" अभ्यासाकरता परदेश दौरा " अशी जाहिरात करून आमचे मंत्री देशविदेशात जात असतात. तिथे जाऊन पर्यटन करणे वा भरपूर खरेदी करणे असाच बरेचदा व्यवहार असतो. हे सारे चालते ते जनतेच्या पैशातून. आजवर अपवाद वगळता मंत्री लोकांनी परदेशातील काही विशिष्ट गोष्ट पाहून आपल्या देशात ती केल्याची उदाहरणे एका हाताच्या बोटावर मोजावी लागतील. अभ्यास दौरा करायला गेलेले हे मंत्री " अभ्यास " करून परतलेवर काही उच्च दर्जाचे त्यांनी केलेले काम दाखवा व हजार रूपये मिळवा अशी जाहिरात वर्तमानपत्रात द्यावी असे मला वाटते . शाहूंच्या जीवनातील ही एक प्रसिद्ध गोष्ट ...
शाहूराजे...१९०२ साली परदेशात गेले. त्यांनी रोमनगरीस भेट दिली व तेथील आँलिंपिक सामन्याचे स्टेडीयम पाहिले. बरेच दिवस मनात घोळणारा प्रश्न सुटला असे वाटले. कोल्हापूर ही मल्लनगरी. कुस्त्यांची मैदान भरवून आनंद घेणे हा येथील रिवाज. याकरिता तात्पुरते मैदान उभे केले जायचे. प्रचंड जनसमुदाय सामावून घेण्यास ही मैदान आपुरी पडत. महाराजांच्या डोक्यात ही उणीव नाहीशी करण्याचे विचार घोळत असतानाच वरील परदेशवारी घडली. महाराजांनी समोर आँलिःपीक स्टेडीयम पाहिले आणि डोळ्यासमोर कुस्त्याचे मैदान तयार झाले. परदेशावरुन येताच शहराअंतर्गत मोठी जागा पाहून तेथे नवीन मैदान उभारले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जाणीवपूर्वक मैदान उभारले ह्याचे कारण म्हणजे मैदानासाठी लोक फरफटत आणावयाचे नाहीत . कुस्ती शौकीनांस लंगडेतोड करावी लागते व त्या दिवसाचा रोजगारही बुडतो. या गोष्टीचा अभ्यास करून जाणीवपूर्वक शहरातील जवळची जागा निवडली. मैदान उभे राहिले तेच आजचे " जगप्रसिध्द खासबाग मैदान ". ....महाराजांप्रती इतके अप्रुप जनतेला का वाटते त्याचे हे एक उदाहरण. जरा , विचार करा...परदेशात जाऊन पर्यटन करून ऐशआरामात जीवन घालवता आले असते ना. पण परदेशातही गेल्यावर डोक्यात आपल्या सामान्य रयतेच्या छंदाची काळजी वाहणारा माझा शाहूराजा. डोळ्यांत मैदानाचे चित्र तयार होताच आडवळणाला मैदानाकरता जागा देण्याऐवजी केवळ जनतेच्या हिताकरता मध्यवर्ती जागा निवडली. यामागे जनतेचा एक दिवसाचा रोजगार बुडू नये ही सत्प्रवृत्ती भावना. याहीपुढे जाऊन महाराजांनी नुसत मैदान उभारले असे नव्हे तर...मोफत कुस्ती पध्दती बदलून तिकीट लावून मैदान ही प्रथा चालू केली. मैदानाच्या प्रारंभापासूनच कुस्तीगीराकरता "हजारी फंडाची " स्थापना केली. गरजवंत मल्लाला तिकीट विक्रीच्या भागातून खुराकासाठी रक्कम या माध्यमातून दिली जाई. विजयी मल्लास रोख रकमेत इनाम व पराभूत मल्लाना बिदागी दिली जाऊ लागली. कुस्ती क्षेत्रांत ठेकेदारीची प्रथा सुरू करून मल्लविद्येचा विकास केला. केवढी मोठी दूरदृष्टी ही....आजकालचे मंत्री असे काही काम केल्याचे आपण ऐकलेय का ??
जनता व राज्यकर्ते यांचे नाते हे असे आंतरिक मनाचे असावे लागते. जनतेच्या छंदासाठी परदेशी गेल्यावरही विचार डोक्यात ठेवणारा शाहूराजा जिथे असेल तिथे मल्लविद्येचा प्रसार का नाही होणार ?? सगळं शक्य आहे....फक्त राज्यकर्त्याच्या काळजात एक अंश माझ्या शाहूराजाचा असायला हवा...बस्स
!! छंदातून विकास...हे सूत्र शिकवते शाहूचरित्र !!
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment