Tuesday, December 13, 2016

बाबांचे बोलणे पहाडी

अनेक वेळा धाकधपटशा
क्वचित प्रसंगी लाडीगोडी
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी

शिस्तप्रिय अन् करडा चेहरा
असेच बाबा आठवातले
त्यांच्या विषयी मनात भीती
कधी न कळले वास्तवातले
भावंडाना पदराखाली
माय घेउनी लपवी खोडी
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी

कुटुंबाचिया संकट समयी
उभे राहिले बनून कातळ
बाबामध्ये ताकत होती
झेलायाची प्रचंड वादळ
क्षुब्ध सागरी वल्हवायचे
संसाराची लिलया होडी
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी

सासरास मी जशी निघाले
माय ढसढसा होती रडली
पण बाबांची अविचल सूरत
विचित्र होती मला वाटली
बुरूज एकांती ढासळला
कळता सुटली सारी कोडी
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी

श्राद्धादिवशी रात्री बाबा
मला भेटण्या होता आला
मायेने माझ्या पाठीवर
हात फिरवुनी मला म्हणाला
"मायाळू बाबाच्या पायी
कठोर कर्तव्याची बेडी"
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी

नशीब माझे, मला मिळाला
आईचा भरपूर उबारा
मी घडायला पूरक ठरला
बाबांचा केवढा दरारा!
जन्मोजन्मी हीच मिळावी
मातपित्याची देवा जोडी
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...