समोर त्याने या आँब्झर्वेटरीच्या मनोऱ्यावरुन पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली.
          या पॅराशूटला एक लाकडी चौकट जोडण्यात आली होती.त्याला धरून लेनॉरमॅडने उडी मारली होती.हे जगातील पहिले पॅराशूट होते..........
          हे पॅराशूट चौदा फूट लांबीचे होते.चीनमध्ये पाठवण्यात आलेल्या फ्रेंच राजदूताने लिहून ठेवलेल्या अनुभवांतून लेनॉरमॅडला पॅराशूट तयार करण्याची प्रेरणा मिळाली असावी. कारण चीनमध्ये छत्रीच्या सहाय्याने उडी मारणाऱ्या कासरतपटूंबद्दल त्याने लिहून ठेवले होते.याचा अर्थ पॅराशूटचा शोध प्राचीन चीनमध्ये लागला असावा.इ.स.पू.९०च्या सुमरास काही कैदी तुरुंगाच्या मनोऱ्यावरून गोलाकार शिरस्राणांच्या आधारे उडी मारून निसटले,असा उल्लेख एका चिनी दंथकथेत आढळतो.१४८५ मध्ये महान इटालियन संशोधक,चित्रकार लिओनार्डो-दा-विंची यानेही पिरॅमिडच्या आकाराच्या पॅराशूटचे स्केच काढले होते.पण त्याची हि कल्पना प्रत्यक्षात आल्याचे पुरावे आढळत नाहीत........

=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

चला हसूया, मस्त जगूया (भाग 2)

इतिहासाचे प्राध्यापक: माझ्याशी भांडू नका,नाहीतर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील सगळे सैन्य तुमच्यावर सोडीन.
गणिताच्या मॅडम: सोडून तर बगा,नाही तुम्हाला कंसात घालून शून्याने गुणलं तर नाव नाही सांगणार

Sunday, December 25, 2016

चेटकीण प्रथेचा काळा इतिहास

           ऐतिहासिक काळात स्त्रियांना चेटकिणी समजून ठार केले जाई. आज त्यांची गर्भातच हत्या करण्याचे प्रमाण चिंता करावी एवढे वाढत चालले आहे. स्त्रीमुक्तीसाठी लढणाऱ्या सावित्रीबाई किंवा क्लारा झेटकिन यांचे प्रयत्न व्यर्थ जाणार काय?
          स्त्री-मुक्ती दिनानिमित्त या विषयावरील खास लेख देत आहोत. चेटकिण प्रथेचा काळा इतिहास तपासला तर संस्कृतीने स्त्रियांवर कसे निर्दयी अत्याचार केले हे समजून आपण अस्वस्थ होऊ. चेटूक विद्येच्या(witchcraft) विरोधातील कायदा रोमन काळापर्यंत मागे जातो. तंत्र-मंत्र करणारे व हातचलाखी करणारे यांना दंड(फाशीसुद्धा) करणारे कायदे यांचा Decimuiral code d Lex Cordelia मध्ये उल्लेख सापडतो. 1595 मध्ये लॅटीन इतिहासकार व कवी आपल्या Daemonolatrica या ग्रँथात चेटूक विद्या जाणणाऱ्यांना कडक शिक्षेचे समर्थन करतो. त्याच्या मते असे लोक म्हणजे कायमची पिसाळलेली कुत्री होत.
           पण ज्याच्याशी वरीलपैकी कशाचीही तुलना करता येणार नाही अशी चेटकिणी विरुद्ध सुनियोजित दुष्ट मोहीम इ.स.1484 मध्ये 8 व्या पोप इनोसंट याने सुरु केली. चेटकिणीविरुद्धचा पोपचा लिखीत जाहिरनामा म्हणजे मानवी इतिहासातील सर्वात काळे पान म्हणावे लागेल : या जाहिरनाम्यात चेटकिणी ओळखायच्या कशा, प्रश्न विचारुन तपासायच्या कशा, त्यांच्यावर दोषारोप ठेवून त्याना मारायचे कसे याचे तपशीलवार वर्णन आहे. त्याना न्याय व दोषारोपापासून सुटकेची व्यवस्था नाकारण्यात आली. दोषारोप व मृत्युदंड केवळ ऐकीव माहितीवर व अफवांच्या आधारे शाबीत केला जाई.
