Sunday, December 18, 2016

गोळ्या संपतील - विचार नाही

    मी हिंदू म्हणून जन्मलो.

माझे  आई-बाप पण हिंदू म्हणून जन्मले.
त्यांचे आई-बाप पण हिंदू म्हणून जन्मले.
त्यांचेही आई-बाप हिंदू म्हणूनच  जन्मले.

कोणतेही कर्तृत्व, पराक्रम न गाजवता,
आमच्या कुळाला धर्म मिळाला “ हिंदू "

माझ्या खापर पंजोबानं, पणजोबानं,
      धर्मात जे सांगितलय ते केलं.
     त्यांनी धर्मग्रंथ वाचला नव्हता.
        वाचायचा संबधच नव्हता.

  त्यांनी फक्त धर्माबद्दल ऐकलं होत.
  त्यांनी जे ऐकल तेच पुढे सांगितलं.

त्यांनी ऐकलं तेहतीस कोटी देव आहेत.
        मग तेही सांगायला लागले,
         तेहतीस कोटी देव आहेत.

     त्या प्रत्येक देवाचा वेगळा वार.
  त्या प्रत्येक देवाला वेगळा नैव्यद्य.
    त्या प्रत्येक देवाला वेगळी फुल.

काही देवांना गोडधोड पंचपक्वान्न,
तर काही देवांना तांबडया-पांढऱ्या
      रश्याच बकर-कोंबड, अंड.

        काही देवांना शुद्ध पंचामृत,
तर काही देवांना पहिल्या धारेची दारु.
       सोबत गांज्या आणि चिलिम.

   खापर पणजोबा आणि पणजोबा
      यांनी जे जे ऐकल ते ते केल,
        तेच आजोबांना सांगितलं.

       पण इथ थोडी गडबड झाली.
त्यांनी आजोबांना शाळेत घातलं होत.
     अक्षर ओळख होताच आजोबा
          विचार करायला लागले.

      मग, धर्माबद्दल त्यांना त्यांच्या
         वडलांनी व आजोबांनी
      जे सांगितलं, त्याबद्दल प्रश्न
            विचारायला लागले.

देव्हाऱ्यातल्या देवाचे लाड न करता
    दोन हात तिसर मस्तक टेकवून
          नमस्कार करू लागले.

माझ्या वडलांनी पण त्यांच्या वडलांनी
              जे केलं तेच केलं.
किंबहुना फक्त देवच देव्हाऱ्यात ठेवले.

      मग आता आली माझी वेळ.

  थोडी जास्त शिकलो मी या सर्वांपेक्षा.
        थोडी जास्त बाहेर फिरलो.
     थोडी जास्त वाचायला लागलो
   थेट पणे प्रश्न विचारायला लागलो.

        तेव्हा माझ्या लक्षात आल.

  माझ्या आजोबांनी आणि वडलांनी
  काही प्रमाणात देव-धर्म नाकारला.
   त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापुरता
             मर्यादीत ठेवला.
  सार्वजनिक आयुष्यात देव-धर्माला
    साध डोकावून सुद्धा दिल नाही.

        मग आता मी काय करतो,
  तर आजोबा आणि वडील यांच्या
         एक पाऊल पुढे टाकून
    केवळ सार्वजनिकच नाही तर
      वैयक्तिक आयुष्यात सुद्धा
            देव-धर्म ठामपणे
   आणि विचारपूर्वक नाकारतो

            कारण

  अमुक-तमुक देवाचा उपवास करून,
  अमुक-तमुक देवाला नवस बोलून,
  अमुक-तमुक देवाला पायी फेऱ्या मारून,
  अमुक-तमुक देवाला बकर-कोंबड वाहून,
  अमुक-तमुक देवाला दारू-गांज्या देउन,
  अमुक-तमुक देवाला हार तोरण वाहून,
  अमुक-तमुक देवाच्या कथा पोथ्या वाचून...

   माझ्या आयुष्यातला एकही प्रश्न
               सुटणार नाही.
         किंवा त्याच्या देवळात
        लोटांगण घातलं म्हणून
  माझं काही भलही होणार नाही,
        हे मला पूर्णतः समजलं.

        देव-धर्म यांच्या नावावर
        स्वताची पोट भरणाऱ्या
दुकानदारांच्या आयुष्याचे प्रश्न सुटणार,
             त्यांच भलं होणार

  आणि ते पुन्हा भोळ्या-भाबडया
       भाविकांचे शोषण करणार
         हे मला पूर्णतः समजले.

      आणि म्हणूनच मी थेट प्रश्न
            विचारायला लागले.

             अगदी साधे प्रश्न...

१. देवाला त्याच्या हाताने का जेवता येत नाही.
२. देवाला किंमती वस्तू का लागलात.
३. देव श्रीमंतांवर जास्त कृपादृष्टी का करतो.
४. देवाला हार-फुल, पंचपक्वान्न का लागतात. 
५. देवाला अवतीभवती काय होतय हे दिसत नाही का.
६. देवाच्या दारात सगळ्यात जास्त भिकारी का.
७. देवाकडे काही मागितल्यास त्याला त्याचा मोबदला का दयावा लागतो.
८. देवाचा जन्म बाईच्या पोटी झाला तर त्याला तिचाच का विटाळ होतो.
९. देवाच्या देवळाला आणि तिथे ठेवलेल्या दानपेटयाना कुलूप का लावावं लागत.
१०. ब्रह्मचारी असणाऱ्या देवांचा त्यांच्या ब्रम्ह्चर्यावर विश्वास नाही का.

   यांसारखे साधे प्रश्न मी आता विचारतो
            पण हे प्रश्न विचारले की,
   देव-धर्माच्या दुकानदारांची गोची होती.

    कारण त्यांच्याकडे उत्तरच नसत.
            मग ते काय करतात?
    काय करतात... काय विचारता...?

अहो, ते पाठीमागून गोळ्या झाडतात,
              भ्याडासारख्या...

     त्यांनी चार्वाकाला संपवल,
     त्यांनी शंबूकाला संपवलं,
     त्यांनी सॉक्रेटीसला संपवलं,
     त्यांनी संत कबिराला संपवलं,
     त्यांनी तुकारामाला संपवलं,
     त्यांनी डॉ. दाभोळकरांना संपवल,
     त्यांनी कॉ. पानसरेंना संपवलं,
     त्यांनी प्रा. कलबुर्गींना संपवलं,

          आणि आता ते उद्या
            मला हि संपवतील.

   मलाच काय तर प्रश्न विचारणाऱ्या
आणि प्रश्न विचारायला शिकवणाऱ्या
          प्रत्येकाला ते संपवतील.

          पण, त्यांना काय माहीत
            प्रश्न विचारणारे आणि
        प्रश्न विचारायला शिकवणारे
                 घाबरत नाहीत.

       गोळ्या घालणाऱ्यानों तुम्हाला
                 सांगणे एकच,
              असेल हिमंत तर
           समोरून गोळ्या घाला.

           गोळ्या संपतील, पण

           प्रश्न विचारणारे आणि
      विचारायला शिकवणारे नाही.

     =============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

    

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...