Sunday, March 26, 2017

छत्रपती शिवाजी : द मॅनेजमेंट गुरू

       दुरदृष्टी, माणसं सांभाळण्याचं कौशल्य, सैन्यांवर प्रचंड विश्‍वास, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात शिवाजी महाराजांना अत्युच्च असे स्थान आहे आणि कायमच राहील... शिवाजी महाराज सर्वगुणसंपन्न होते. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. पाश्चात्त्य राज्यकर्त्यांमध्ये दिसून येणार्‍या राज्यलोभ, आसक्ती, व्यसनाधीनता द्वेष. लंपटपणा अशा अवगुणांपासून शिवाजी महाराजांचे जीवन अलिप्त होते.

         शिस्तबद्ध लष्कर व संघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2,000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. विएतनामच्या युद्धात शिवकालिन् गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करुन् अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.
         काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे. इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्‌समध्ये म्हटले आहे की, शिवाजी स्त्रियांना अभय देतो हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात. 'छत्रपती शिवाजी राजे हे रयतेचे राजे होते. ते साम्राज्यवादी नव्हे तर ते समतावादी होते. 1630 ते 1652 या काळात सलग 22 वर्षे त्यांच्या काळात दुष्काळ पडूनही शेतकरी आत्मह्त्या झालेल्या नाहीत. त्यांचे त्या काळातील व्यवस्थापन हे त्यांच्या 'मॅनेजमेंट गुरू' च्या संज्ञेला साजेसे होते.'
        जेव्हा 1645 ते 1680 या काळात लढायांना पर्याय नव्हता, तेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ आपल्या राजवटीत चार लढाया लढल्या. लढाया टाळण्यासाठी स्वीकारलेले तंत्र म्हणजे 'गनिमी कावा' आणि आपले सैन्य न गमावता विजय प्राप्त करण्याचा तो मार्ग होता. रयतेच्या या राजाने सर्व राज्यच आपल्या शिलेदारांच्या बळावर उभे केले आणि चालविले. धर्म, पंथ, भाषा, जात व अन्य भेद राजा शिवाजी मानीत नसल्यानेच हे राज्य सुख व समाधानाचे होते. त्यांचा एक किल्ला ही एक 50 हजार तरुणांना रोजगार देणारी एमआयडीसी होती. असे 110 किल्ले त्यांनी बांधले व 322 किल्ले जिंकून घेतले हा ऊर भरून येणारा इतिहास म्हणूनच गौरवशाली बनलेला आहे. त्यांनी रयत पोटास लावली. राज्य रयतेचे पोट भरावे म्हणून चालविले. संकटात धैर्य व सम्रुद्धीत नम्रता ही शिवाजी राजांची शिकवण आजही आपण कायम ध्यानी ठेवावी.

       आग्य्राहून सुटकेचा प्रसंग,  मिर्झाराजे जयसिंह प्रकरण, सुरतेची पहिली लूट, शाहिस्तेखान प्रकरण, मोगल साम्राज्याशी संघर्ष, पावनखिंडीतील लढाई, प्रतापगडाची लढाई, कोल्हापूरची लढाई, सिद्दी जौहरचे आक्रमण, अफझलखान प्रकरण, आदिलशाहीशी संघर्ष, जावळी प्रकरण, राजमुद्रा, तोरणगडावर विजय असे एक ना अनेक प्रसंगातून शिवरायांचे चरित्र आपल्या मनावर वेगळीच छाप सोडून जाते...

       खरंच शिवरायांचे एक-एक गुण आपल्याला जीवनाचं मॅनेजमेंट शिकवणारे असेच आहे. एक आदर्श आपल्यासमोर उभा रहावा म्हणूनच शिवाजी महाराज हे सर्वोत्तम कुशल प्रशासक (मॅनेजमेंट गुरु) अशी ओळख सांगणारा शिवाजी महाराजांवरील धडा पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथीच्या पुस्तकात समाविष्ट केला जाईल….

       जीवनात लढताना, संघर्षाशी दोन हात करताना शिवरायांचे मॅनेजमेंट नक्कीच आपल्याला उपयोगी पडेल, म्हणून शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर थोडा विचार करून आपल्या जीवनाला खंबीरपणे उभं करण्याचा प्रयत्न करूयात...!

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : Swapnwel@rediffmail.com   
        आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु
. Thanks!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...