सामाजिक समतेचे तत्त्व समाजात प्रत्येक वेळी सरळ मार्गाने रुजेल असे घडत नाही. कधीकधी हा विचार रुजवण्यासाठी काही वेगळे मार्ग अवलंबावे लागतात. युक्ती प्रयुक्ती करून उदाहरणे घडवावी लागतात. अशा उदाहरणाची सवय होऊन समाज मग या सामाजिक तत्वाला मान्यताही देऊन टाकतो. शाहूचरित्र वाचताना अशी,एक गोष्ट माझ्या वाचनात आली. तुम्हाला ती सांगावीशी वाटते ...
*शाहूराजा...जवळ एक महार समाजातील मोतद्दार होता. घोड्याची नोकरी झाली की तो तुकोबांचे अभंग म्हणत बसे. एकतारीचा सूर लावी. महाराजांनी खूश होऊन त्याला नोकरीतून मुक्त केले , पण पगार चालू ठेवला. वाड्यावर व बावड्याला जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर त्याला एक खोपाट बांधून दिले. वाड्यावरुन त्याला जेवण पोचवण्याची व्यवस्था केली. त्याने खोपटासमोर कायमपणे धूमी पेटवत ठेवली होती. बाजूला पाण्याचा माठं नेहमी भरलेला असे. तो चिलीम ओढण्यात बराच काळ घालवी. येणारा जाणारा वाटसरु थांबून त्या माठातील पाणी पीत असे. कोणी चिलमीचा झुरका घेई. चिलमीची छापी भिजवावीच लागे. टाळकुट्याची " जात " कुणी विचारत नाही . महाराजाना हे पक्के ठाऊक होते. म्हणून तर टाळकरीला नाक्यावर बसवून रहदारीवरच्या वाटसरुना महाराचे पाणी पाजले व ओली छापी तोंडात धरून चिलीम ओढायला लावली .....किस्सा गंमतीदार आहे खरा. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते सामाजिक गोष्टी बाबत शाहूराजा किती दक्ष होता हे दिसून येते. सामाजिक पातळीवर व्यवहार समान व्हावेत या प्रामाणिक भावनेतून महाराजांनी ही शक्कल लढवली होती. त्या महार मोतद्दारला पगार चालू ठेवलाच पण वाड्यावरुन जेवणही पाठवले यावरून महाराजाना सामाजिक न्यायाची ओढ दिसून येते. रुढी परंपरा चिवट असतात . सहजासहजी मोडल्या जात नाहीत. या ना त्या प्रकारे , कधी थेट तर कधी युक्ती करून समाजजागृती करावी लागते. भारतीय समाजात तर ह्या रुजवताना किती अडचणी येत असतील याची कल्पना करा. प्रामाणिकपणे केलेली शाहूराजाची ही कृती मला तरी महान कृती वाटते.*
लोकहो..कोणताही वाईट मतलबी हेतू मनाशी बाळगून शाहूराजा कार्यरत नव्हता. तर समाजातील वाईट गोष्टी हटवून तेथे चांगल्या गोष्टी रुजवण्यासाठी आपल्या सर्व ताकद व युक्तीनीशी तो तयार होता. आपले अधिकार याकरिता वापरलेच पण महत्त्वाचे हे की त्याचबरोबर आपल्या हृदयाची कळकळ पण बिनदिक्कतपणे कृतीशील केली. शाहूराजा म्हणून तर महान माणूस आहे. समाजाला चांगले वळण लावण्यासाठी कधीकधी असे वेगळे मार्ग वापरावे लागतात....शाहूचरित्र हेच तर शिकवते.
*!! समाज उदाहरण पाहून वाटचाल करतो..ते उदाहरण घालून देणे हे महत्त्वाचे कार्य असते ....समाज परिवर्तनसाठी !!*
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment