बहिणाबाई चौधरी मराठीतील गाजलेल्या कवयत्री.त्यांच्या कविता मनाला स्पर्श करून जाणाऱ्या.काही कविता शालेय अभ्यास क्रमात समाविष्ट झालेल्या आहेत.त्यांच्या काही गाजलेल्या कविता खालीलप्रमाणे आहेत.तुम्हाला हि नक्की आवडतील
१)अरे, संसार संसार
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं
अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !
अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड
अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे
ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन् दुःखाले होकार
देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !
अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार
असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !
--------------------------------
2. मन वढाय वढाय
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा ।
जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? ।
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे ।
इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?।
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर ।
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना ।
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात ।
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं ।
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥
----------------------------------
3. कशाला काय म्हणूं नही ?
कशाला काय म्हणूं नही ?
बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं
नही वार्यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं
पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं
नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं
निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नहीं
आंखडला दानासाठीं
त्याले हात म्हनूं नहीं
ज्याच्या मधीं नही पानी
त्याले हाय म्हनूं नहीं
धांवा ऐकून आडला
त्याले पाय म्हनूं नहीं
येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं
नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं
अरे, वाटच्या दोरीले
कधीं साप म्हनूं नहीं
इके पोटाच्या पोरीले
त्याले बाप म्हनूं नहीं
दुधावर आली बुरी
तिले साय म्हनूं नहीं
जिची माया गेली सरी
तिले माय म्हनूं नहीं
इमानाले इसरला
त्याले नेक म्हनूं नहीं
जल्मदात्याले भोंवला
त्याले लेक म्हनूं नहीं
ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हनूं नहीं
त्याच्यामधीं नहीं चेव
त्याले शक्ती म्हनूं नहीं
No comments:
Post a Comment