महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि तब्बल चार वर्षे उलटूनही त्यांचे मारेकरी व सूत्रधार ह्यांना गडाआड करण्यात शासनाकडून होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईबाबत शासनाला जाब विचारण्यासाठी अंनिसने 20 जुलै ते 20 ऑगस्ट या दरम्यान राज्यव्यापी 'जवाब दो' आंदोलन छेडले होते. त्या दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्र आणि प्रतिगामी महाराष्ट्र यांच्यामध्ये सुरु असलेल्या वैचारिक लढाईच्या पार्श्वभूमीवर "धर्माची चिकित्सा करणाऱ्यांच्याच हत्या का होतात ?" असा प्रश्न मी सोशल मिडियावर विचारला होता. ज्यावर अनेक मित्रांनी विविध आक्षेप घेतले. त्यामध्ये 'अंनिस हिंदु धर्मालाच विरोध का करते, इतर धर्मांबाबत का बोलत नाही ?' हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्याला उत्तर म्हणून मी सदर लेख लिहीला आहे.
आक्षेप : अंनिस केवळ हिंदु धर्माची चिकित्सा करते, हिंदूंहून अधिक धर्मांध असलेल्या अन्य धर्मांबाबत बोलत नाही. अर्थातच अंनिस ही हिंदूविरोधी संघटना असून हिंदु धर्मविरुद्धच्या एका व्यापक कटाचा भाग आहे वगैरे.
उत्तर : माझ्या निरिक्षणाप्रमाणे प्रश्नकर्त्यांच्या मनात *हिंदु धर्म* म्हणजे काय ह्याबाबतच मोठा गोंधळ असतो. म्हणूनच अंनिस हिंदु विरोधी आहे म्हणजे नमके कशाच्या विरोधी आहे, हेच त्यांना सांगता येत नाही. *धर्म म्हणजे जीवनपद्धती* हे साधारणतः मान्य असणारे मत वादासाठी ग्राह्य मानले तर जीवनपद्धती ही दोन प्रकारची असू शकते.
*1. धर्मग्रंथांवर आधारित*
*2. भौतिक परिस्थितीवर आधारित*
वरील दोन्ही प्रकारात मनुष्याचे हित केंद्रस्थानी असते, असे मानले जाते. तर प्रश्नकर्त्यांना 'अंनिस हिंदूविरोधी आहे' असे म्हणताना *धर्म म्हणजे 'धर्मग्रंथांवर आधारित जीवनपद्धती'* हे मत मान्य असल्यास ह्या मुद्यावर अंनिसवर टिका करण्याची त्यांची भूमिका हिंदुहिताची नाही, असेच म्हणावे लागेल. कारण मनुष्याच्या भोवतालची परिस्थिती निरंतर बदलत असते. त्यामुळे अर्थातच त्याच्या गरजाही बदलत असतात. त्या बदलत्या गरजांना अनुरुप त्याची जीवनपद्धती असेल तरच तो आपले अधिकाधिक ऐहिक हित साधू शकतो. जीवन संघर्षात सुरक्षित राहू शकतो व सुखाने, सन्मानाने जगू शकतो. कारण मनुष्याचे जीवन हे अस्थिर असते, सतत बदलत असते; परंतू धर्मग्रंथ हे अपरिवर्तनीय असतात. धर्मग्रंथातील अनेक नीतिनियम आज लोकशाही मूल्यांच्या चौकटीत अनैतिक व टाकाऊ ठरलेले आहेत. म्हणूनच प्रवाही असणाऱ्या काळासोबत आपल्या जीवनव्यवहारांची यथायोग्य सांगड घालून त्याला जगावयाचे असेल तर धर्माग्रंथाधारित जीवनपद्धती त्याज्य मानणे आज अपरिहार्य आहे. भारतीय संविधान ती त्याज्य मानते. आणि महाराष्ट्र अंनिस याबाबत संपूर्णपणे संविधानाशी सहमत आहे. ह्या ठिकाणी हिंदुह्रदयसम्राट स्वा. सावरकर ह्यांचे मत उध्रुत करणे उचीत ठरेल. ते म्हणतात, *'धर्मग्रंथांवर आपल्या समाजजीवनाचा डोलारा उभा करण्याचे दिवस आता गेले. तुम्हाला प्रगत व सम्रुद्ध व्हावयाचे असेल तर विज्ञानाची कास धरण्याला पर्याय नाही. धर्मग्रंथ हे ऐतिहासिक ग्रंथ म्हणून आदरपूर्वक संग्रहालयात ठेऊन विज्ञानाचे पान उलटले पाहिजे. धर्मग्रंथांचा अधिकार 'काल काय झाले?' हे सांगण्यापुरताच. आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम विज्ञानाचा !'*
सावरकरांच्या ह्या अनुभवसिद्ध व अभ्यासपूर्ण विधानावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही.
किंवा
जर 'अंनिस हिंदूविरोधी आहे' असे म्हणताना प्रश्नकर्त्यांना *धर्म म्हणजे भौतिक परिस्थितीवर आधारित जीवनपद्धती* हा अर्थ अपेक्षित असेल तरीही अंनिस हिंदुविरोधी आहे हा त्यांचा दावा ते सिद्ध करु शकत नाहीत. कारण आज त्यांच्या मताप्रमाणे *भौतिक परिस्थितीवर आधारित (?)*असलेल्या प्रस्थापित हिंदु धर्मामध्ये अनेक तर्कविसंगती, शोषण, अघोरी अंधश्रद्धा, मनुष्यहितास मारक अशा अनेक चालिरीती रुढ आहेत. ज्या चालिरीती चूकीच्या व हानिकारक वाटल्यामुळे महाराष्ट्र अंनिस त्या चालिरीतींना अधिक कालसुसंगत पर्याय देत आहे. जे पर्याय समाज व शासनही स्विकारत आहे. उदा. गणेशोत्सवामध्ये प्लैस्टर ऑफ पैरीस च्या गणेशमूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण थांबावे म्हणून अंनिसने मातीच्या मूर्तिंचा किंवा कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या मूर्तिंचा आग्रह धरला, तसेच त्या मूर्त्या नदी/तलाव/समुद्रात विसर्जित करण्यापेक्षा क्रुत्रिम तलावामध्ये विसर्जित करण्याचे आवाहन केले. ज्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठिकठिकाणी अनेक लोकांनी व गणेशोत्सव मंडळांनी त्याप्रमाणे मूर्ती बनवून घेतल्या व अनेकांनी त्या क्रुत्रिम तलावामध्ये विसर्जितही केल्या ! सर्वात महत्वाचे म्हणजे त्याकरिता ठिकठिकाणी महानगरपालिकांनीच क्रुत्रिम तलावांची व हौदांची सुविधा उपलब्ध करुन दिली. गेल्या वर्षी तर दस्तुरखुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच 'वर्षा'तील गणपतीचे क्रुत्रिम हौदात विसर्जन करुन अंनिसच्या पुरोगामी विचारांना थेटपणे मान्यता दिली !
तसेच हिंदु धर्मामध्ये रुजलेल्या जातपंचायतीच्या क्रुर व समांतर न्यायव्यवस्था संपविण्यासाठी अंनिसने राज्यभर *जातपंचायतींना मुठमाती अभियान* राबवून जनजागृती केली. समितीने एकीकडे लोकसहभागातून नैर्बंधिक (कायदेशीर) कारवाई सुरु ठेवली तर दुसरीकडे जातपंचायतींच्या पंचांच्या चांगुलपणाला साद घालून संवादावर भर दिला; अशा प्रकारे दुहेरी प्रयत्नांतून हा लढा पुढे नेला. ज्याला यश येऊन अनेक ठिकाणी लोकांनी स्वतःहून जातपंचायती बरखास्त केल्या ! तसेच अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अंनिसच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देऊन अलिकडेच राज्य शासनाने *सामाजिक बहिष्कार विरोधी निर्बंध (कायदा)* संमत केला. ज्याद्वारे मनमानी पद्धतीने समांतर न्यायव्यवस्था चालविणे यापुढे जातपंचायतींना अशक्य होऊन बसणार आहे.
