Tuesday, December 20, 2016

पुरुष ते नरपशू

         अलीकडच्या काळात बलात्काराच्या घटनेनंतर निघणाऱ्या मोर्चात तरुण मुलांचा, प्रौढ पुरुषांचा सहभाग खूप लक्षणीय संख्येने असतो. पण माझ्या मते हा एक बुरखाधारी जमाव असतो ज्यांच्या चेहऱ्याआड एक नर लपलेला असतो. बरेच अपवाद असतील नाही असे नाही ….
             कोणतेही सोशल मिडियाचे माध्यम पाहिले तर असे दिसून येते की अश्लील, अर्वाच्च, पॉर्न आणि विजायीय लिंगी व्यक्तीबद्दलची अनुदार भावना यांचे प्रकटन करणाऱ्या ९५ टक्के पोस्ट पुरुषांच्याच असतात !
            ‘माल आपलाच’, ‘गटवलंस का सावज’, ‘लाईन तर मारणारच’, ‘५६ पोरी भाऊच्या मागे’, ‘कधी नेणार रगडायला?’, ‘ती तर आपलीच’, ‘टंच माल’ असे कोटयावधी कोटस तिथे आढळतील. हे सर्व भाषांत चालते. कॅमेरा असणारे फोन आणि व्हिडीओ चालवू शकणारे मोबाईल आल्यापासून हा प्रकार जास्ती वाढीस लागला.
         हा प्रकार महाविदयालयीन मुलेच करतात असे नव्हे तर अनेक पिकली पाने महिलांच्या इनबॉक्स मध्ये जाऊन आपला हिरवटपणा दाखवत फिरतात. त्याच्या रसभरीत पोस्ट सर्वत्र वाचायला मिळतात. खरे तर शोषण करण्यापासून ते शोषकाचा बचाव करण्यापर्यंत पुरुषांची एक साखळीच असते. रेड लाईट एरियात मागे केलेल्या एका सर्वेक्षणाचे आणि बलात्कारातील आरोपींच्या वर्गीकरणात एक मुद्दा समान आढळला होता. ज्यांना बहिण नसते त्या लोकांची टक्केवारी जास्त !
            मी अनेक पुरुष असे पाहिले आहेत की ज्यांना आपल्या पोरीबाळीकडे कुणी वाकडया नजरेने पाहिलेले आवडत नाही. पण त्यांच्या दिवटया कुलदीपकाने कित्येकांच्य मुली नासवल्या तर त्यांना त्याचा राग सोडाच एक विकृत अभिमान असतो. ही प्रव्रुती मोठ्या लोकांच्या, राजकारण्यांच्या, जमीनदारांच्या घरात मोठ्या प्रमाणात आढळते ! अनेक ठिकाणी आपले प्रमोशन वा हुद्दा टिकवण्यासाठी बायकोचा वापर करणारे महाभाग असतात तोही एक बलात्कारच असतो.
             टेंडर मिळवण्यापासून ते कामं करून देण्याची बक्षिसी म्हणून ‘स्कीन करन्सी’ असं गोंडस नाव देऊन नडलेल्या बायकामुली उपभोगल्या जातात हा व्यभिचारी बलात्कार असतो. नोकरी देण्याच्या आमिषाने, पगार वाढवण्याच्या निमित्ताने, इतर सोयी सुविधा देण्याच्या बहाण्याने आपल्या कार्यालयातील, कामाच्या ठिकाणच्या बायका ‘वापरणे’ हा काहींचा छंद असतो. हाही एक बलात्कारच असतो.
             राजकारणात स्त्रियांना जरी ५० टक्के स्थान सरकार देत असलं तरी त्यातील किती टक्के स्त्रिया राजकारण्यांच्या नात्यातल्या असतात हे सर्वांना ठाऊक आहे. असे असूनही राजकारणातील स्त्रियाकडे बहुतांशी चलनवलनाचे साधन म्हणून बघितले जाते. पुजारयापासून ते फकीरापर्यंतचे भोंदू देखील ही कृष्णकृत्ये करत असतात.
            कॉर्पोरेट जगतातील हायप्रोफाईल ऑफिस बिअर कुलीग पासून ते घरातील मोलकरणीपर्यंत कोणीही ‘सावज’ पुरुष जाळ्यात अलगद अडकवतात. अलीकडील काळात काही ठिकाणी महिलांनी देखील पुरुषांना ब्लॅकमेल केल्याच्या वा शोषण केल्याच्या घटना आढळून येताहेत पण पुरुषी पराक्रमासमोर त्यांचे प्रमाण नगण्य आहे.
