राजा..मग तो कुणीही असो , त्याचे राजेपण टिकून असते ते त्याच्या स्वतःच्या पराक्रमबरोबरच त्याच्या राज्यातील कष्टकरी श्रमिकांच्या जोरावर. श्रमिक मग तो साधा कारकुन असो अथवा प्रशासकीय अधिकारी असो...साधा शेतकरी असो वा मंत्रीगण असो . या प्रत्येक कष्टकरी वर्गाच्या श्रमाला जो सन्मान देतो तोच " लोकराजा अथवा रयतेचा राजा " म्हणून गौरविला जातो. कष्टकरी वर्गाचा यथोचीत सन्मान ज्या राज्यात होतो ते राज्य व तो राजा कायमचा स्मृतीत कोरला जातो. शाहूराजा हा असाच थोर राजा..जो आपल्या राज्यातील कष्टकरी वर्गाचा यथोचित सन्मान करत होता. पाहूया ही गोष्ट ...
*शाहूराजा आपल्या खडखड्यातून सोनतळी कँम्पकडे जात होते. सहज लक्ष गेले तर एक वृद्ध स्त्री डोक्यावर शेणी घेऊन विकायला जात होती. भर दुपारची वेळ . तिच्या चेहऱ्यावर असणारे कष्टकरी भाव शाहूराजाने ताडले. खडखडा त्या म्हातारी जवळ नेऊन महाराजांनी दोन रूपये देऊ केले व म्हणाले " दोन रुपये घे आणि डोक्यावरच्या शेणी इथेच टाकून जा " म्हातारीने स्पष्ट नकार दिला. दोन कारणे सांगितली . एक म्हणजे या शेणीची किंमत फक्त बारा आणे होती , दोन रुपये नव्हती. दुसरे असे की , ह्या शेणी रस्त्याकडेला टाकून नुसते पैसे ती घेणार नव्हती. शाहूराजाने " म्हातारीचे मनं " वाचले. तिच्या हातावर बारा आणे ठेवले व सर्व शेणी खडखड्यात ठेवायला बरोबरच्या लोकांना सांगितले. शेणी खडखड्यात बसताच खडखड्यातील लोकांना बसायला गाडीत जागा राहिली नाही. महाराजांनी कसलाही विचार न करता स्वतः पायी चालायला सुरुवात केली. मागोमाग सगळे लोक चालू लागले. नंतर सर्वांनी विनंती करून महाराजांना खडखड्यात बसवले. महाराज जाणाऱ्या त्या म्हातारीकडे एकटक बघत राहिले.....ही गोष्ट काय दर्शविते ?? शाहूराजाचे राज्यातील कष्टकरी वर्ग हा ऐतखाऊ भाड खाणारा नव्हता. आपल्या कष्टाएवढेच पैसे तै घेत होता.आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या कष्टाला प्रमाण मानत होता. म्हातारीने म्हणून तर शेणी रस्त्यावर टाकून जायला नकार दिला. शाहूराजाही किती महान बघा...स्वतःच्या गाडीत त्या कष्टकरी म्हातारीच्या शेणी,भरून स्वतः पायी चालू लागला. ही कृती म्हणजे त्या म्हातारीच्या कष्टाला केलेला सलामच होता. आपल्या जनतेच्या " इमानाला " ओळखणारा असा हा शाहूराजा होता. खडखड्यात पुन्हा बसल्यावर महाराज बरोबरच्या लोकांना स्पष्ट बोलले " एवढं आपल्या मध्ये कुणी इमानी आहे का ? हाताला लागलेले परत करता का कधी ??". शाहूराजा असा जगावेगळा राजा होता.*
अशी कष्टकरी वर्गाची कदर जर आजकालचे राज्यकर्ते करते झाले तर भारत महासत्ता बनायला किती वेळ लागेल हो ? पण हे होणे नाही. कारण ...कारण त्याला काळीज शाहूराजाचे असावे लागते. आपल्या जनतेतील " इमानपणाची खूण " ओळखणारा शाहूराजा म्हणून तर लोकराजा गौरविला गेला. उत्तम राज्यकर्ते व्हायच असेल तर हा गुण असायलाच हवा ...हेच तर शाहूचरित्र शिकवते.
*!! कष्टकरी वर्गाचे ओळखावे इमान...तरच राज्यकर्ते म्हणून व्हाल महान !!*
उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment