गोरखा सैनिकांबद्दल तुम्ही सर्वजण ऐकून असालच. त्यांच्या साहसाच्या शौर्याच्या गाथा ऐकताना आजही अंग अंग रोमाचून उठतं. भारतीय सैन्याचे सेनाध्यक्ष राहिलेले सॅम मॅनेकशॉ यांनी गोरखा सैनिकांबद्दल किती सुंदर वर्णन करून ठेवलंय ते म्हणतात,
जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की मला मरणाची भीती नाही तर त्या व्यक्तीबद्दल दोन शक्यता असू शकतात. एक म्हणजे तो व्यक्ती खोटं बोलतोय आणि दुसरं म्हणजे तो व्यक्ती गोरखा असला पाहिजे.
गोरखा सैनिकांच्या निडरतेची चुणूक दाखवणार हे वाक्य तंतोतंत खरं आहे हे सिद्ध करणारी एक घटना आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
दीपप्रसाद पुन नावाचा एक गोरखा सैनिक आहे. ब्रिटीश आर्मीच्या रॉयल गोरखा रायफल्सतर्फे २०१० मध्ये त्याची रवानगी अफगाणीस्तानमध्ये करण्यात आली. तो सप्टेंबरचा महिना होता. दीपप्रसाद कडाक्याच्या थंडीत हेलमंद नावाच्या प्रांताजवळील चौकीत ड्युटीवर होता. तेवढ्यात त्याला चाहूल लागली आणि त्याच्या लक्षात आले की काही तालिबान्यांनी चौकीला चारी बाजूंनी घेरले आहे. नक्की किती तालिबानी आपल्या प्राणाचा घोट घेण्यासाठी टपले आहेत याची कल्पना त्याला काही येत नव्हती. परंतु त्यांची संख्या जास्त आहे हे त्याला कळून चुकले होते.
एक गोरखा सैनिक असल्याने अश्यावेळेस घाबरून न जाता त्याने स्वत: मोर्चा सांभाळायचे ठरवले. दुर्दैवाने त्या रात्री चौकीवर त्याच्या सोबतही कोणी नव्हते. एक तर मारायचं किंवा मरायचं असा विचार करून दीपप्रसादने तालिबान्यांना कडवी झुंज देण्यास सुरुवात केली. तालिबानी देखील त्याच्यावर एके-47 चा वर्षाव करू लागले. पण दीपप्रसाद मात्र शांतपणे एक एका तालिबान्याला टिपत होता. ही धुमश्चक्री जवळपास अर्धा तास सुरु होती. दीपप्रसादने ग्रेनेड आणि इतर शस्त्रांचा वापर करून तालिबान्यांवर जोदार हल्ला चढविला. अचानक तालिबान्यांच्या बाजूने होणारा प्रतिकार थांबला. एव्हाना गोळ्यांचा आवाज ऐकून दीपप्रसादचे साथीदार देखील घटनास्थळी येऊन दाखल झाले. पण पाहतात तो काय? चौकीभोवती तब्बल ३० तालिबानी मृतावस्थेत आढळून आले.
त्या प्रसंगाची आठवण झाली की दीपप्रसाद सांगतो,
माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. ती परिस्थिती “मरा किंवा लढा” या प्रकारची होती आणि मरणाची भीती नसल्याने मी लढलो आणि त्यात यशस्वी झालो ही देवाची कृपा!
दीपप्रसादच्या या अतुलनीय साहसाचा किस्सा संपूर्ण ब्रिटीश आर्मीमध्ये आणि जगातील इतर देशांच्या लष्करामध्ये वाऱ्यासारखा पसरला. प्रत्येकजण त्याचं कौतुक करत होता. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून बकिंगहम पॅलेसमध्ये त्याला Conspicuous Gallantry Award या सन्मानाने गौरवण्यात आले.
दीपप्रसादचा जन्म नेपाळमधला! सध्या तो इंग्लंडमधील अॅशफोर्डमध्ये वास्तव्यास आहे. त्याचे वडील आणि भाऊ हे देखील गोरखा सैनिकच होते. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत तो लष्करात सामील झाला आणि ब्रिटीश आर्मीच्या गोरखा रेजिमेंटमध्ये त्याची निवड झाली
No comments:
Post a Comment