Tuesday, December 13, 2016

नमो फकीर, पण...


          उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी केंद्र सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयाला विरोध करणार्या विरोधकांवर जोरदार हल्ले चढवणे अपेक्षितच आहे. सरकारच्या निर्णयाने देशातल्या सर्वसामान्य जनतेचे, गरिबांचे कोटकल्याणच होईल, असा सूर लावत त्यांनी मोरादाबादच्या सभेत, विरोधकांवर तोफा डागताना, नोटाबंदीला विरोध करणारे विरोधक आपल्याला गुन्हेगार ठरवत आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई छेडणारे आपण गुन्हेगार कसे असा सवाल करीत, आपल्या विरुद्ध अपप्रचाराची आघाडी उघडणारे विरोधक आपले काय वाकडे करू शकतात असाही रोकडा सवाल केला. आपण तर फकिर आहोत, आपल्याला पैशाची हाव नाही, उद्या सत्ता गेली, तरी त्याची फिकीर आपल्याला नाही. सत्ता गेल्यावर झोळी घेऊन आपण निघून जाऊ., पण विरोधकांचे काय? ते काय करणार आहेत? त्यांना काळाबाजारवाल्यांची चिंता का आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत, प्रचार सभेसाठी जमलेल्या हजारो लोकांच्या टाळ्या मिळवल्या.
          मोदी सभा आणि प्रचार सभात आपण दीनदुबळ्यांचे, शोषितांचे प्रतिनिधी आहोत, गरिबी आपण अनुभवलेली आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयाने गरिबांना किती त्रास होतो, हे आपल्याला चांगलेच माहिती असल्याचे आवर्जून सांगतात. नोटाबंदीमुळे बँका आणि एटीएम केंद्रासमोर जनतेच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रांगेत तासन् तास उभे राहणार्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, याचीही जाणीव आपल्याला आहे. पण, या पूर्वीच्या केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारांच्या काळात गरिबांना गहू, रॉकेल, तांदूळ आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी रांगा लावाव्या लागत होत्या. यावेळी जनतेला नोटांसाठी रांगा लावाव्या लागत असल्या, तरी ही आता शेवटची रांग आहे. यापुढे जनतेला रांगा लावाव्या लागणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
           नोटा बंदीच्या निर्णयाला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा असला, तरी सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून याबाबत काढल्या जाणार्या रोजच्या नव्या फतव्याने सामान्य जनता हैराण झाली आहे. देशातली 37 टक्के जनता दारिद्र्यरेषेखालीच जगते आहे. ही जनता गरीब असली, तरी त्यांच्यावरकुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे. रोज घाम गाळून त्यांना पैसा मिळवावा लागतो. बायका, पोरांना वार्यावर सोडून मोदी यांच्यासारखे खांद्याला झोळी अडकवून त्यांना निघून जाता येणारे नाही, या संसारी माणसांच्या व्यथा आणि वेदनांची जाणीव मोदींना नसल्यानेच, जनतेला भूलवावण्यासाठी ते आपण फकीर असल्याचे सांगतात.
           त्यांच्याकडे पैसाअडका, मालमत्ता, संपत्ती फारशी नाही. ते स्वच्छ राजकारणी असल्याने, सामान्य जनतेत त्यांच्याबद्दल अतिव आदराची भावनाही आहे. पण, त्यांच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षातले हजारो नेते आणि मंत्री मात्र त्यांच्यासारखे मालमत्तेच्या हव्यासापासून मुक्त नाहीत. अनेक नेत्यांची मालमत्ता अब्जावधी कोटी रुपयांची आहे. आपल्याला मालमत्ता आणि संपत्ती, सत्तेचा मोह नाही, असे ही मंडळी मुळीच सांगत नाहीत. त्यांच्याच पक्षातल्या काही नेत्यांवर तर भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळवल्याचे आरोपही झाले आहेत. भाजपतले सारे नेते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, हे मात्र मोदी मान्य करायला तयार नाहीत.
              संपत्तीचा हव्यास 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय मोदींनी जाहीर केल्यावर सत्ताधारी भाजपच्या अनेक नेत्यांनीही बँकात पाचशे आणि हजार रुपयांच्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा भरल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केल्यामुळे, मोदीही व्यथित झाले असावेत. त्यामुळेच त्यांनी भाजपची सत्ता असलेल्या राज्यातल्या मंत्री आणि आमदारांनी, केंद्रातल्या मंत्र्यांनी, खासदारांनी आठ नोव्हेंबर नंतर बँकात किती पैसे भरले, याचा तपशील पक्षाकडे तातडीने सादर करायचे आदेश दिले आहेत. एक काळ जुन्या जनसंघाचे नेते नीतिमूल्याच्या राजकारणावर आढळ विश्वास ठेवूनच, निवडणुका लढवत होते. जुन्या पिढीतल्या नेत्यांना पैशाचा आणि सत्तेचाही मोह नव्हता. सत्ता हे लोकसेवेचे साधन आहे, यावर त्यांचा विश्वास होता. पण, गेल्या चाळीस वर्षात मात्र भाजपचेही काँग्रेसीकरण झाले. सत्ता हेच या पक्षाचे साध्य झाले. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवा आणि टिकवा, हेच ध्येय झालेल्या या पक्षात हवसे, नवसे आणि गवसे घुसले. जनमानसात कलंकित प्रतिमा असलेल्या नेत्यांनाही पक्षाने पावन करून घेतले.
      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेल्या नेत्यांनाही सत्तेचा वारा लागताच संपत्तीचाही मोह सुटला. भाजपमधले बहुतांश नेते आता कोट्यधीश, लक्षाधीश आहेत. त्यांची संपत्तीही सातत्याने वाढतेच आहे. मोदींच्या आवाहनानुसार ज्यांनी आपली रोकड आणि सोने-नाणे अलीकडेच जाहीर केले त्यात अरुण जेटली आणि अन्य काही केंद्रीय मंत्र्यांकडे किलो, पाच किलो सोने, सत्तर/ऐंशी लाखाची रोकड असल्याचेही उघड झाले. हंसराज अहेर यांच्याकडे दहा लाख सेहचाळीस हजार, साध्वी निरंजन ज्योती यांच्याकडे सहा लाख, साठ हजार, श्रीपाद नाईक यांच्याकडे बावीस लाख, बारा हजार अशी रोकड आहे. उमा भारती या तर संन्यासी, पण त्यांच्याकडेही 6 किलो वजनाची सोन्या, चांदीची भांडी आहेत.अन्य मंत्री आणि आमदारांच्याकडे असलेले पैसे मालमत्ता जाहीर झाल्यावर हे नेतेही किती श्रीमंत आहेत, हे जनतेला दिसेलच. लोकसेवा हाच आपला परमधर्म आणि ध्येय, असे मोदी-त्यांच्या पक्षाचे नेते सांगत असले, तरी वास्तव मात्र तसे नाही.
          रोज घाम गाळून कुुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या कोट्यवधी मजुरांवर नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्धपोटी राहायची, उपासमारीची वेळ आली, याचे भान जेटलींनाही नाही. मोदींच्याप्रमाणेच गरीब लोकही फकीर झाल्यास त्यांची अन्नान दशाच होईल, त्यांना कुणी दोन वेळा पोटाला खायलाही घालणार नाही. नोटाबंदीच्या निर्णयाचे आणि त्यानंतर काढलेल्या फतव्यांचे गरिबांवर, शेतकर्यांवर किती गंभीर परिणाम होतील, याचा विचारच केंद्र सरकारने केलेला नसल्याने देशातल्या कोट्यवधी शेतकर्यांवर कफल्लक व्हायचे दारुण संकट कोसळले आहे. जिल्हा बँका अणि पतसंस्थात ठेवलेले हक्काचे पैसेही शेतकर्यांना मिळत नाहीत. बियाणे आणि खतासाठी पैसे नसल्याने लाखो हेक्टर क्षेत्रातल्या रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या-लांबणीवर पडल्या. ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ठप्प झाली.
           शेतकर्यांना भाजीपाला-फळभाज्या मातीमोलाने विकाव्या लागत आहेत. त्यांची राजरोसपणे लूट सुरू आहे. ते खंक होत आहे. त्याची पर्वाही आपण जनतेसाठी पुन्हा फकिरी पत्करू, असे सांगणार्या मोदी आणित्यांच्या सहकारी मंत्र्यांना, पक्षातल्या नेत्यांना
नाही, हे जनतेचे दुर्दैव होय!
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...