          याच काळात मुद्रणकला विकसित झाल्यामुळे नवीन लेखकाना गूढविद्येवर लिहून प्रसिद्धी मिळविण्याची संधी मिळू लागली. अज्ञानातून ज्ञानाकडे उत्क्रांत होत जाताना मानवी अत्याचाराच्या रक्तरंजित कहाण्यानी भरलेल्या वाङ्मयात चेटकिणीवरील अत्याचारांचे तपशीलवार विविध वर्णन आढळते. वाङ्मयातून दोषारोप ठेवलेल्यांचा छळ करण्यासाठी बेलगाम उत्साहाचा अतिरेक दाखविणाऱ्या तथाकथीत यंत्रणेचे तपशीलवार वर्णन देण्यात आले आहे.
           धंदेवाईक चेटकिणीचा शोध घेण्याच्या बहाण्याखाली, परपीडेत आनंद मानणाऱ्या व लैंगिक विकृतीने पछाडलेल्या, सुमार बुद्धीमत्तेच्या मंडळींना अंधार युगातील वातावरणाने मोकळे रान मिळाले. सफोकमधील मॅथ्यू हॉपकिन्स हा त्यापैकीच एक. पूर्वाश्रमीचा वकील व नंतर स्वत:स चेटकिणी शोधक(witch Finder General) म्हणवून घेणारा हा गृहस्थ. चेटकिणींचे वास्तव्य असणाऱ्या भागात तो शोध घेई. त्यासाठी रहाण्याची, जेवण्याची व प्रवासाची मोफत सोय अधिक 20 शिलिंग बोनस असा त्याचा दर असे. चेटकीण शोधण्याची त्याची पद्धत अशी- संशयिताला नग्न केले जाई, बांधून पाण्यात फेकले जाई. जी पाण्यावर तरंगेल ती चेटकीण असे जाहीर केले जाई व तिला शिक्षा केली जाई. मात्र जी बुडून जाई ती निरपराध असल्याचे जाहीर होई. काही जणींना स्टुलावर आलकट-पालकट घालून कित्येक दिवस अन्न व पाणी न देता बसायला लावले जाई तर काही जणाना कित्येक दिवस अनवाणीपणे न थांबता पायाला फोड येईपर्यंत चालायला भाग पाडले जाई. केवळ 14 महिन्याच्या काळात अशा तथाकथित शेकडो चेटकिणींना हॉपकीन्सने ठार मारले. त्यातल्या सफोकमधील 68 जणी 1645 मध्ये मारण्यात आल्या.
         1950 मधील ऍंटी-अमेरिकन चेटकीण-शोध मोहिमेप्रमाणेच हॉपकिन्सने त्याच्या कमिटी सभासदाबरोबर संपूर्ण इंग्लंड चेटकीण-शोध मोहिमेसाठी धुंडाळले व फीच्या रुपात भरपूर संपत्ती कमावली. अखेर निरपराधी स्त्रियांचा छळ करण्याची त्याची कृष्णकृत्ये उजेडात आणली गेलीच व बदनाम होऊन त्याला हा छंदा सोडावा लागला. त्यानंतर वर्षभरातच तो क्षयाने मरण पावला.
            युरोपात सर्वत्र, विशेषत: जर्मनीत तपास घेण्याचे प्रकार अतिशय अमानुष होते. सुया व दाभण टोचून शरीराचा संवेदनाशून्य भाग शोधला जाई. या पाठीमागचा अंधविश्वास असा की, चामखीळ शरीरवरचा एखादा डाग, जन्मखूण, तीळ अगर तत्सम बधीर भाग यांच्यामधून दुष्टात्मा त्या व्यक्तीशी संपर्क करु शकतो. अशा शरीर ठिकाणाद्वारे दुष्टात्मा चेटकिणीशी संवाद साधतो(करार करतो) अशी या पाठीमागची समजूत. अशी खूण ही ती व्यक्ती दोषी असल्याचा पुरावा समजला जाई. अशी खूण दडवली असेल तर ती शोधण्यासाठी व दुष्टात्म्याबरोबरचा चेटकिणीचा संबंध सिद्ध करण्यासाठी, त्या व्यक्तीचा छळ केला जाई कारण दुष्टात्म्याला समोर हजर करणे अशक्य होते. पुरुषाच्या बाबतीत अशी खूण पापणीच्या खाली, काखेत, ओठावर, गुद्द्वाराजवळ व वृषणावर शोधली जाई. बाया व मुली यांच्याबाबतीत अशी खूण जननेंद्रिय, स्तन व स्तनाची बोंडी येथे शोधली जाई. या क्षेत्रातले तथाकथीत विशेषज्ञ ब्लेड आत ओढले जाईल अशा वस्तऱ्यांचा कौशल्याने उपयोग करण्यात तरबेज होते. संबंधित व्यक्तीच्या शरीर खुणेतून रक्त येऊ नये यासाठी ही युक्ती. हेतू असा की, वस्तऱ्याने देखील रक्त निघत नाही म्हणजे तो भाग बधीर असला पाहिजे म्हणजेच ती व्यक्ती चेटूक/चेटकीण असली पाहिजे हे दाखविणे.
          चेटकिणीचा आरोप सिद्ध करायचाच, शिक्षा द्यायचीच असे अगोदरच निश्चित करुन, या कारस्थानास पकडलेल्या दुर्दैवी स्त्रियांचा लैंगिक छळ, पशुही लाजतील अशा दुष्टपणे अनैतिकपणे, अमानुषपणे तपास अधिकाऱ्याकडून केला जाई. गुप्त इंद्रियांवरचे केस काढले जात. त्यावर अल्कोहोल ओतले जाई व त्याला आग लावली जाई, तरुण मुलींना नग्न करुन बराच वेळ कारणाशिवाय सुक्ष्मपणे तपासले जाई, त्यांच्यावर बलात्कार केला जाई व त्यांच्या नखांमध्ये तप्त खिळे घुसविले जात. भयानक यातनामय शिक्षेची भीती दाखवून, आरोपींना कबुलीजबाब देण्यासाठी भाग पाडण्यात येई. हातापायाची बोटे तोडणे, वितळलेले शिसे ज्यात ओतले आहे अशा बुटात पाय घालणे, तेलात जिवंत जाळणे, कातडी सोलणे(त्यासाठी तापवलेल्या लाल भडक पकडीचा उपयोग केला जाई) वॅगनच्या चाकावर हातपाय पसरून बांधणे व एकापाठोपाठ एक हाडे मोडणे. वय, गरोदरपण, लिंग कशाचाही विचार नाही. स्त्रिया व तरुणी यांचे बाबतीत तर इतरांपेक्षा अतिरेकच केला जाई. तापवलेल्या चिमटयाने स्तनांचे तुकडे ओढले जात, तापवलेली सळी योनीमध्ये खुपसली जात असे. इतके करुनही कोणी जिवंत राहिलेच तर तीस जिवंत जाळले जाई.
         जेलर्स, तपास अधिकारी व मारेकरी(शिक्षेकरी) यांनी निष्ठूर व अपरिपक्व बुद्धीने केलेल्या छळांचे वर्णनाचा सर्व तपशील दु:खदायक खराच आहे पण यापेक्षा वेदनादायक म्हणजे अशा कृत्याना चर्चने दिलेली मान्यता. अशा प्रकारे 10 लक्ष लोकांची कत्तल केली गेली आणि या सर्व प्रकाराला जी फूस मिळाली त्याचे मूळ अंधश्रद्धा व अति नैसर्गिक शक्तीवरचा विश्वास हेच आहे. सामान्यपणे जे आकलन होते त्यापेक्षा वेगळे सामर्थ्य आपल्याकडे आहे असा ज्यांचा दावा असे ते सर्वजण, भविष्य जाणणारे मन:शक्तीने आजार बरे करणारे, हातचलाखी करणारे, मांत्रिक एवढेच नव्हे तर काही समकालीन वैज्ञानिकांचे महत्त्वपूर्ण संशोधन यांचा संबंध चेटूकविद्येशी जोडला जाई(गॅलिलिओच्या दुर्बिणीत चेटूक आहे इ.) धर्मसंस्थेला अशा तऱ्हेचे अति नैसर्गिक प्रकार मान्य नव्हते. जे अशा प्रकारांचा वापर करीत त्यांना धर्मसंस्था पाखंडी ठरवून शिक्षा करी.
           कॅथालिक पंथियांच्या काही कर्मकांडावर सुद्धा प्रॉटेस्टंटानी असे आक्षेप घेतले आहेत. चर्चने तात्त्विकदृष्टया चेटूकविद्या ही पाखंडी प्रकारची काळी प्रणाली मानली. ही सैतानाची पूजा ज्यांनी त्याच्याशी गुप्त करार केला आहे, व जे देवाशी अप्रामाणिक आहेत. याला शिक्षा देहांताचीच. मात्र ग्राम पातळीवर,(येथेच चेटूक गिरीचे प्रकार जास्त घडत) चेटूक कला म्हणजे गूढ उपयांनी दुसऱ्याचे वाईट करणे असा समज होता. चेटकिणीचे आरोप हे मुख्यत: खेडुतांच्या आपापसातील हेव्या दाव्यातून होत असत. औषधांचा वापर करुन, व देवाची प्रार्थना करुन देखील एखादा आजार बरा होत नसेल वा संकट टळत नसेल तर अशा वेळी आपल्या दुर्दैवाला चेटकीण कारणीभूत आहे असा सरळ आक्षेप घेतला जाई.
         राजकारणी मंडळी आपल्या प्रतीस्पर्धा्याचे यश व स्वत:चे अपयश यांचे कारण थेट चेटूक प्रकाराशी जोडीत असल्याचे पुरावे मिळतात. राजकीय मंडळीचे सेवक अशा बाबतीत अनेक प्रकारच्या अफवा पसरवीत. यातील पुष्कळसे आरोप खोटारडे व मत्सरापोटी असत. गूढ घटनाशास्त्राबद्दल चिकित्सक अभ्यास केलेला स्कॉट लिहितो-अशा प्रकारच्या छळाच्या वातावरणात(Torture) कोणीही व्यक्ती आरोप नाकबूल करेल तरच नवल-हा संदर्भ तथाकथीत आरोपी तरुण मुलीच्या नखात तप्त लोखंडी सुया घुसविण्याच्या प्रकाराबाबतचा आहे. स्कॉट आत्मविश्वासपूर्वक एक मुद्दा उपस्थित करतो. जर चेटकिणींना खरोखरच अति मानवी अघोरी शक्ती प्राप्त असेल तर त्यांनी केव्हाच मानवी समाज नष्ट केला असता. हा युक्तिवाद सद्य:काळात परामानसशक्तीच्या समर्थकानादेखील तंतोतंत लागू पडतो.
         विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या काळाआधी युरोपात चेटकिणीच्या आरोपाच्या घटना क्वचितच घडत. पण नंतर हे प्रमाण एकदम वाढले. यांचे कारण अंधारयुगातील धार्मिक, सामाजिक व लैंगिक चालीरिती ज्या नंतरही चालू राहिल्या त्याकडे जाते. पूर्वी गूढ घटनाबाबत चर्च कडून दैवी इलाज होत असत. दुष्ट शक्तीचा शाप उलटविण्याचे विधी चर्चमार्फत केले जात. धार्मिक क्रांतीमुळे कॅथालिक पंथातून प्रॉटेस्टंट पंथाची निर्मिती झाली. कॅथालिक पंथातही सुधारणा झाल्या. याचा परिणाम म्हणून जादूटोणा निवारणाबाबतचे विधी धार्मिक पंथाकडून बंद झाले. पण जादूटोण्याविषयी लोकांत समज होतेच. त्यांना ह्याबाबतचा पर्याय देण्यासाठी धर्मसंस्थेऐवजी ज्यांच्यावर जादूटोण्याचा वा चेटूक विद्येचा आरोप आहे त्याची चौकशी करणारी कायद्याची यंत्रणा निर्माण केली गेली.
         या काळाच्या अगोदर खेडेगावातील जाती व्यवस्थेमध्ये परस्परांना मदतीचा हात दिला जात असे. ज्या वृद्ध व विधवा स्त्रियांना जगण्याचे साधन अपुरे असे त्याना शेजारी नैतिक भावनेने मदत करत. नंतर नंतर शेजाऱ्याना मदत करण्याची ही रीत ओसरली. गरीबांच्या जगण्याच्या हक्काबाबत कायदा तयार झाला. आता नैतिक जबाबदारीऐवजी संबंधितांवर कायदेशीर जबाबदारीचे बंधन येऊ लागले. मग ज्यांच्यावर विधवा वा गरीब स्त्रीचे पालनाची कायदेशीर जबाबदारी येई त्यांनी त्याकडे कानाडोळा केल्यास तक्रारी होत. याला प्रतिक्रिया म्हणून अशा स्त्रियांवर चेटूक विद्येचे आरोप करुन त्यांना संपविण्याचे प्रकार सुरु झाले व वाढीला लागले. पश्चिम युरोपात लैंगिक उन्माद विकृती हे 'चेटकिणी'ना आरोपी करण्याबाबत आणखी एक कारण.