तसेच डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर तातडीने वटहुकूम काढून राज्य शासनाने *जादुटोणाविरोधी निर्बंध (कायदा)* महाराष्ट्रात लागू केला; ज्यासाठी अंनिसला तब्बल *18 वर्षे संघर्ष* करावा लागला. ज्या संघर्षादरम्यान कोणत्याही धर्माच्या ठेकेदारांनी त्या लढ्याला सहकार्य तर केले नाहीच, उलट त्यांनीच ह्या निर्बंधाविरोधी तो हिंदुविरोधी असल्याची हाकाटी पिटून त्याला सतत विरोध केला. *तुम्ही वारीला गेलात तर तुम्हाला अटक होईल, तुम्ही सत्यनारायण घातला तर तुम्हाला तुरुंगात डांबले जाईल* अशा प्रकारच्या *खोट्या अफवा* पसरवून येणकेनप्रकारेण अतिशय सुस्पष्ट तरतुदी असणारा हा निर्बंध विधीमंडळात संमत होऊ नये म्हणून त्यांनी सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले. परंतू अंतिमतः पुरोगामी विचारच विजयी झाला. ( *लक्षणीय बाब ही की त्या निर्बंधामध्ये कुठेही जात वा धर्माचा उल्लेख नाही!*) आज वस्तुस्थिती ही आहे की गेल्या चार वर्षांमध्ये जादुटोणाविरोधी निर्बंधाखाली सुमारे 350 हून अधिक केसेस दाखल करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये अनेक भोंदु मुस्लिम बाबा-मांत्रिकांवरही कारवाई झालेली आहे. काही ठिकाणी तर सदर निर्बंधाला विरोध करणाऱ्या काही हिंदु धार्मिक संघटनांशी संबंधित लोकांनीच काही मुस्लिम बुवाबाबांच्या विरोधात तक्रारी करुन त्यांना अटक करविण्यास मदत केली ! हे अंनिसच्या कामाचे मोठेच यश मानले पाहिजे.
या व्यतिरिक्त वटपौर्णिमेमध्ये वटपूजनाच्या तर्कशून्य प्रथेला पर्याय म्हणून व्रुक्षारोपणाचा पर्यावरण पुरक पर्याय देणे, दिवाळीमध्ये प्रचंड प्रमाणात वायुप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांऐवजी, ते न करता बचत केलेल्या पैशाचा विनियोग शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी करणे किंवा गरजू मुलांना ते साहित्य भेट देणे, *ईदेला*अंधश्रद्धेतून प्रचंड प्रमाणात केल्या जाणाऱ्या पशुहत्येला पर्याय म्हणून *रक्तदान शिबीर* आयोजित करण्याचे उपक्रम राबविणे, धुळीवंदनमध्ये घातक केमिकल पासून बनविता येणारे ओले रंग न वापरता कोरड्या रंगांचा वापर करण्याचे आवाहन करणे, होळीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयुक्त इंधन व पोळ्या न जाळता *होळी लहान करा.. पोळी दान करा* ह्या अत्यंत रास्त उपक्रमाचा पुरस्कार करणे व त्याअंतर्गत गरिब व गरजू लोकांना पोळ्या देऊन वेगळ्या व सकारात्मक पद्धतीने सण साजरा करणे, 31st सारख्या दिवशी व्यसनांचा दिसून येणारा चढता ज्वर लक्षात घेऊन व्यसनमुक्तीचा भाग म्हणून *द दारुचा नाही तर द दुधाचा* हा उपक्रम राबवून व्यसनांचा विधायक पद्धतीने निषेध करणे असे अनेक लोकहिताचे ( *हिंदुहिताचे*) उपक्रम समिती राबवत असते. जे हिंदुंच्या हिताचे नाहीत, असे डोके शाबूत असणारा कोणीही हिंदू व्यक्ती म्हणू शकत नाही.
