Saturday, March 11, 2017

वाचा सायबर कायद्याविषयी

प्रश्न : प्रेमात पडलेले दोघे. त्या दोघांनी मिळून आपल्या खासगी क्षणांचं शूटिंग केलेलं असतं. पण नंतर दोघांपैकी एक (किंवा मुलगा) ब्लॅकमेल करत असेल आणि मुलीनं सायबर कायद्याची मदत घेतली तर काय होऊ शकतं?

* आपले खासगी व्हिडीओ अथवा फोटो काढून कुणी धमकी देत असेल, तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे आयटी अॅक्टबरोबरच त्याच्यावर भादंवि कलमान्वयेही कारवाई होऊ शकते.

* अशा प्रकरणात घाबरून न जाता जवळच्या कुठल्याही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी. न्यायालयाच्या आदेशामुळे यात मुलीची ओळख उघड केली जात नाही. त्यामुळे तक्रार केल्यास प्रसारमाध्यमांमध्ये माहिती जाईल, आपले नाव समोर येऊन आपली बदनामी होईल ही भीती मुलींनी मनातून काढून टाकावी. कारण याच भीतीमुळे मुली तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत.

* कुणालाच या प्रकरणाबाबत कळू नये म्हणून तसे पत्रही न्यायमूर्तींना देता येऊ शकते. म्हणजे ती माहिती कुणाला कळत नाही. पुढे न्यायालयात खटला उभा राहिला तरीही आपला जबाब सर्वांसमोर न घेता इन कॅमेरा देता येऊ शकतो. तशी व्यवस्था कायद्यानं करण्यात आलेली आहे.

* यात अल्पवयीन मुलींचा समावेश असल्यास आयटीअॅक्ट, भादंविसह पॉस्को कायद्यान्वये कारवाई करण्यात येते. आरोपीला तीन ते पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते, तर भादंविनुसार शिक्षेचे स्वरूप वाढते.

* फेसबुकवरून व्हिडीओ व्हायरल केल्याचं समजलं तर आपल्या स्वत:च्या फेसबुकच्या सेटिंगमध्ये जाऊन फेसबुकला त्याबाबत कळवावं. त्यांच्याकडून असे व्हिडीओ ब्लॉक करण्यात येतात. शिवाय पोलीसही संबंधित सोशल साइटला याची माहिती देतात. व ते साइटवरून काढून टाकले जातात. त्यामुळे व्हायरल झालं तर काय याची भीती न बाळगता पोलिसांची मदत जरूर घ्यावी.
-------------------------------------
प्रश्न: फेसबुक अकाउण्ट हॅक झालं किंवा कुणी आपल्या नावानं फेक अकाउण्ट उघडलं तर तक्रार कुठं करायची?

* आपलं फेसबुक अकाउण्ट हॅक झाल्याचं समजताच आपण फेसबुकसेटिंगमध्ये जाऊन त्यात हॅकिंग, पायरसी असे विविध आॅप्शन असतात त्यापैकी हॅकिंगवर क्लिक करून याची तक्रार फेसबुकला द्यावी, जेणेकरून फेसबुक ते अकाउण्ट ब्लॉक करेल.

* आपलं नाव आणि फोटोचा वापर करून आपल्यासारखीच माहिती कोणी शेअर करत असल्यास त्याबाबतही फेसबुकला कळवावं. किंवा कोणी चुकीचा मेसेज शेअर केला असेल तर तोही त्यावरून त्वरित हटविण्यात येतो.

* त्यानंतर संबंधितांनी कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी. त्यांना तत्काळ मदत मिळते आणि ते अकाउण्ट कुणी हॅक केलं याचा पोलीस तपास करतात.
-------------------------------------
प्रश्न: आपले फोटो कुणी मॉर्फिंग करून व्हायरल केले तर काय करायचं? तसं करणाऱ्याला काय शिक्षा होऊ शकते?

*फोटो मॉर्फिंग करणं हा गुन्हा आहे. किंवा ते कोणी व्हायरल करून वैयक्तिक प्रतिमेला हानी पोहचवत असतील तर त्यांच्यावर विविध कलमान्वये कारवाई करण्यात येते.

* या प्रकरणात आयटी अॅक्टबरोबरच विनयभंगाचाही गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच आयटी अॅक्टमध्ये तरुणींसंबंधात पुढील कलमांनुसार ६६ (अ), ६६ (ब), ६६ (सी), ६६ (डी) आणि ६६ (ई) कारवाई केली जाते.

* ही सारी गंभीर कलमं आहेत त्यामुळे तसं करणाऱ्याला जबर शिक्षा होऊ शकते.
-------------------------------------
प्रश्न: कुणी आपल्याला सतत घाणेरडे व्हिडीओ लिंक्स पाठवत असेल तर काय करायचं? कुठं तक्रार करायची?

