(सदर पत्र हे रवीश कुमार पत्रकार एनडीटीवी इंडिया यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी याना लिहलेले असून ते खुल्या स्वरूपाचे असल्याने ब्लॉगवरती जसेच्या तसे प्रकाशित करत आहोत हे पत्र महाराष्ट्र टाइम्स व इतर दैनिकामध्ये ही प्रकाशित झाले आहे याची नोंद घ्यावी.)
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी,
मला केवळ आशाच नाही, पण पूर्ण खात्री आहे की, आपण सकुशल असाल. मी नेहमीच आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करतो. आपणांस कायम उत्तम उर्जेचा स्त्रोत लाभो, अशी प्रर्थना करतो. या पत्राचा हेतू मर्यादीत आहे. आपल्याला माहित आहेच की, सध्या सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर भाषेची शालीनता पायदळी तुडवली जात आहे. यात आपल्या नेतृत्वाखाली असलेल्या विविध संघटनांचे सदस्य, समर्थकांबरोबरच आपल्या विरोधकांच्या संघटना आणि त्यांचे सदस्यही सहभागी आहेत. या वैचारिक अध:पतनामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे.
खेदाची बाब आहे की, अशा अभद्र भाषेचा वापर करणारे आणि धमक्या देणाऱ्या काही लोकांना आपणच ट्वीटरवर फॉलो करत आहात. सार्वजनिकरित्या तुम्हाला उघडे पाडल्यानंतर आणि त्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतरही तुम्ही त्यांना फॉलो करतच आहात. भारताच्या पंतप्रधानांसोबत अशी माणसं असणे, हे आपल्याला आणि आपल्या पदाला शोभा देत नाही. तुम्ही काही विशिष्ट कारणांसाठीच त्यांना फॉलो करत असावात. मला पूर्ण खात्री आहे की, धमक्या देणारे, शिव्या देणारे आणि कट्टर धार्मिकतेची भाषा करणाऱ्यांना आपण फॉलो करण्याच्या पात्रतेचे निश्चितच मानत नसणार.
अशीही शक्यता आहे की, आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेत हे लोक अशा भाषेचा वापर करत असावेत. आपण पंतप्रधान आहात. त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष देणे आपले काम आहे. आपण खूप व्यस्त आहात पण आपली टीम इतकी काळजी नक्कीच घेऊ शकते की, आपण अशा प्रकारच्या लोकांना ट्वीटरवर फॉलो करणार नाही. ते आपल्या प्रतिमेचे आणि प्रतिष्ठेचे नुकसान करत आहेत. भारताच्या प्रजेने आपल्याला भरभरून प्रेम दिले आहे. त्यात काही कमी पडले असेल, तर ते आपण मागू शकता. जनता तेही आनंदाने देईल. मात्र जे लोक कोणा नागरिकांना शिव्या देतात, अल्पसंख्यांक समुदायाविरूद्ध जातीवाचक भाषा वापरतात, टीकाकार जिवंत असल्याबद्दल ज्यांना वाईट वाटते, अशा लोकांना भारताच्या पंतप्रधानांनी फॉलो करावे, हे आपणांस शोभा देत नाही.
आज जेव्हा altnews.in वर वाचले की, “ओम धर्म रक्षति रक्षित:” नावाच्या एका व्हॉट्स अप ग्रुपमधील काही लोक मला काही महिन्यांपासून अश्लिल शिवीगाळ करत होते, धमक्या देत होते, कट्टर धार्मिक भाषा वापरत होते, माझ्यासारख्या देशभक्त आणि इतर पत्रकारांना अतिरेकी संबोधत होते, त्यातील काही जणांना आपण ट्वीटरवर फॉलो करत अहात, हे समजले तेव्हा मला धक्काच बसला. पंतप्रधान साहेब, या व्हॉट्स अप ग्रुपवर माझ्याबाबत आणि इतर काही पत्रकारांबाबत ज्या प्रकारे अभद्र भाषेचा वापर केला आहे आणि ते मी मोठ्याने वाचले तर, ऎकणारे कान बंद करतील. महिला पत्रकारांबाबत ज्या भाषेचा वापर केला आहे, तो तर लाजीरवाणा आहे.
सोशल मीडियावर आपल्याबाबतही अभद्र भाषेचा वापर केला जात आहे. मला त्याबाबत खरोखर वाईट वाटते. पण हे प्रकरण आपल्याच काही पाठिराख्यांचे आहे, जे माझ्यासारख्या एकट्या पत्रकाराला धमक्या देत होते. मी जेव्हा जेव्हा या व्हॉट्स अप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा “पकडा याला..पळून जात आहे..मारा याला“ अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत मला पुन्हा त्या ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्यांनी वापरलेल्या भाषेचा नमुना मी इथे मांडू शकत नाही कारण मी भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहित आहे. माझ्याबद्दल इतकी अभद्र टीका झाल्यानंतरही मी आपला आदर राखावा, हे माझे कर्तव्य आहे.