अशा प्रकारे अंनिस नेहमीच लोकहिताच्या द्रुष्टीने प्रस्थापित व बऱ्याच प्रमाणात शोषक व कालबाह्य चालिरीतींना अधिक कालसुसंगत पर्याय देऊन समाजाला विवेकाची व मानवतेची दिशा दाखविण्याचे कार्य करीत असते. परंतू अशा प्रत्येक वेळी धर्माचे ठेकेदार त्यांना *हिंदु धर्मावरील हल्ला* म्हणून विरोध करीत असतात. अंनिस हिंदु धर्माच्याच मागे हात धुवून लागली आहे, मुस्लिम-ख्रिश्चन आदिंच्या अंधश्रद्धांबद्दल ते काहीही बोलत नाहीत, हिंदु धर्म नष्ट करुन हिंदुंची एकी तोडून हिंदु शधर्म खिळखिळा करण्याचा त्यांचा कट आहे, ते भ्रष्टाचारी आहेत असे निरनिराळे खोटे आरोप करुन सर्वसामान्य देवभोळ्या लोकांना ते भ्रमित करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा वेळी हिंदु तरुणांनी आवर्जून लक्षात घेण्याची बाब ही, की *अंनिस हिंदुविरोधी असल्याची बोंब ठोकणारे व अंनिसला अहिंदुंचे प्रबोधन करण्याचे सल्ले देणारे धर्माचे ठेकेदार स्वतः मात्र हिंदुंच्या कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांना हात घालताना दिसत नाहीत की कोणत्याही प्रकारचे समाजप्रबोधनाचे कार्यही करीत नाहीत !* तेव्हा हिंदुहिताबाबत स्वतः निष्क्रिय असताना अंनिसच्या सक्रीयतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार तरी ह्यांना आहे काय, असा प्रश्न हिंदु तरुणांनी त्यांना विचारायला हवा.
थोडक्यात, भौतिक परिस्थितीवर आधारीत अधिक चांगल्या व कालोचित जीवनपद्धतीकडे अंनिस समाजाला नेत असताना तो हिंदू किंवा कोणत्याही धर्मावरील हल्ला कसा ठरु शकतो ? भौतिक परिस्थितीवर आधारित अधिक चांगली जीवनपद्धती कोणती हे ठरविण्यासाठी प्रस्थापित जीवनपद्धतीची चिकित्सा करणे अपरिहार्यच ठरते. परंतू अशा वेळी हिंदु धर्मरक्षणाचा दावा करणारे हे ठेकेदार, आमच्या धर्मावर प्रश्न उपस्थित कराल तर खबरदार.. असे म्हणून, तर कधी 'तुम्ही आमच्याच धर्माची चिकित्सा का करता' असे म्हणून धर्मचिकित्सेला नकार देत असतात. त्यामुळे त्यांना हिंदुहितापेक्षा लोकांनी अज्ञानी राहिल्यामुळे अबाधित राहू शकणाऱ्या त्यांच्या जातीय, आर्थिक नि राजकीय हितसंबंधांचीच अधिक काळजी असते हे सिद्ध होते. *खऱ्या धर्माला विचारांची भीती नसते* हे स्पष्ट करताना विनोबा एके ठिकाणी म्हणतात, की *"खुप विचार करा. आडवे तिडवे चारही बाजूने विचार करा. धर्माला विचारांची कात्री लावा. विचाररुपी कात्रीने जो धर्म कातरला जाईल तो कुचकामी होता असे समजा. तुझ्या कात्रीने जो तुटणार नाही, उलट तुझी कात्रीच जेथे तुटून पडेल तोच खरा धर्म माना !"*
'अंनिस हिंदुविरोधी आहे' असे म्हणणाऱ्या मित्रांच्या मनामध्ये हिंदु धर्म म्हणजे काय ह्याबाबतच गोंधळ असतो. कारण लोकांना धर्माबाबत सतत भावनिक पातळीवर ठेवल्यामुळे *धर्म म्हणजे त्या विशिष्ट धर्मातील लोकांच्या हिताचा प्रश्न*, ह्या द्रुष्टीने त्यांनी कधी विचारच केलेला नसतो ! परंतू त्यांनी धर्माचा कोणताही अर्थ लक्षात घेतला तरी अंनिस हिंदुविरोधी असल्याचा त्यांचा आरोप कसा खोटा पडतो, ते आपण पाहिले.
आता वरील आक्षेपातील 'अंनिस अन्य धर्मांची चिकित्सा करीत नाही किंवा त्यांच्याबाबत मुग गिळून गप्प बसते' हा आरोप करणाऱ्यांची मानसिकता समजून घेण्यापूर्वी वरील दाव्यात खरेच काही तथ्य आहे काय, ते आपण तपासून पाहू.
खरे तर *अंधश्रद्धा ह्या श्रद्धेच्या क्षेत्रातील काळाबाजार असतो.* आणि काळाबाजार करणाऱ्याची जात वा धर्म पाहायचा नसतो. अंनिसही ते पाहात नाही. अंनिसकडे आलेली किंवा अंनिस कार्यकर्त्यांनी स्वतः दखल घेतलेली अहिंदुंतील अनेक प्रकरणे समितीने हाताळली आहेत. अंनिसच्या वार्तापत्रांमध्ये किंवा डॉ. दाभोलकरांच्या विविध ग्रंथांमध्ये ठिकठिकाणी आपल्याला ती उदाहरणे आढळून येतात. अलिकडेच अंनिसने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातील गेल्या 25 वर्षांतील निवडक लेखांचे प्रत्येकी सुमारे 200 पानांची 5 पुस्तके असलेले 3 खंड प्रसिद्ध केले आहेत. त्यातील पहिल्या खंडातील "बुवाबाबांचा पर्दाफाश आणि भांडाफोड" या पुस्तकात इस्लाम व ख्रिश्चन धर्मातील बाबाबुवांनाही समितीने कसे उघडे पाडले त्याविषयीचे लेख आहेत.
त्यातील काही लेखांची नावे खालिलप्रमाणे...
1) आणि हाजीमलंग पळाला (पान 13)
2) मांत्रिक मौलाना शेख (पान 17)
3) येशूचा बाप्पा (पान 34)
4) अस्लमबाबाचा अद्भुत दवाखाना (पान 55)
5) मुजावर बाबा (पान 60)
6) पैगंबर शेख बनला दशावतार (पान 68)
7) गुलशन साईजीची बुवाबाजी (पान 78)
8) सुफी सिकंदर शाह बाबाचा पर्दाफाश (पान 113)
9) मौलविचा महिलेवर बलात्कार (पान 139)
10) पिराबाबा कसा झाला भोंदू बाबा ? (पान 154)
तसेच अलिकडच्या काळातील ट्रिपल तलाकचा प्रश्न असो, प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदुषणाबाबतच्या विधानांमुळे विशेषतः चर्चेत आलेल्या मुस्लिमांचा *अजानचा प्रश्न* असो, मुस्लिम महिलांच्या प्रश्नांबाबत मुल्लामौलवींचे वर्चस्व झुगारुन स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी धर्माची चौकट मोडून न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची हिंमत दाखविणाऱ्या जिगरबाज महिलांबाबत समाजामध्ये व प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चा असो महाराष्ट्र अंनिसने वेळोवेळी त्याची दखल घेऊन आपल्या वार्तापत्रामध्ये त्याबाबत भूमिका घेतलेली आहे.
परंतू तरीही अंनिसने हाताळलेल्या अनेक प्रकरणांपैकी बहुतेक प्रकरणे ही हिंदु धर्माशी संबंधित आहेत, असे आपल्याला आढळून येईल. परंतू त्याला सार्थ कारणेही आहेत.