* आपली इच्छा नसताना कुणी आपल्याला घाणेरडे व्हिडीओ लिंक्स अथवा अश्लील मेसेज पाठवत असेल, त्यामुळे आपल्या मनात लज्जा उत्पन्न झाल्यास तो प्रकार विनयभंगात मोडतो. त्यामुळे थेट विनयभंगाचाच गुन्हा संबंधितावर दाखल होऊ शकतो.

* फक्त हात पकडून अथवा अश्लील चाळ्यांबरोबर एकटक पाहणं अथवा अशा स्वरूपाचे व्हिडीओ पाठविणाऱ्यांवर विनयभंगाच्या गुन्ह्यांनुसार कारवाई केली जाते. शिवाय आयटी अॅक्ट ६६ ई प्रमाणे कारवाई करण्यात येते.

* त्यामुळे संबंधितांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार करावी. विनयभंगाचा गुन्हा संबंधितावर दाखल झाल्यास त्याला कडक शिक्षा होते.

* कुणालाही असे मेसेज किंवा लिंक्स पाठवताना काळजी घ्या. ज्याला/जिला तुम्ही हे मेसेजेस पाठवत आहात, त्याला/तिला ते नको असतील तर तो गंभीर गुन्हा आहे.
-------------------------------------
प्रश्न: आपल्या व्यक्तिगत चॅटचे किंवा मतांचे कुणी स्क्रीनशॉट घेऊन ठेवले असतील आणि त्यावरून ब्लॅकमेल करत असेल तर काय करायचं?

* एकमेकांच्या स्क्रीनशॉटबाबत फक्त तक्रार असेल तर ते दोघेही एकमेकांविरुद्ध तक्रार करू शकतात.

* मात्र जर दोघांपैकी एक जण त्या स्क्रीनशॉटवरून ब्लॅकमेल करत असेल तर तो गुन्हा आहे. त्यावर आयटी अॅक्ट बरोबर भादंवि कलमानुसार कारवाई होऊ शकते.

* त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल होतो. त्यामुळे कुणी आपल्या आॅनलाइन मतांचे स्क्रीनशॉट्स घेऊन आपल्याला धमकावत असेल तर घाबरून न जाता पोलिसांकडे जाणं उत्तम.
----------------------------------------------
प्रश्न : मॉर्फिंग, हॅकिंग, आॅनलाइन छेडछाड असे गुन्हे करणाऱ्यांना काय शिक्षा होऊ शकते?

* आयटी अॅक्टनुसार या प्रत्येक तक्रारीसाठी गुन्हेगारांना ३ ते ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते, तर भादंवि कलमांची वाढ झाल्यास ती शिक्षा गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार ५ ते १० वर्षांपर्यंत पोहचू शकते.

* हा आॅनलाइन टाइमपास आहे, पोलीस काही करणार नाहीत असं कुणी समजू नये. कारण नुस्ता आयटी अॅक्ट नव्हे, तर अन्य कायदेही इथं काम करतात. आणि त्याद्वारे शिक्षा होऊ शकते.
प्रत्येक शहरात सायबर सेल असतात का? त्यांचे काही नंबर, हेल्पलाइन्स आहेत का?

* सद्यस्थितीत पोलीस मुख्यालयानुसार एक सायबर सेल असे एकूण ४३ सायबर सेल सध्या राज्यात कार्यान्वित आहेत.

* याव्यतिरिक्त येत्या काही दिवसांत स्वतंत्र अशा सायबर पोलीस ठाण्यांची सुरुवात होणार आहे. त्याचा प्रस्तावही संमत झाला आहे.

* त्यामुळे सायबरशी संबंधित असलेली कुठलीही तक्रार थेट सायबर पोलीस ठाण्यात करता येऊ शकेल.

* पण सायबर सेल नसेल तर नेहमीच्या पोलीस ठाण्यात जाऊनही तक्रार नोंदवता येऊ शकते.
-----------------------------------------
प्रश्न: सायबर कायदा हा कार्यरत आहे आणि त्यानुसार गुन्हेगाराला खरंच गंभीर शिक्षा होते का? मुळात अशा गुन्ह्यांपासून स्वत:चा बचाव कसा करायचा?

* गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा व्हावी म्हणून सायबर कायदा त्याची दक्षता घेतो.

* वाढत्या सोशल नेटवर्किंगच्या जाळ्यामुळे प्रत्येक जण अपडेट राहायला बघतात. मात्र अशावेळी आपण काय करतो याचे भान त्यांना राहत नाही. मुळात सोशल मीडियावर अपडेट राहताना आपण काय, कोठे आणि किती शेअर करत आहोत याचं भान ठेवणं गरजेचं आहे.

* आपण पोस्ट केलेला फोटो, माहिती कुणापर्यंत पोहोचावी याचेही आॅप्शन संबंधित साइट्सवर असतात. ते वापरायचे कसे हे शिकून घ्या.

* विशेषत: मुलामुलींनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या तक्रारी वाढत आहेत.

* अनेकदा मित्रमैत्रिणी एकत्र सेल्फी घेतात आणि पोस्ट करतात. किंवा अनेकदा दोघांमधील वैयक्तिक क्षणांचं चित्रण करतात. फोटो काढतात. आणि कुठे थोडी दरी निर्माण होताच याचाच फायदा घेत पुढे गुन्हे घडतात.

* होता होईतो स्वत:चा खासगी फोटो, व्हिडीओ पोस्ट करणं टाळा.

* अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करणं, आपली वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळा. एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करत असाल तर त्याची आधी माहिती काढा.

* मोफत मिळणारा वायफाय वापरणं बंद करा, कारण यातूनच आपली माहिती शेअर होते. मोफत-ओपन वायफाय वापरू नका.

* फेसबुकचा पासवर्ड सतत बदलत राहा. कुणालाही आपले पासवर्ड सांगू नका.

* चॅटिंग करताना त्याचा बॅकअप ठेवत जा. मेल अथवा अन्य ठिकाणी तो सेव्ह करून ठेवा. पुढे काही तक्रार आल्यास त्याचा फायदा त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा म्हणून होतो. थोडीशी काळजी घेतल्यास आपण या सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यातून नक्कीच स्वत:ला वाचवू शकतो.

* आणि एवढं करून गुन्हा घडल्यास सायबर कायद्यान्वये आणि भारतीय कायद्यान्वये आरोपीला शिक्षा होते, यावर विश्वास ठेवून तक्रार करा.
-------------------------------------
किरकोळ चूक नव्हे, गंभीर गुन्हा
          वाढत्या नेटवर्किंगमध्ये अपडेट राहण्याच्या नादात आपण काय, कोठे, किती आणि कुणाला शेअर करतोय याचं अनेकांचं भानच हरवत चाललं आहे. कोवळ्या वयात जुळलेले शारीरिक संबंध, त्यातून होणारी शेअरिंग, केअरिंग पुढे थोड्याशा अंतरानं नकोशी होते. त्यातूनच पुढे कायद्याची पायरी चढण्याची वेळ ओढावते. फसवणूक झालेल्या अनेकांना योग्य मदत मिळावी म्हणून पोलीस सध्या अनेक उपाययोजना राबवत आहेत. लैंगिक शिक्षणाबरोबरच अशा गुन्ह्यांचे दुष्परिणामही मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. मुलामुलींचा पोलिसांबाबतचा आदर वाढावा म्हणून मुंबई पोलिसांकडून ‘पोलीस दीदी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत शाळकरी मुलांना महिला पोलीस ताईच्या भूमिकेत मार्गदर्शन करत आहेत. मात्र तरीही मुलांनी अधिक सजग होऊन शेअरिंग करावं, असं पोलीस सांगतात. कारण चूक किरकोळ वाटत असली तरी तो गंभीर गुन्हा असू शकतो. आणि अश्लील मेसेज लिंक पाठवली तरी विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल होतो, हे तरुणांनी लक्षात ठेवायला हवं.

१०० या क्रमांकावर फोन करून तुम्ही पोलिसांची मदत चोवीस तास मागू शकता. आणि सायबर गुन्ह्याची तक्रारही नोंदवू शकता. आपली माहिती उघड करू नये अशी विनंती केली तर पोलीस ती करत नाहीत, अशी तरतूदही कायद्यात आहे.

१०३ स्त्रियांना मदतीसाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी ही पोलिसांची हेल्पलाइन आहे. तिथे सायबर गुन्ह्यांविषयी तक्रार नोंदवली जाऊ शकते.
प्रतिसाद pratisad पोलिसांचं अॅप डाउनलोड करून घ्या. या अॅपद्वारेही तुम्ही तक्रार करू शकता, मदत मागू शकता.
-------------------------------------
जर तुमच्याकडे Marathi, Hindi, आणि English भाषेमध्ये काही article, stories,कविता, असतील आणि तुम्हाला त्या आमच्यासोबत share करावयाची आहे. तर कृपया आम्हाला email करा. आमचा email id आहे rohit.shelake7@gmail.com. आम्ही ती swapnwel.blogspot.com वर तुमच्या नावासह Publish करू. आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करत असतो

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...