            बलात्काराच्या निषेधमोर्चातून घरी परतणाऱ्या किती पुरुषांना सर्व स्त्रिया आपल्या माताभगिनी वाटतात हा माझा प्रश्न आहे ? आपल्या आईबहिणींच्या अब्रूची फिकीर बाळगणारा पुरुष दुसऱ्यांच्या आईबहिणीच्या इभ्रतीची लक्तरे जेंव्हा वेशीवर टांगतो तेंव्हा तो जगातील सर्वात असभ्य, हिंस्त्र, क्रूर व वासनांध पशु असतो.
               बलात्कार वाढतच आहेत, त्यावरचे निषेध मोर्चेही मोठाले निघताहेत, त्यातील पुरुषांचा सहभाग तर फारच वाढतोय मग हे नरपशू का कमी होत नाहीत ? ‘निर्भया’ची बरसी हा आम्ही सव्वीस जानेवारी व पंधरा ऑगस्ट सारखा एक इव्हेंट करून टाकला आहे. तेंव्हा जसे झेंड्याला सलाम केला की काम भागते तसे निर्भया हत्याकांडाच्या ‘बरसी’ला गुडघ्यात डोकं खुपसून बसलेली मुलगी आणि शेजारी ठेवलेली पणती जोडीला एखादा भावनात्मक ‘कोट’ शेअर केला की आम्ही स्त्रीचा सन्मान केल्याचे पुण्य अगदी विनासायास मिळवतो आणि सावज हेरायच्या तयारीस लागतो…
          आजकाल दहा वर्षे वयाच्या मुलापासून ते पंचाहत्तरी गाठलेले नवयुवक (!) बलात्कार करताना आढळत आहेत. तर उलटपक्षी सहा महिन्याच्या तान्हुलीपासून सत्तरीतल्या वृद्धेपर्यंत कोणाचेही सहज शोषण केले जातेय. बलात्कार ही एक पुरुषी वर्तनाची सामाजिक समस्या असून ती सुप्त स्वरुपात सार्वत्रिक अस्तित्वात आहे हे जोवर स्विकारून त्या नुसारचे सामाजिक शिक्षण व समुपदेशन दोनेक पिढया सातत्याने राबवले जाणार नाही तोवर स्त्री ही स्त्री न राहता अनेकांच्या लेखी मादीच राहील.
        बलात्कार हा केवळ एक गुन्हा नसून वर्तनसमस्या देखील आहे यावर कुठेच जोर दिला जात असल्याचे दिसून येत नाही. दोषींना सजा तर व्हायलाच पाहिजे पण बुरख्याआडच्या सभ्य पशूंचे काय करणार यावर कोणाकडे उत्तर आहे ? यावर जोपर्यंत खुलेपणाने विचार केला जाणार नाही तोवर कोटींच्या संख्येने पुरुष मोर्चेकरी बलात्काराविरुद्ध आक्रोश करू लागले तरी मूळ समस्या ‘जैसे थे’च राहील …
           परवा रांचीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्यंत हिंस्त्र पद्धतीने सामुहिक बलात्कार करून तिला अर्धवट जाळून ठार मारले गेले. त्याविरुद्ध लाखोंचा मोर्चा निघाला. चार आरोपींचा शोध घेणाऱ्या पोलिसांचा संशय मोर्चेकरी असलेल्या एका मुलावरही आहे तेंव्हा हे विचार जास्त प्रकर्षाने जाणवले.
         अनादी काळापासून स्त्रीला उपभोग्य समजून जगत आलेल्या पुरुषी मानसिकतेचा बदल होणे कठीण असले तरी अशक्यही नाही. पुरुषातला नर मरणे अशक्य आहे पण त्याचे रुपांतर नरपशूत होऊ न देणे शक्य आहे. त्या दिशेने प्रयत्न होणे आवश्यक आहे..
         मुद्दा केवळ गुन्ह्याचा नसून पुरुषांच्या आत्मपरीक्षणाचा आणि ‘नर’वादी वर्तनसुधारणेचा आहे हे व्यापक प्रमाणात उमजेल त्या दिवसापासून बदलास सुरुवात होईल हे नक्की …

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...