हे महाराष्ट्रा
तू असावास
जातपात-मुक्त
धर्मांधता-मुक्त
दलितांच्या रोज रोज होणाऱ्या
अवहेलनेपासून मुक्त
अज्ञान, अंधश्रध्दा, अविवेक मुक्त
दारिद्र्य मुक्त
भूक मुक्त
बेकारी मुक्त
लाचलुचपत मुक्त
निराशा मुक्त
शेतकऱ्यांच्या हत्या आणि आदिवासींचे विस्थापन
यापासून मुक्त
स्त्रियांवरच्या बेसुमार वाढलेल्या
अत्याचारांपासून मुक्त
भोंदूगिरी, दादागिरी, बुवाबाजी यातून मुक्त
भय-मुक्त
तू असावास
ज्ञानाने तेजस्वी
कर्माने किर्तीमान
समानतेचा, बंधुत्वाचा
न्यायाचा आदर्श
महाराष्ट्रा !!!
शाळेत शिकणाऱ्या तुझ्या मुलांना
मराठी भाषेपासून दुरावू नकोस
शाळेत जाऊ पाहणाऱ्या मुलींना
शिक्षणापासून वंचित ठेवू नकोस
खेड्यापाड्यातून मोठ्या आशेने शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या तरूणांना तुझ्या राज्यात मोफत वसतीगृहे असली पाहिजेत
कॉलेजे व विद्यापीठे खाजगी असोत की सरकारी,
आमच्यावर लादलेली असह्य फी
आमच्या पालकांच्या गेल्या तीन वर्षाच्या सरासरी उत्पन्नाच्या प्रमाणावरच नक्की केलेली असायला हवी
शैक्षणिक संस्थांची आर्थिक जबाबदारी सरकारने घ्यायला हवी,
ती आमच्यावर लादणे म्हणजे चक्क आमच्या पालकांची लूट आहे.
कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी-व्यवसाय न मिळाल्यास किमान तीन वर्षे आम्हाला " शिक्षण पूर्ती भत्ता " ( बेकारी भत्ता नव्हे ) मिळायला हवा.
ती कुणाची दया-कृपा नाही.
तो आमचा हक्क आहे.
आम्ही काय कपडे घालतो, काय खातो,
हा सर्वस्वी आमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
त्यावरची दादागिरी बंद व्हायला हवी.
महाराष्ट्रा
आम्ही तुझे भवितव्य आहोत.
आमचे हात तुझे हात आहेत.
ज्या स्वार्थाच्या, द्वेषाच्या, निराशेच्या, खोट्या प्रचाराच्या, गोंगाटाच्या वातावरणात
आम्ही वाढत आहोत,
ते वातावरण संपूर्ण बदलण्याचा
आमचा निर्धार आहे.
नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीचे आमचे ध्येय आहे.
आम्ही तुझे, तू अमुचा,
हेच खरे.
इतकेच सत्य.
हाच आमचा एकत्र येऊन केलेला विचार.
हाच आमचा निर्धार.
महाराष्ट्रातील तरूणाईचा एल्गार
#दक्षिणायन : आपली सामुहिक कृती, नाशिक
येथे २४ सप्टेंबर ह्या सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनी घोषित केलेला युवकांचा जाहिरनामा.
No comments:
Post a Comment