Wednesday, March 29, 2017

आणखी एका नास्तिकांची हत्या 

आणखी एका नास्तिकांची हत्या 
लोकसत्ता | 28/03/2017 |

भारतात ईश्वरनिंदा कायदा नाही. पाकिस्तानात तो आहे. भारतात मात्र तसा कायदा करण्याची मुळीच आवश्यकता नाही, कारण त्या कायद्याने जी काही शिक्षा देण्यात येते, दहशत निर्माण करता येते, ती तसा कायदा नसतानाही निर्माण करण्यात येथील अतिरेकी धर्मवाद्यांना पुरेपूर यश आले आहे. त्या धर्मविजयाची द्वाही दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांचा खून करून देण्यात आली आहेच.

याबाबतीत इस्लामसारखा जिहाद-बा-सैफ करणारा, तलवारीच्या बळावर जगभर पसरलेला ‘शांततावादी’ धर्म भारतात याबाबत मागे राहून कसे चालणार होते? तिकडे बांगलादेशात इस्लामविरोधात लिहिणाऱ्या ब्लॉगरांच्या कशा छान छान हत्या होत आहेत. पाकिस्तानात तसे करण्याची हिंमत कोणात नाहीच. तरीही तेथे काही डावे आहेत. नास्तिक आहेत. त्यांचा वेळोवेळी काटा काढण्यात येत आहे आणि भारतात मात्र याबाबत सगळा अंधार? हे कसे चालणार म्हणून आता येथील एका नास्तिक तरुणाची हत्या करून आजवरच्या गलथानपणाचे परिमार्जन करण्यात आले आहे. या तरुणाचे नाव एच फारुख. वय ३१. दोन लहान मुलांचा बाप. कोईमतूरजवळच्या एका गावात भंगारविक्रीचा व्यवसाय होता त्याचा. त्याची समस्या एकच होती. तो विचार करीत असे. द्रविडार विडुदलै कळहम या विवेकवादी संघटनेत जात असे. देव, धर्म मानत नसे. म्हणजे इस्लामच्या दृष्टीने पापीच. इस्लाममध्ये धर्म सोडून दूर जाणे याला बइद म्हणतात. धर्मावर शंका घेण्याला इर्तदाद म्हणतात. असे करणाऱ्यांना जमिनीत पुरावे आणि दगडाने ठेचून ठार मारावे अशी शिक्षा धर्माने दिली आहे. फारुख हा तर त्या दृष्टीने शंभर टक्के वाजिबुल कत्ल होता, कारण तो इस्लामची बदनामी करीत होता. त्याने त्यांच्या भावना दुखावल्या जात होत्या.

हा भावना दुखावण्याचा रोग मोठा मजेशीर असतो. धर्माच्या नावाखाली केले जाणारे अत्याचार, अतिरेक, दहशतवाद यातून त्यांच्या भावनांना ठेच लागत नाही. हा अतिरेक ठेचावा असे त्यांना वाटत नाही; पण कोणी देव-धर्म मानत नाही म्हटले की त्यांना जगात दानवी प्रवृत्ती वाढली असेच वाटते. ती प्रवृत्ती ठेचून येथे तथाकथित धर्मराज्य स्थापन करण्यास जसे इस्लाममधील अतिरेकी उत्सुक आहेत तसेच हिंदू सनातनीही; कारण याबाबत सारे धर्म सारखेच, परस्परपूरकही. इस्लाममधील अतिरेकाकडे बोट दाखवून हिंदू संघटना आपल्या अनुयायांना अधिक अतिरेकी बनवण्याचे प्रयत्न करणार. ते पाहून येथील इस्लाम अधिक कट्टरवादी बनत राहणार आणि सारे मिळून विवेक, शांतता, सौहार्द, सहिष्णुता यांविरोधात काम करणार. त्यातही एवढा बिनडोकपणा की, या बाबींमुळेच राष्ट्र मोठे होत असते, समाजाचा विकास होत असतो. असा त्या धर्मअंधांचा समज असतो. हा बिनडोकपणा वाढावा यासाठी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन अशा सगळ्यांच धर्मातील अतिरेकी प्रयत्नशील आहेत.

फारुखची हत्या हे त्या प्रयत्नांचेच फळ. अर्थात व्यक्तीची हत्या ही टोकाची क्रिया. त्याऐवजी रोजच्या जगण्यात पदोपदी केली जाते ती स्वातंत्र्याची, विवेकाची हत्या. तुम्ही काय ल्यावे, प्यावे, खावे, कसे वागावे, प्रेम करावे की करू नये हे सारे आता हे भावनादुखीचा रोग झालेले धार्मिक अतिरेकी ठरवीत आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांविरोधात दंडसंहितेची कलमे आहेतच. ती कमी पडतील तेथे त्यांच्या हाती दंड आहेतच. अर्थात विवेकाचा आवाज त्याने दबला जात नसतो. तो कोठे ना कोठे शिल्लक राहतोच. फारुखच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांनी नास्तिक म्हणूनच जगेन, फार तर मारलाही जाईन, असे जाहीर केले आहे. विवेकाची लढाई सुरू राहतेच.
==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...