1. पहिली गोष्ट म्हणजे साल 2001 व 2011 च्या राष्ट्रीय जनगणनेनूसार हिंदु व मुस्लिमांची लोकसंख्या अनुक्रमे सरासरी 80% आणि 13 ते 14% होती. म्हणजे आपल्या देशामध्ये अंधश्रद्धांची 10 पैकी 8 प्रकरणे ही हिंदुंचीच असणार. आणि हिंदु व मुस्लिमातील धर्मसुधारणांच्या चळवळींचे प्रमाण पाहता स्वाभाविकपणे अंनिसमध्ये 10 पैकी किमान 9 कार्यकर्ते हे हिंदूच असणार. शिवाय आपल्याकडे साधारणपणे विशिष्ट जात व धर्मातील रुढी-परंपरांबाबत त्या जाती-धर्माबाहेरील व्यक्तीने बोललेले रुचत नसल्यामुळे बहुसंख्येने असलेले हिंदु कार्यकर्ते बहुधा हिंदुच्याच अंधश्रद्धांबाबत बोलताना दिसतात.
2. हिंदु धर्म आणि इतर धर्म ह्यात जाती-पोटजाती, धर्मग्रंथ, सणोत्सव, देवदेवता यांच्या संख्येच्या बाबतीत दिसून येणारा फरक लक्षणीय आहे. त्यामुळे अर्थातच इतर धर्मांच्या तुलनेत अनेक जाती, त्यांचे अनेक देवदेवता वा अवतार, त्यांच्यासाठी केल्या जाणाऱ्या अनेक पूजाविधी वा कर्मकांड अशा ह्या अनुकूल स्थितीत हिंदु धर्मात अंधश्रद्धेचे अमाप पिक उगवले नसते तरच नवल !
त्यामुळे जिथे अंधश्रद्धा अधिक, तुलनेने परिवर्तनवादी विचाराचे कार्यकर्ते अधिक, त्या त्या समाजातील लोकांनीच तेथील अंधश्रद्धांबाबत बोलले पाहिजे ही मानसिकता बलवत्तर तिथे ह्या सर्व बाबींची एकूण परिणती हिंदुंतील अंधश्रद्धा निर्मूलनावर अधिक काम होण्यात झाली तर ते स्वाभाविकच म्हणायला हवे.
तरीही वादापुरते असे मानले की अंनिस ही केवल हिंदुंचे अंधश्रद्धा निर्मूलन करते, तर प्रश्न असा निर्माण होतो की अंधश्रद्धा निर्मूलनच मुळात चांगले की वाईट ?
अ) *चांगले असेल तर* ते आपल्या धर्माचे होण्यात अडचण काय ?
ब) *वाईट असेल तर* ते कोणाचेही होता कामा नये. जी गोष्ट अनिष्ठ म्हणून आपल्या धर्माबाबत होऊ नये, परंतू परधर्माबाबत व्हावी असा आपला आग्रह असेल, तर आपल्या मनामध्ये परधर्मियांप्रती द्वेष ठासून भरलेला आहे, हे तरी मान्य करावे लागेल.
तसेच हिंदुंच्या अंधश्रद्धा निर्मूलनाला विरोध असण्याचे आणखी एक कारण असते, ते म्हणजे हिंदुंच्या अंधश्रद्धा नाहीशा झाल्या तर ते नेभळट बनतील, संघटित राहणार नाहीत. परंतू अंधश्रद्धा निर्मूलन न झाल्यामुळे मुसलमान मात्र कडवेच राहतील, पोथिनिष्ठ राहिल्यामुळे त्यांचा एकजीवपणा, एकजूटपणा व बळकटी कायम राहील. आणि जेव्हा केव्हा या देशात हिंदु-मुसलमान संघर्ष होईल, तेव्हा कट्टर मुसलमान नेभळट हिंदुंचा पराभव केल्यावाचून राहणार नाहीत.
खरे तर ह्या आक्षेपाला दाभोलकरांच्या अनेक वर्षे आधी सावरकरांनीच अत्यंत तर्कशुद्ध व समर्पक उत्तर देऊन ठेवले आहे. मुसलमानांच्या देवभोळेपणामुळे नि धर्मवेडेपणामुळे त्यांचे काय कल्याण झाले आहे असा थेट प्रश्न विचारुन, आज हिंदुस्थानातही ते विद्येत मागासलेले आहेत. अज्ञान, दारिद्रय नि कुपमंडुकता यांनी हिंदुंपेक्षाही ते अधिक ग्रासलेले आहेत ह्या वस्तुस्थितीकडे हिंदु समाजाचे त्यांनी लक्ष्य वेधले. सावरकर म्हणतात, की *"मुसलमानांनी जे समाज त्यांच्याहून असंघटित नि धर्मभोळे होते, त्यांच्यावर धर्मवेडाने विजय त्यांनी मिळविले असतील. परंतू ऐहीकद्रुष्ट्या अधिक संघटित समाजाशी त्यांची गाठ पडली तेव्हा मुसलमानांची पारलौकिक पोथीनिष्ठा त्यांना मुळीच उपयोगी पडली नाही. ....युरोपच्या विज्ञानबळापुढे ज्याअर्थी मुसलमानांच्या धर्मवेडाचे काहीएक चालत नाही. ज्याअर्थी बुद्धीनिष्ठा, प्रगतीस पारखे झाल्यामुळे त्यांचा समाज आज हिंदु समाजापेक्षाही अज्ञान, दारिद्रय, अवनती यांच्या तावडीत सापडलेला आहे. आणि ज्याअर्थी आम्हास जे तोंड द्यावयाचे आहे, ते विज्ञानयुगास नि युरोपीय विज्ञानबळासच द्यावयाचे आहे. त्याअर्थी मुस्लिम एक पोथिनिष्ठ आहेत म्हणून आम्ही सवाई पोथिनिष्ठ व्हावे, ते देवभोळे आहेत म्हणून आम्ही सवाई देवभोळे व्हावे हा काही आमच्या अभ्युन्नतीचा उपाय नव्हे. अनुकरणच जर करावयाचे असेल तर आज मुस्लिमांनाही जी पुरुन उरली आहे त्या युरोपच्या विज्ञाननिष्ठतेचेच अनुकरण करा. देवभोळेपणाचे सारे ताईत, ताविज, शिव्या आणि शाप ज्या कवचावर चालू शकत नाही, ते आज इंग्लंड, रशिया, जर्मनीत धडधडीत प्रत्ययास येत आहे; ते विज्ञान कवचच आम्ही धारण केले पाहिजे !"*
आपल्या अनेक सुधारकांनी नि विचारवंतांनी विज्ञानयुगाकडे बोट दाखवून अद्ययावत व्हा असा वेदमंत्र दिलेला असतानाही, आजही अनेक हिंदु तरुण आपल्याला पोथीवादी धर्माकडे नेऊन स्थितीवादी बनवू पाहणाऱ्या सनातन्यांच्या षडयंत्रास बळी पडत आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळेच आज हिंदु समाज पतित झालेला आहे. सत्यशोधनाची व्रुत्ती समाजामध्ये रुजली नसल्याचेच ते द्योतक आहे. धर्माचे ठेकेदार आपल्याला धर्माच्या भ्रामक संकल्पनांमध्ये गुंतवून अज्ञानी व हिंसक ठेऊ पाहात आहेत, हे त्यांच्या अद्यापही लक्षात येत नाही. एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ येत असताना दुसरीकडे संस्कृती रक्षणाच्या नावाखाली हिंदु समाजामध्ये संकुचित विचार रुजवू पाहणाऱ्या चळवळी करुन हिंदु तरुणांना आपल्या जुन्या व बऱ्याच प्रमाणात कालबाह्य ठरलेल्या रुढीपरंपरांचा दुराभिमान बाळगावयास शिकवून जगातील अन्य संस्क्रुतींपासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या स्वयंघोषित संस्कृती रक्षकांबाबत पूज्य साने गुरुजी म्हणतात, की *" नवीन विचारांचे वारे येऊ नयेत म्हणून सनातनी नावाची मंडळी किल्ले-कोट बांधू पाहात आहेत. परंतू हे संस्कृतीरक्षक नसून संस्कृतीभक्षक आहेत. भारतीय संस्कृतीची भव्य इमारत नवीन विचारांच्या वाऱ्याने पडेल, अशी का या संस्कृतीरक्षकांना भीती वाटते ? या नवीन विचारांच्या वाऱ्यांनी जर ती पडण्यासारखी असेल, तर ती टिकण्यात तरी अर्थ काय ? जे नेहमी नवीन नवीन स्वरुप प्रकट करील तेच टिकेल. ज्या झाडाला नवीन पालवी फुटेनाशी झाली, ते झाड मरणार असे समजावे."*
मित्रांनो.. व्यक्तीस्वातंत्र्य हा आधुनिक जगाचा प्राण आहे. जे लोक धर्माच्या नावाने आपले विचार इतरांवर लादू पाहतील, पोथीवादी व प्रश्नशून्य धर्माचे मढे कवटाळू पाहतील, समाजाने त्यांचे विचार नाहीच स्विकारले तर हिंसाचाराचा मार्ग पत्करतील, त्यांचा पराभव निश्चित आहे.
आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा महामंत्र देऊन विचारी व विवेकी बनवू पाहात आहे. आज जे जे उपयुक्त आहे, मनुष्यहिताचे आहे ते ते स्वतः आचरुन विचारार्थ समाजापुढे ठेवीत आहे. लोकही ते स्विकारत आहेत. त्यामुळेच लोक विचारी, विवेकी बनल्याने ज्या ज्या लोकांची दुकाने बंद होणार आहेत, त्यांच्या पोटात अंनिसच्या कामामुळे भीतीचा गोळा उठला आहे. म्हणूनच ते नाना प्रकारे अंनिसला बदनाम करण्याचे कटकारस्थान करीत आहेत. लोकांनी त्यांचे कारस्थान समजून घ्यावे ह्याकरिता माझी सर्व मित्रांना नम्र विनंती आहे की त्यांनी सोशल मिडियावर येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीवरुन अंनिसबद्दल मत न बनविता, अंनिसचे मासिक, डॉ. दाभोलकरांची पुस्तके, भाषणे यांचा अभ्यास करुन किंवा प्रत्यक्ष अंनिसच्या शाखांमध्ये जाऊन अंनिसचे विचार व ध्येयधोरणे समजून घ्यावीत. धन्यवाद !
विवेकाचा आवाज बुलंद करुया
आपला मित्र
मिलिंद यशवंत पाटील (असीम) भिवंडी
संपर्क : 9028570845
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशामध्ये पुरोगामी व प्रतिगामी विचारसरणींतील संघर्षातून अनेक महत्वाच्या सुधारक व विचारवंतांना छळाचा सामना करावा लागलेला आहे तर काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. परंतू इतिहास सांगतो की त्या संघर्षामध्ये हिंसाचाराचा आधार केवळ प्रतिगामी गटालाच (धर्माचे ठेकेदार) घ्यावा लागलेला आहे. कारण वैचारिक लढाईमध्ये टिकाव लागत नसल्यामुळे अस्तित्व टिकविण्यासाठी मुद्यांवरुन गुद्यांवर आल्याशिवाय त्यांना पर्यायच नसतो ! ह्याउलट सत्य व नीतीचा भक्कम आधार व लोकशाही मूल्यांवर विश्वास असल्यामुळे पुरोगामी विचारसरणीचे पाईक असलेल्यांना आपल्या विचाराच्या अस्तित्वासाठी हिंसाचाराचा मार्ग पत्करण्याची मुळातच आवश्यकता नसते. मला वाटते आपल्या देशामध्ये लोकशाही टिकावी, मानवता टिकावी, प्रत्येक नागरिकाला येथे सन्मानाने जगता यावे अशी आपली भावना असेल तर आपण सातत्याने विजयी होत आलेल्या पुरोगामी विचाराचेच पाईक झाले पाहिजे. मार्ग खडतर असला तरी मनास खरे समाधान देणारा आहे.
ReplyDelete