१.सोपे नसते होणं आई :
नऊ मासाच्या प्रतिक्षेनंतर पाहिलं त्याचं मुख
आई म्हणून अनुभवलं मी ते जगावेगळ सुख
ते रडलं आणि मी हसले असा होता तो क्षण
आई म्हणाली पूर्ण झाला बाळंतपणाच9ा पण
वाटलं राजा राणीचा पूर्ण झाला आता संसार
काव्यात वगैरे बोलायचे तर त्याला आली बहार
पण दोनच दिवसात मांडलेलं सगळं गणित फसतं
कळून चुकत आई होणं इतकं सोपं नसत
कित्ती दिले तरी अपुरेच पडतात त्याला चौवीस तास
सेंट आणि deo कुठले नुसता शी आणि शु चा वास
हक्काचं माहेरपण आईबाबांनी ठेवलेली बडदास्त
सगळ्यांना हे बाळ गोड पण मला मात्र देत त्रास
कधी लागते उचकी तर कधी धरत श्वास'
कधी बिनसतं पोट तर कधी होतो gas
जेवण केलय आज आईने आवडीचे खास
पण सूर ह्याने काढला कि माझा अडकतोय घास
त्यातच इकडून तिकडून सूचनांचा पाऊस
हे करून बघ त्याला आणि हे नको खाऊस
डोक बांधून घे जरा कित्ती आहे पाऊस
दिवे लागणी झाली आता बाहेर नको जाऊस
कुणी म्हणे लागली असेल त्याला दृष्ट
काढून टाक एकदाची इडा पिडा होऊ देत नष्ट
सांभाळ बाई त्याला खूप आहेत infection
देऊन आणलंस का ग त्याला वेळेत injection
बाटली नको तिला चमचा वाटीच बरी
नीट लक्ष दे ती आहे आमची परी
मला ही ठाऊक आहे ह्या सूचनांमागचे प्रेम
म्हणून तर शक्यतोवर माझा नं बोलण्याचा नेम
पण मन मोकलं केलं माझं तर आईबाबांचे दुखावते
आणि नाही केलं तर बोलतात त्यांचे फावते
मलाही हवे वाटतात आत्ता माझेच आई आणि बाबा
तुम्ही आधी माझे अन मगच त्याचे आजी आणि आबा
कालपर्यंत होते मी कशी अगदी independent
पण अचानक आले कुणीतरी जे माझ्यावरती dependent
उठणं बसणं सारे माझे जोडलेलं त्याच्याशी
कित्तीतरी दिवसात मी आले नाहीच माझी माझ्यापाशी
लाड करता तुम्ही सगळे जरी बाबा मावश्या आणि ताई
गांगरून गेलेय मी खरच त्याची नवखी आई
हळवी झाले गांगरले तरी माघार घेणार नाही
वेळ थोडा जाऊ दे फक्त नका करू घाई
अवघड असली तरी जबाबदारी आहे ही प्रेमळ
आणि पिल्लासाठी येतच नं शेवटी आईच्या पंखात बळ
मलाही कळू लागलेत हळूहळू त्याच्या रडण्याचे अर्थ
आणि दिवसागणिक होतेच आहे मी आई म्हणून समर्थ
अजून द्यायचेत त्याला संस्कारांचे धडे
गिरवून घ्यायची आहेत अक्षर आणि घोकून घ्यायचेत पाढे
प्रवास इथून तर सुरु होतो इथे संपत नाही
पण कळून चुकत इतकं सोपे नसते होणं आई
===============================================================
२. आई :
भांडत होतो खूप खूप
मी आणि भाऊ
भांडणाचं कारण नव्हतं
आईनं दिलेला खाऊ
कारण एकच एक होतं
आठवण अजून ताजी
तो म्हणे आई त्याची
मी म्हणे माझी
भांडण अजून कायम आहे
आईच त्याचं मूळ
लहानपणीचं आईचं वेड
वाटतयं आता खूळ
"आई माझी" सोडून म्हणतोय
"माझी एकट्याचीच नाही"
या बेशरम बदलाची
हवा दिशा दाही
मोठ्यानं पाळावं आईला
छोटा सांगे रीत
मोठा म्हणे तुजवर आईची
जास्त होती प्रीत
कुठे गेली लहानपणची
आईची ती ओढ?
ओझ्यासाठी काढतात
व्यवहारिक तोड
एक महिनातुझ्याकडे
माझ्याकडे एक
पहिला महिना कोणाकडॅ?
करूत नाणेफ़ेक
दोघात येरझार करताना
चेहरा जाई थिजून
आई शुन्यात बघत राही
चिंब पापण्या भिजून
आई देवा समोर बसून
मागतेय एकच मागणं
बाळांना माझ्या सुखी ठेव
माझं झालय जगणं
आईच्या निधना नंतर
एकमत झालयं
दोघांनाही कोल्ह्याचं
शहाणपण आलयं
एका सुरात म्हणतात आता
प्रेमळ होती आई
वारसापत्रासाठी कराचीय
शपथ पत्रावर सही
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
No comments:
Post a Comment