Wednesday, October 19, 2016

मातीविना शेती

  दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या शहरीकरणामुळे शेतीला उपयुक्त असणारी जमीन, पाणी, मनुष्यबळ कमी होत आहे. यामुळे भविष्यात दुभत्या जनावरांच्या चाऱ्यासाठी उद्भवणारी भीषण परिस्थिती लक्षात घेता हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर
करून जमिनीत लागवड केल्याशिवाय कमी खर्चात व अत्यल्प मनुष्य तासांचा वापर करून हिरवा चारा तयार होणार नाही.
          हिरवा चारा हा गायी, म्हशी, शेळी, मेंढी आदी दुभत्या जनावरांना आवश्यक असतो.  हिरवा चारा फक्त पावसाळा व
हिवाळय़ातील काही दिवसात उपलब्ध होतो. परंतु जसजसा उन्हाचा कडाका सुरू होतो तशी पाण्याची कमतरता भासू लागते.पाण्याच्या कमतरतेमुळे चाऱ्यासाठी अत्यल्पजमीन उपलब्ध होते.या सर्वावर हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने मात केली आहे.

केवळ 50 चौ.मी. क्षेत्र पुरेसे
              जिथे पारंपरिक हिरव्या चाऱ्यासाठी 10 हजार चौ. मी. क्षेत्र लागते, तेथे नवीन तंत्रज्ञानाला केवळ 50 चौ.मी. क्षेत्र पुरेसे असते. पारंपरिक चारा
पिकवण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते. कामगारांची गरज असते. तसेच या चाऱयासाठी 45 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो. चाऱ्याचेे उत्पन्न हवामानावर अवलंबून असते व त्याला खताची आवश्यकता असते.
         परंतु हायड्रोपोनिक तंत्रज्ञानापासून हिरव्या चाराची निर्मिती करण्याकरीता जमिनीची आवश्यकता नसते. कामगार, पाणी, वीज कमी प्रमाणात लागते. त्याला खताची आवश्यकता नसून हवामानाचा त्यावर परिणाम होत नाही. शिवाय हे पिक केवळ 7 दिवसांमध्ये जनांवरांना खाण्यासाठी उपलब्ध होते.
        हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे उत्पादित केलेला हिरवा चारा हा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस
असतो. चाराटंचाई परिस्थितीत कमी खर्चामध्ये हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे.

हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी

1) हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी बांबू, तट्या, प्लॅस्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते.
2) या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराचा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो.
3) यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो.
4) चारा तयार करण्यासाठी मका, गहू,
बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते.
5) हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे.
6) त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (3 फूट x 2 फूट x 3 इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे.
7) अशा प्रकारे प्रतिदुभत्या जनावरांना दहा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी.
8) हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत.
9) एक एचपी विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे
प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न हायड्रोपोनिक्स चाऱ्यास पाणी देता येते.
10) चाऱ्याची 7 ते 8 दिवसांत 20 ते 25
सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. साधारणपणे
एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो.

चारा देण्याचे प्रमाण -

१) भाकड जनावरे 6 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.
२) दुभती जनावरे 15 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.

हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे फायदे -

1. चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा
निर्मितीचा चांगला पर्याय.
2. कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक
चारानिर्मिती.
3. जनावरांना 90 टक्के चारा पचतो.
4. पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी.
5. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ.
6. दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ.
7. जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते.
8. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे,
जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ.
9. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्यकता आहे.
10. प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-3, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात.
--------------------------------------

एअरोपॉनिक्स नावाचे नविन तंत्रज्ञान

            हायड्रोपॉनिक्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मातीविना केवळ पाण्याचा वापर करून शेतीची सुरुवात झालीही आहे. परंतु आता एअरोपॉनिक्स हे नवे तंत्रज्ञान आकारास येत असून, माती आणि पाण्याविनाच शेती केली जाणार आहे.
        जगभरातील वाढती लोकसंख्या,
कमी होत चाललेली शेतीयोग्य जमीन आणि घटत चाललेला भूजलस्तर या पार्श्वभूमीवर एका अमेरिकी कंपनीने माती आणि सूर्यप्रकाशाअभावी, अत्यंत कमी पाण्यात इनडोअर शेती सुरू केली आहे. रोपांच्या उगवणीसाठी वापरलेल्या या ‘एअरोपॉनिक्स’ नामक तंत्रज्ञानाचा प्रयोग सध्या अत्यंत मर्यादित स्वरूपात करण्यात आला आहे.
          मात्र आता ‘एअरो फार्म’ नावाची ही कंपनी अमेरिकेच्या न्यू जर्सी प्रांतात सुमारे 60 हजार चौरस फुटाच्या शेतीचे रूपांतर ‘कृषी कार्यशाळे’त करीत असून, तेथे या तंत्रज्ञानाचा व्यापक स्वरूपाचा प्रयोग केला जाणार आहे.
            या तंत्रज्ञानाला ‘हायड्रोपॉनिक्स’
म्हणजेच मातीशिवाय, अत्यंत कमी पाण्यावर शेती करण्याच्या तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या आकडेवारीवरून रोपाच्या वाढीसाठी आवश्यक
परिस्थितीचे आकलन करता येते.
              या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोबीसारख्या भाज्यांव्यतिरिक्त जलकुंभी, तुळशीसारख्या औषधी वनस्पतींपर्यंत अनेक वनस्पतींची वाढ करण्यात येणार आहे.
           ‘सीएनएन’ने दिलेल्या माहितीनुसार येत्या दशकात सर्वांना अन्न मिळण्याच्या दिशेने हे एक अभिनव माध्यम बनू शकते. पूर्णतः नियंत्रित इनडोअर वातावरणात सूर्यप्रकाश आणि मातीशिवाय रोपे उगविण्याचे लक्ष्य साध्य करण्यात येणार आहे.
          इनडोअर शेतीत ‘एअरो फार्म’ खूपच प्रागतिक माध्यम असेल, असे सांगण्यात येत आहे. ‘एअरोपॉनिक्स’ ही रोपांच्या उगवणीची एक अशी प्रक्रिया
आहे, ज्यात सूर्यप्रकाश, पाणी आणि मातीचा वापर न करताच स्वच्छ आणि सक्षमपणे रोपांची उगवण वेगाने करण्यात येते. वर्षभर या रोपांच्या माध्यमातून कोणत्याही अडथळ्याविना पीक
काढता येते.
           आतापर्यंत केलेल्या परीक्षणांमध्ये असे आढळून आले आहे की, या प्रक्रियेद्वारे रोपे खनिजे आणि जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे रोपे अधिक सक्षम आणि पिके अधिक पौष्टिक असतात.
           एअरोपॉनिक्समध्ये विविध तंत्रांचा नियंत्रित वापर करण्यात येतो.
तंत्रज्ञानाचे हे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

स्मार्ट एअरोपॉनिक्स :
      या माध्यमातून पिकांच्या उगवणीसाठी मुळांना पोषकद्रव्ये, पाणी आणि ऑक्सिजन दिला जातो.

एलईडी दिवे :
प्रत्येक रोपापर्यंत प्रकाश पोचविण्यासाठी एलईडी दिव्यांचा वापर केला जातो. या दिव्यांमुळे रोपांची प्रकाश संश्लेषणक्रिया सक्षमपणे सुरू राहू शकते. या क्रियेसाठी शेतालगतच्या जमिनीत सौरऊर्जेचे संयंत्र उभारण्यात येते.

सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रण :
रोपांची वाढ, रंग, स्वाद, मुळे आणि पाने यांची वाढ तसेच उत्पादनप्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीने सॉफ्टवेअर विकसित केले आहे. इनडोअर शेतीचा आवाका वाढल्यानंतर नियंत्रणासाठी सेन्सरचाही वापर केला जाऊ शकतो.

स्मार्ट न्यूट्रिशन :
रोपांच्या वाढीसाठी स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपात पोषकद्रव्ये रोपांना मिळतात कीनाही, यावर लक्ष ठेवले जाते. बियाणे पेरून सामान्यशेती करताना पिके हाती  येण्यास लागणाऱ्या वेळापेक्षा निम्म्या कालावधीत पीक हाती येते. सामान्य शेतीत विशिष्ट क्षेत्रफळात जितके उत्पादन मिळेल, तितक्याच क्षेत्रफळात 75 पट उत्पादन घेता येईल..

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...