           स्वपीडन (Maschism) म्हणजे स्वत:ला पीडा देण्यात सुख मानण्याची विकृती. चेटकीण म्हणून जिच्यावर आरोप आहे ती व ज्यांनी आरोप केला ते(आरोपी व फिर्यादी) दोघांनाही लैंगिक मनोविकार(Nerosis) झालेला असे. आरोपीत चेटकिणी व नन्स यांना तीव्र लैंगिक दडपणामुळे नैराश्य येई. अशा बाया मग सैतानाशी प्रेमसंबंध केल्याचा दावा करीत. तपास यंत्रणेतील लोक नको तितक्या अधीरतेने त्यांच्या लैंगिक बाबतीतील पुरावे शोधण्याचा उपद्व्याप करीत. तरुण स्त्रिया व मुली याची वक्षस्थळे व जननेंद्रिये यांच्या वरील सैतानाच्या बारीकशा खऱ्या वा कल्पित ओरखडयाचाही कसोशीने शोध घेतला जाई.
              इ.स.1604 चा चेटूकविद्या कायदा रद्दबादल होऊन 1736 चा नवा कायदा जेव्हा अस्तित्वात आला तेव्हापासून चेटूकविद्येचे आरोप नाकारले जाऊ लागले. 1736 च्या कायद्याखालील अखेरचा खटला 1944 साली झाला. जादूटोण्याचा आरोप ठेवलेल्या हेलेन डंकन यांना 9 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. 1951 साली जुन्या 'witchcraft' कायद्याच्या जागी Fradulent Mediums Act हा नवा कायदा झाला. या कायद्यानुसार एखाद्याजवळ खरोखरची दैवी ताकद असण्याची शक्यता गृहीत धरली जाऊ लागली मात्र ढोंग करुन वा हातचलाखी करुन फसवणुकीच्या घटनांना शिक्षा देण्याची तरतूद केली गेली. एक चिकित्सक या नात्याने मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की, दैवी सामर्थ्याचा कोणताही निर्णायक पुरावा मिळत नसताना आणि अंध:विश्वासाच्या दुष्परिणामाचे अनेकविध ढळढळीत पुरावे नजीकच्या भूतकाळात मिळालेले असताना सुद्धा, खरोखरची दैवी शक्ती असलेली व्यक्ती असण्याचे गृहीत कसे काय स्वीकारले जाते? आजच्या काळात कुणी एखाद्याने आपण जादूटोणा जाणतो असे सार्वजनिकरित्या जाहीर केले तर आपण त्यास वेडा म्हणू. तरीसुद्धा असली मंडळी व त्यांचे साक्षीदार सैतानाचा जप करताना व मंत्रतंत्राचे प्रकार करताना आढळतात.
          आधुनिक जादूटोण्याच्या प्रकाराबाबत जेराल्ड गार्डनर या सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याने 1954 मध्ये 'witchcraft today'हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकावरुन अजूनही असे प्रकार समाजात घडताना दिसून येत आहेत. या व 1959 साली लिहिलेल्या दुसऱ्या ग्रंथात गार्डनरने शिंगाडया देव व देवीमाता यांना मानणाऱ्या संप्रदायाची मला कशी ओळख करुन देण्यात आली व ही मंडळी मंत्रतंत्राचा कसा प्रयोग करत होती याचा उल्लेख आहे. दुर्दैवाने गार्डनरने जादूटोण्याबाबत मांडलेल्या दुसऱ्या बाजूलाच अवास्तव प्रसिद्धी मिळाली-उदा.नग्नपूजा, पापक्षालनार्थ चाबूक फटके भव्य संस्कार विधी(The Great Rite) इ. ह्या शेवटच्या विधीमध्ये प्रमुख धर्मगुरु व धर्मसाध्वी यांचा धर्म मंडळातील इतर सभासदासमोर उघड असा लैंगिक समागम चालत असे. गार्डनरच्या काळापासून जादूटोणा संप्रदायात दोन गट पडले. काहींमध्ये लैंगिक समागमाला प्रमुख स्थान दिले गेले तर इतरांमध्ये प्युरीटन म्हणजे कडव्या धर्म बंधनाना महत्त्व आले. या दुसऱ्या प्रकारात विशिष्ट प्रकारचे झगे घालून किचकट कर्मकांड करण्याच्या बाबींचा समावेश होतो.
