Thursday, December 15, 2016

15 December जागतिक चहा दिन

           जगात सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय म्हटलं कि, चहा आठवलाच म्हणून समजा. जगभर प्रिय असलेल्या चहाचे सेलिब्रेशन व्हावे यासाठी 2005 पासून 15 डिसेंबर हा ‘जागतिक चहा दिवस’ म्हणून श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा, भारत आणि टांझानिया येथे साजरा होतो.
            हा साजरा करण्यामागचा हेतू असा की, जागतिक चहा व्यापाऱ्यांचे कामगारांवर आणि उत्पादकांकडे लक्ष केंद्रित व्हावे.
          वर्ल्ड सोशल फोरमच्या 2004 मधील चर्चासत्रात नवी दिल्लीत हा दिवस 2005 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्याचे ठरले. नंतर 2006 आणि 2008 मध्ये श्रीलंकेत जागतिक स्तरावर साजरा झाला.
          2015 साली भारताने प्रस्ताव केला की, चहा दिन हा जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनांमार्फत पोहोचवण्यात यावा.  भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं.
          चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते… चला तर चहाच्या विविध प्रकारांवर नजर टाकुयात...!

_*सीटीसी चहा*_ :
         सीटीसी चहा म्हणजे आपण रोज घरात, आणि हॉटेलमध्ये पितो तो चहा. हा चहा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये बाजारात उपलब्ध आहे.
        चहाची पाने तोडून ती वाळवली जातात आणि मग त्यांना दाणेदार रूप दिले जाते. या प्रक्रियेत काही बदल होतात. चहाची चव आणि सुवास वाटतो. पण हा चहा ग्रीन टी इतका नैसर्गिक राहत नाही आणि तितका आरोग्यकारीही नसतो.

_*ग्रीन टी*_ :
          या चहाला प्रोसेस्ड केले जात नाही. हा चहा रोपाच्या वरच्या कच्च्या पानांपासूनच तयार केला जातो. पाने सरळ तोडून आपण चहा बनवू शकतो.     यात अँटी-ऑक्सिडंट जास्त असतात. ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. विशेषत: हा चहा दूध आणि साखर न घालता प्यावा. यात कॅलरीही नसते. ग्रीन टीपासूनच हर्बल आणि ऑर्गेनिक चहा तयार केले जातात.

_*हर्बल चहा*_ :
    ग्रीन टीत तुळस, अश्‍वगंधा, वेलदोडे, दालचिनी वगैरे घालून हर्बल टी किंवा चहा तयार होतो.
        यात एक किंवा तीन चार हर्ब एकत्र करूनही घातले जातात. बाजारात हर्बल टी तयार पाकिटातून मिळतो. सर्दी खोकल्यावर हा हर्बल चहा गुणकारी आहे. औषध म्हणून याचा वापर जास्त होतो.

_*ऑर्गेनिक टी*_ :
       ज्या चहाच्या वनस्पतींच्या वाढीसाठी कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला जात नाही, त्याला ऑर्गेनिक किंवा सेंद्रिय चहा म्हणतात. हा चहा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो.

_*व्हाईट टी*_ :
        हा चहा सर्वात कमी प्रोसेस्ड चहा आहे. काही दिवसांच्या चहाच्या कोवळ्या पानांपासून हा तयार केला जातो. त्याचा हलका गोड स्वाद खूप छान असतो. यात कॅफिनही खूप कमी आणि अँटी ऑक्सिडंट सर्वात जास्त असतात. एक कप व्हाईट टीमध्ये केवळ 15 ग्रॅम कॅफीन असते. तर ब्लॅक टीमध्ये 40 आणि ग्रीन टीमध्ये 20 ग्रॅम कॅफिन असते.

_*ब्लॅक टी*_ :
         कोणताही चहा दूध आणि साखर न घालता प्याला की, त्याला ब्लॅक टी असे म्हणतात.
     ग्रीन किंवा हर्बल चहा हा दूध न घालताच प्यायला जातो. पण कोणत्याही प्रकारचा चहा ब्लॅक टीच्या रूपात पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.

_*इन्स्टंट चहा*_ :
        या वर्गात टी बॅग्ज वगैरे येतात. म्हणजे पाण्यात घाला आणि लगेच चहा तयार. टी बॅग्जमध्ये टॅनिक अ‍ॅसिड असते, हे नैसर्गिक अ‍ॅस्ट्रीजेंट असते. यात विषाणूरोधक आणि जीवाणूरोधक गुण असतात. या गुणांमुळेच टी बॅग्ज सौंदर्य प्रसाधनांमध्येही वापरले जातात.

_*लेमन टी*_ :
      लिंबाचा रस असलेला चहा आरोग्यासाठी चांगला असतो. कारण चहाचे जे अँटी ऑक्सिडंट शरीरात मिसळले जात नाहीत, लिंबाचा रस घातल्याने ते मिसळले जातात.

_*मशीनचा चहा*_ :
      अनेक ऑफिसेस, रेल्वे स्टेशन, विमानतळ वगैरे सार्वजनिक ठिकाणी मशीनमध्ये पैसे टाकल्यावर लगेच चहा मिळतो. गरमागरम चहा पिण्याचे समाधान याशिवाय या चहातून काही मिळत नाही. कारण यात कोणताही घटक नैसर्गिक नसतो.

          इतरही काही प्रकारचे चहा आहेत, त्यात ताण घालवण्यासाठीचा चहा, रिजूविनेटिंग, स्लिमिंग टी आणि आईस टी सध्या खूप लोकप्रिय आहेत. या चहांमध्ये विविध प्रकारच्या वनौषधी मिसळलेल्या असतात.  उदाहरणार्थ दालचिनी, तुळस वगैरे. दालचिनीमुळे ताजेतवाने वाटते तर तुळशीमुळे प्रतिकारकशक्ती वाढते. स्लिमिंग टीमध्येही वजन कमी करण्यास मदत करणारे घटक आहे. चयापचय क्रियेचाही स्तर थोडा वाढतो.
            पण हा चहा केवळ पूरक म्हणून प्यावा. केवळ या चहाने वजन कमी होत नाही. आईस टीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. म्हणून तो पिणे हिताचे नाही.   

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...