शनि शिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश खुला केल्यावर मुंबईतील मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हाजीअली दर्ग्यातील ‘ मझार’ च्या परिसरात महिलांना प्रवेशावर घातलेली बंदी उच्च न्यायालयाने उठविली. न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे व रेवती मोहिते यांच्या खंडपीठाने दर्ग्याच्या सर्व भागांतील प्रवेश महिलांसाठी खुला करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला.
महिलांना प्रवेश देताना अडथळा अथवा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर राज्य सरकार आणि ट्रस्टने त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी तंबीही खंडपीठाने दिली आहे. मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर पंधराव्या शतकापासून मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या हाजीअली दर्ग्याचे दरवाजे अखेर न्यायालयाने महिलांसाठी उघडले.
त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील महिलांच्या आंदोलनास प्रचंड बळ मिळाले आहे. धर्माच्या नावाने राजकारण करणार्या, तसेच पुरुषी अहंकाराला हा तडाखा तर आहेच , पण मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्या ट्रस्टला झटकाही आहे. दर्ग्यात मझारपर्यंत जाण्याचा हा लढा कोणत्या एका धर्मातील परंपरांच्या विरोधात होता असा समज करून घेण्याचे कारणही नव्हते. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आपले स्वातंत्र्य आणि समान हक्क महिलांना प्राप्त झाले आहेत.
एका पुरुष संताच्या दर्ग्यात महिलांना थेट गर्भगृहात प्रवेश दिल्यास ‘ शरीयत’ मधील नियमावलीच्या विरोधात ते पाप ठरेल अशी भूमिका घेऊन या दर्ग्याच्या व्यवस्थापन समितीने प्रवेशास प्रतिबंध केला. मात्र माहिम येथील मकदू बाबांच्या दर्ग्यात महिला प्रवेश करीत असताना नेमक्या ह्याच दर्ग्यात प्रवेश नाकारण्यात आला होता. याचे कोणतेच तर्कबद्ध तर सोडाच पण प्रथापरंपरांचा आधार घेऊनही व्यवस्थापन समितीला समर्थन करता आले नाही. त्यामुळेच धार्मिक व्यवस्थेत न्यायसंस्था हस्तक्षेप करीत आहे अशी आवई बिनबुडाची आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे न्यायालयीन निर्णयानंतरही ट्रस्टने आपली भूमिका कायम ठेवत या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे ठरविले आहे. ही अर्थातच मनमानी वपुरुषी वर्चस्वाच्या जोरावर महिलांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारी भूमिका ठरते. या संबंधातील ज्या कलमांचा निर्देश करून हा निर्णय दिला आहे तोच सर्वोच्च न्यायालय कायम ठेवेल यात जराही शंका नाही.
महिलांना प्रवेशबंदी करणे हे राज्यघटनेच्या कलम 14 , 15 , 16 मधील तरतुदींच्या विरोधात आहे. मुस्लिम महिलांना मक्का, मदिना , नजफ आदी धार्मिक स्थळांत प्रवेश आहे. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी महिला व पुरुषांत कधीचभेदभाव केला नाही. उस्मानाबादच्या दर्ग्याततर गेल्या सात शतकांपासून महिलांना प्रवेश आहे.
ताजमहल येथील मुताज बेगमची कबर , फतेहपूरचा सलीम चिश्ती दर्गा , नागपूर येथील ताजुद्दिन बाबा दर्ग्यातील मझारपर्यंत महिलांना प्रवेश आहे. हाजीअली दर्ग्यातही पूर्वी महिलांना प्रवेश होता. मात्र दर्ग्याचे विेशस्त बदलल्यानंतर प्रवेश नाकारला गेला.
महिलांना घातलेल्या बंदीला कुराणात समर्थन नाही. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार्या दर्ग्यात लिंगभेदावरून प्रवेश नाकारलेला अनेकांना मान्य नव्हता. प्रार्थना करणे ही जर धार्मिक परंपरा आहे, तर मग महिलांना प्रार्थनेपासून रोखणारे तुम्ही कोण ? असा सवाल निर्माण होतो.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुल्ला-मौलवी ,पुजारी, पंड्या, गुरुजी, ट्रस्टी , विेशस्त या ठिकाणी हुकुमत गाजविणारे पुरुष आकाशातून टपकले नाहीत, तर त्यांनी कोणत्या ना कोणत्या स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहे. एवढे गणित टकुर्यात घुसलेतरी पुरे. मग महिलांना आंदोलन , लढा उभारण्याची गरजच पडणार नाही.
हाजीअली दर्ग्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशातील सर्वधर्मीय महिलांना पाठबळ मिळणार आहे. समाजातील सुधारणावाद्यांचा हा विजय आहे.
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
No comments:
Post a Comment