सध्याच्या राजकारणाने सोशल मीडिया आणि रस्त्यांवर जी अशाप्रकारची गर्दी निर्माण केली आहे, ती एक दिवस आपल्या समाजासाठी आणि विशेषकरून स्त्रियांसाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे. यांच्या शिव्या स्त्रियांविरूद्ध असतात. त्या इतक्या जातीवाचक असतात की, आपण त्या सहन करू शकत नाही. असंही आपण सन 2022 पर्यंत भारतातून जातीभेद नष्ट करू इच्छिता. आपल्या 15 ऑगस्ट रोजीच्या भाषणानेही यांच्यावर कुठलाही प्रभाव पडलेला नाही आणि अजूनही ते मला सतत धमक्या देत आहेत.
आता माझा आपल्याला एक प्रश्न आहे. तुम्हा खंरच नीरज दवे आणि निखिल दधीच यांना फॉलो करता का? का करता? काही दिवसांपूर्वी मी यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपचे काही स्रीनशॉट माझ्या @RavishKaPage या फेसबूक पेजवर जाहिर केले होते. altnews.inचे प्रतीक सिन्हा आणि नीलेश पुरोहित यांनी केलेल्या चौकशीतून असे समजते की, नीरज दवे राजकोटची रहिवासी आहे आणि एका निर्यात कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आहे. आपण नीरज दवेला फॉलो करता. जेव्हा मी असे लिहिले की, इतक्या अभद्र भाषेचा वापर करू नका तेव्हा त्याने लिहीले की, “तू अजून जिवंत आहेस याचे मला दु:ख आहे”.
व्हॉट्स अप ग्रुपचा आणखी एक सदस्य निखिल दधीचबाबत खूप काही लिहीले गेले आहे. पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली तेव्हा निखील दधीच नावाच्या व्यक्तीने त्यांच्याबाबत जे काही लिहीले, ते आपण कधीच पसंत करणार नाही. माझी माहिती खरी असेल तर, ही बाब वेगळी की, आपण अजूनही त्या व्यक्तीला फॉलो करत आहात.
पण सर, मला अजिबात कल्पना नव्हती की, हा निखिल दधीच माझ्या मोबाईल फोनमध्ये घुसला आहे. तो एका कट्टरधर्मीय व्हॉट्स अॅप ग्रुपचा सदस्य आहे. त्या ग्रुपमध्ये मला जबरदस्ती जोडले जाते. तेथे माझ्याविरूद्ध हिंसक भाषेचा वापर केला जातो. मी अनेक महिन्यांपासून काळजीत होतो. गुपचूप चर्चेचे स्क्रीन शॉट घेत राहिलो. अशा लोकांचे धागेदोरे आपल्यापर्यंत जातील, असे मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. देव करो आणि हे खोटे ठरो. altnews.inने केलेली चौकशी खोटी ठरो. आपल्या अनेक मंत्र्यांसोबतच या निखील दधीचचे अनेक फोटो आहेत.
इतकेच नाही तर, या “ओम धर्म रक्षति रक्षित:” नावाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपचे अनेक अॅडमिन आहेत आणि काही अॅडमिनची नावे आरएसएस, आरएसएस2 अशी ठेवण्यात आली आहेत. एका अॅडमिनचे नाव आकाश सोनी आहे. भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासोबत आकाश सोनी याचे फोटो आहेत. फोटो कोणाचाही कोणाबरोबरही असू शकतो पण हा तर कोणाला धमकावणाऱ्या, जातीय विद्वेष पसरवणाऱ्या ग्रुपचा अॅडमिन होता. आपल्या विरूद्ध कोणी काही वाईट लिहिले तर, त्या व्हॉट्स अप ग्रुपच्या अॅडमिनला अटक केली जाते, अशा अनेक बातम्या मी वाचल्या आहेत.
आकाश सोनी हा आरएसएसचा प्रमुख पदाधिकारी आहे. आकाश सोनी याने माझ्याबरोबरच अभिसार शर्मा, राजदीप सरदेसाई आणि बरखा दत्त यांचे मोबाइल क्रमांक त्याच्या फेसबुक पेजवर जाहीर केले आहेत. altnews.inच्या बातमीत तसे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही आपल्या नेतृत्वाखालील चालविण्यात येणाऱ्या संघटनांच्या नेत्यांनी माझा मोबाइल क्रमांक जाहीर केला असून मला धमक्याही मिळाल्या आहेत. मी काळजीतही पडलो होतो पण आपल्याला कधी पत्र लिहिले नाही. पण आता लिहित आहे. कारण, मला जाणून घ्यायचे आहे आणि तुम्हीही चौकशी करा की, खरोखरच या व्हॉट्स अॅप ग्रुपचे सदस्य माझा जीव घेण्याच्या थराला जाऊ शकतात का? माझ्या जीवाला धोका आहे का?
मी एक सामान्य नागरिक आणि सजग पत्रकार आहे. आजकाल कोणीही मला येता जाता बोलून जातो की, लवकरच मी आपल्या कृपेने रस्त्यावर येणार आहे. माझी नोकरी जाणार म्हणून सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी उत्सवही साजरा करण्यात आला. कित्येक जण असे पण म्हणाले की, मी म्हणतो सरकार माझ्यामागे लागले आहे. अलिकडेच हिन्दुस्तान टाइम्सचे संपादक बॉबी घोष यांना आपल्या नापंसतीमुळे घरचा रस्ता दाखविण्यात आला. तशी बातमी मी thewire.in वर वाचली होती. त्याच बातमीच्या आधारावर आता माझी पाळी असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व ऐकून हसायला येते पण काळजीही वाटते. भारताचा एक सशक्त पंतप्रधान एका पत्रकाराची नोकरी घालवेल, या गोष्टीवर विश्वास ठेवण्याची मला इच्छा होत नाही. तेव्हा लोक मला म्हणतात की, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे.. बघ… तुझी सोय करण्यात आली आहे.
जर असे घडले तर ते माझ्यासाठी सौभाग्य आहे पण असे होऊ देऊ नका. माझ्यासाठी नव्हे तर भारताच्या महान लोकशाहीच्या गौरवासाठी असे होऊ देऊ नका. नाहीतर उद्या लोक म्हणतील की, माझा आवाज वेगळा आहे.. त्यात तथ्यही आहे पण या महान लोकशाहीत माझ्यासाठी कोणतेच स्थान नाही? एका पत्रकाराची नोकरी घालविण्याचे काम पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांच्या स्तरावरून होणार? अशा अंदाजांना मी व्हॉट्स अॅप ग्रुपवरून मला देण्यात योणाऱ्या धमक्यांशी जोडून बघतो. जर तुम्ही अशा लोकांना फॉलो केले नसते तर मी खरच हे पक्ष लिहिले नसते.
माझ्याकडे पत्र्याची पेटी आहे जी घेऊन मी दिल्लीत आलो होतो. गेल्या 27 वर्षात देवाने मला भरपूर दिले पण ती पेटी आजही माझ्याकडे आहे. ती घेऊन मी मोतिहारीला परतही जाऊ शकतो. पण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. उदरनिर्वाहाची चिंता कोणाला नसते? मोठ-मोठे कलाकार वयाच्या पंच्याहत्तरीतही पैसे कमाविण्यासाठी जाहिरातींमध्ये कासे करतात. जर त्यांना घर चालविण्याची इतकी चिंता आहे तर, मी त्या चिंतेपासून कसा मुक्त असु शकतो? माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. आपण माझ्या मुलांना रस्त्यावर बघू शकणार नाही? बघवेल तुम्हाला? माझी मुले तुम्हाला तेव्हाही आशीर्वाद देतील. माझे रस्त्यावर प्रेम आहे. मी रस्त्यावर उतरून पण प्रश्न विचारतच राहणार. चंपारणला आल्यावर बापूंनी हीच शिकवण दिली की, सत्ता कितीही प्रबळ असो, जागा कितीही अपरिचित असो, नैतिकतेच्या बळासमोर कोणीही तिच्यासमोर उभा ठाकू शकतो. मी तर त्या महान मातीचा एक छोटा अंश आहे.
मी कोणाला घाबरविण्यासाठी खरे बोलत नाही. बापू म्हणायचे की, ज्या सत्यात अहंकार येतो ते सत्य राहत नाही. मी स्वत:ला अधिक विनम्र आणि माझ्यातील अंतर्विरोधाबाबत प्रायश्चित्त करण्यासाठी बोलतो. जेव्हा मी बोलू शकत नाही, लिहू शकत नाही तेव्हा मी त्या सत्यासाठी संघर्ष करतो. मी माझ्या दुर्बलतेपासून मुक्त होण्याच्या प्रयत्नातच ते बोलून जातो, जे ऐकून लोक म्हणतात की, तुला सरकारचे भय नाही. मला माझ्या दुर्बलतेचे भय आहे. माझ्या दुर्बलतेविरूद्ध लढण्यासाठीच मी बोलतो, लिहितो. अनेक वेळा हरतो. तेव्हा स्वत:ला दिलासा देतो की, या वेळी हरलास, पुढच्या वेळी पास होण्याचा प्रयत्न करणार. सत्तेसमोर बोलणे असे धाडस दाखवणे आहे ज्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे आणि त्याचे रक्षक आपण आहोत.
मी हे पत्र सार्वजनिक करत आहे आणि आपणांस टपालानेही पाठवत आहे. जर आपण निखिल दधीज, नीरज दवे आणि आकाश सोनी यांना ओळखत असाल तर, फक्त इतकेच विचारा की, यांचा किंवा यांच्या कुठल्या ग्रुपचा मला ठार मारण्याचा कट तर नाही ना? altnews.in ची लिंकसुद्धा पाठवत आहे. पत्र लिहिताना जर अनावधानाने कोणाचा अपमान झाला असेल तर त्याबद्दल माफी मागतो.
आपला शुभचिंतक
रवीश कुमार
पत्रकार
एनडीटीवी इंडिया