         चांद्रमहिन्यानुसार या मंडळीच्या वर्षात 13 सभा पौर्णिमेदिवशी होतात. काळया मेणबत्त्या, विविध प्रकारचे दोर, कांडया, धूप, चाकू, चांदीचे कप, बांगडया, जादूची वर्तुळे, शिंगे लावलेली शिरस्त्राणे व तत्सम इतर शरीर आवरणे यांचा उपयोग या प्रसंगी केला जातो. नाच व मंत्रउच्चार हा असल्या विधीचा महत्त्वाचा भाग. पक्षी व प्राणी यांचे बळीचे प्रकारही होत.
        सैतानाला निरोप देण्याचा विधी व त्यासंबंधी रक्ताने लिहिलेली शपथ ह्यांचा सुरुवातीला अशा कर्मकांडात समावेश असे. कोणताही विधी हा वेदीवर होत असे आणि एका प्रकारात Black Makes नामक विधी करताना तरुण विवस्त्र स्त्रीला वेदीवर खोटे खोटे बळी देण्याचा समारंभ होई. नंतर तिचा मुख्य धर्मगुरुबरोबर लैंगिक समागम होई. संप्रदायाच्या सभा गुप्ततेने चालत पण मधून मधून वृत्तपत्रात जादूटोण्याच्या घटनेचा वृत्तांत मोठया मथळयात प्रसिद्ध होई. यामध्ये मोहिनी विद्येच्या प्रयोगाचे वर्णन असे आणि काही वेळा या प्रकारात खून झाल्याचाही उल्लेख असे.
          1985 मध्ये बुई थाई ची (Bai Thi Chi) ह्या 51 वर्षीय व्हिएटनामी सरकारी अधिकाऱ्याच्या बायकोवर, जादूटोणा करणाऱ्याच्या मदतीने दुसऱ्या एका बाईवर काळया जादूचा प्रयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला. अशा प्रकारातून तिने फार मोठी संपत्ती जमा केल्याचा व जादूटोणा करण्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला. याबद्दल तिला आठ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत घडलेली घटना. 19 नागरिकांना दोन व्यक्ती जाळून मारण्याच्या आरोपाखाली 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. या दोन व्यक्तींना एका बालकावर जादूटोण्याने वीज पाडून मृत्यू घडवून आणल्याची शंका त्या 19 जणांनी घेतली होती. न्यायाधिशानी सखोल तपास करताना असा शेरा मारला होता की, या घटनेबाबतचा पुरावा बुद्धीला न पटणारा वाटतो आणि याबाबतचा खेडूतांचा विश्वास म्हणजे 'अर्थहीन बडबड' वाटते. ज्या दोन जादूटोणा डॉक्टरानी(मांत्रिकानी) त्या मुलाच्या मरणास कारण ठरलेला विजेचा लोळ ज्यांच्यामुळे पडला त्याना शोधण्यासाठी काही हाडे विखुरली होती. त्याना पण न्यायाधीशानी शिक्षा फर्मावली, निरपराधी लोकांना आपल्या अज्ञानातून मूर्खपणामुळे जीव घेणे हे सुसंस्कृत समाजात घडता कामा नये अशी पण न्यायाधीशाची प्रतिक्रिया झाली.
          विवेकी मनुष्य एखाद्या घटनेचा तर्कसंगत कार्यकारणभाव लक्षात घेतो. सैतानाला उत्तेजीत करता येत नाही अगर त्याचा संचार आपल्यात वा इतरात करता येत नाही, देवाला प्रसन्न करता येत नाही(विविध कर्मकांडानी) ही विवेकवाद्याची पक्की धारणा असते. हजारो वर्षांपासून ज्या पुराणकथा रचल्या गेल्या व टिकून राहिल्या त्या विकृत मंडळीच्या सुपीक डोक्यामुळे अंधश्रद्धेच्या आधारावर त्यांचे पोषण झाले. हजारो निरपराध स्त्री पुरुषांना जादू टोण्याच्या नावाखाली कसलाही निर्णायक पुरावा नसताना अज्ञानी व अंधश्रद्धाळू मंडळींनी(जी जादूटोणा खरा मानत होती) यातना दिल्या व जाळून मारले.
संदर्भ : 'witchcraft' A Skeptic`s Guide To The New Age

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...