Monday, October 10, 2016

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : चरित्र :भाग १(कविता)

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा,
राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.

आज 11 ऑक्टोबर तुकडोजी महराज याची पुण्यतिथी या निम्मित्ताने आपण त्याच्या कार्याची थोड्याकत ओळख आपण लेखमालेतून  करून घेणार आहोत. त्याचा हा पहिला भाग ......यामध्ये आपण त्याची काही  अभंग,कविता,पाहणार आहोत
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

◆ मनीं नाही भाव म्हणे◆

मनीं नाही भाव म्हणे देवा मला पाव
देव अशानं भेटायचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

दगडाचा देव त्याला वडराचं भेव
लाकडाचा देव त्याला अग्निचं भेव
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव
सोन्याचांदीचा देव त्याला चोरांचं भेव
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

देवाचं देवत्व नाही दगडात
देवाचं देवत्व नाही लाकडात
सोन्याचांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

भाव तिथं देव ही संतांची वाणी
आचारावाचून पाहिला का कोणी
शब्दाच्या बोलांनं शांती नाही मनी
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

देवाचं देवत्व आहे ठाई ठाई
मी-तू मेल्याविण अनुभव नाही
तुकड्या दास म्हणे ऐका ही द्वाही
देव बाजारचा भाजीपाला नाही रे
================================

◆  या भारतात बंधुभाव नित्य ◆

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे
, दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे,
मतभेद नसू दे

नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना
हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे
दे वरचि असा दे

जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे
दे वरचि असा दे

सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी
ही नष्ट होउ दे विपत्ती भीती बावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे
दे वरचि असा दे
=================================

या झोपडीत माझ्या ◆

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोर्या, त्यातूनी होती चोर्या
दारास नाही दोर्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, 'मज्जाव' शब्द आला
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
अम्हां जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥
'तुकड्या' मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ति तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥८॥
=================================

       ◆ कशाला काशी जातो ◆
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
कशाला काशी जातो रे बाबा,
कशाला पंढरी जातो ?
संत सांगती ते ऐकत नाही,
इंद्रियांचे ऐकतो
कीर्तनी मान डोलतो
परि कोंबडी-बकरी खातो
वडीलजनाचे श्राध्द कराया,
गंगेमाजी पिंड देतो
खोटा व्यापार जरा ना सोडी,
तो देव कसा पावतो
झालेले मागे पाप धुवाया
देवापुढे नवस देतो
तुकड्या म्हणे सत्य आचरणावाचोनी, कोणीच ना मुक्त होतो
===============================

तुकडोजी महाराजांचे स्त्री विषयक विचार याच लेखमालेतील पुढील भाग २ मध्ये वाचा

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...