◆ आम्ही अजून रावणालाच जाळतोय ◆
मानवतेवर उघड बलात्कार करणारा
नराधम थेट उजळ माथ्यानं फिरतोय
अहो सीतास्पर्शही न करता युगानुयुगे
आम्ही अजून रावणालाच जाळतोय.
कळपा कळपाने फिरणारी वासंनांध
हलकट श्वापदं नेमकी कोण आहेत?
बस,रेल्वे,शाळा जागा पुऱ्या पडेनात
निर्भया लुटल्या,निर्भय कोण आहेत?
आई,बहिण,बायको ही नाती मतलबी
नजरी बलात्कार कोण करत आहेत?
पाचच काय पन्नाशीची स्त्री लुटणारा
कायद्यानं सर्वांसाक्ष निर्दोष सुटतोय
आम्ही अजून रावणालाच जाळतोय.
रक्ताचं पाणी करुन जे पिकतं त्याचा
कवडीमोल भाव कोण करत आहेत?
तुटपुंज्या कर्जापायी संसार मोडून
त्या ऋणात कोण फाशी देत आहेत?
माफ करा पण माफीच्या ना लायक
पोशिंद्याला नेमकं कोण नडत आहेत?
पूरतं 'पॅकेज' लाटून बँकाही लुटणारा
कर्जबुडवा विदेशी ललना फिरवतोय.
आम्ही अजून रावणालाच जाळतोय.
बाबुगिरी,खाबुगिरी अंगवळणी पडली
जागोजाग चिरिमिरी कोण घेत आहेत?
नेतेगिरी,चाटूगिरी मजबुरी फार झाली
चौकात देश बेअब्रू कोण करत आहेत?
सामान्यांच्या कष्टाचं मोल केलं शुन्य स्वीसबँकेत काळे पैसे कोणाचे आहेत?
माणूसकीचं जुलमी शोषण करणारा
बांडगूळ गरीबांच्या उरावर नाचतोय.
आम्ही अजून रावणालाच जाळतोय.
No comments:
Post a Comment